रील्ससाठी महिलेने चक्क रूळावर चालवली कार, रेल्वे वाहतुकीला फटका; 15 ट्रेनचे मार्ग बदलले
रील्ससाठी हल्ली लोकं काय करतील याचा नेम नाही. इन्स्टाग्रामवर रील बनवण्यासाठी तेलंगणातील एका महिलेने चक्क रेल्वे रुळावर कार चालवली. महिलेच्या या नको त्या धाडसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. किमान 15 गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले. शंकरपल्लीजवळ ही घटना घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत 34 वर्षीय महिला किआ सोनेट कार रेल्वे रुळावर चालवताना दिसत आहे. महिलेने काळे कपडे परिधान केले असून मास्क घातला आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत स्थानिक रहिवासी, रेल्वे कर्मचारी आणि पोलीस महिलेला गाडीतून बाहेर काढताना दिसत आहेत. ही महिला मूळची उत्तर प्रदेशातील असून ती एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करत होती, अशी माहिती मिळते. महिलेचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅनकार्ड जप्त करण्यात आले आहे.
महिलेच्या या कृत्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बंगळुरू-हैदराबाद ट्रेनसह 10 ते 15 गाड्या वळवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे. सदर महिला आक्रमक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ दिसत होती, असे रेल्वे पोलीस अधीक्षक चंदना दीप्ती यांनी सांगितले. महिला फक्त रीलच बनवत होती की हा आत्महत्येचा प्रयत्न होता याबाबतही पोलीस तपास करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List