संवादाचा अभाव म्हणजे सर्वकाही आलबेल नाही, फडणवीसांच्या विधानाचा दाखला देत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा

संवादाचा अभाव म्हणजे सर्वकाही आलबेल नाही, फडणवीसांच्या विधानाचा दाखला देत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा

एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे संवादात कच्चे आहेत, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये केले. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला. संवादाचा अभाव म्हणजे सर्वकाही आलबेल नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

शुक्रवारी सकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये संवादाचा अभाव आहेच. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यातून विस्तव जात नाही हे सगळ्यांना माहिती आहे. एकनाथ शिंदे हे स्वतंत्र बेटावर उभे आहेत, अजित पवार दुसऱ्या टोकाला आणि फडणवीस एका ठिकाणी आहेत. तरीही ती महायुती आहे. एकनाथ शिंदे यांचा संवाद उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असताना फार पक्का होता. ते कोमात का गेले आहेत, त्यांच्यातील संवाद क्षमता का संपली याचा तपास फडणवीस यांनी करावा. अजित पवार हे उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री असताना सगळ्यात उत्तम संवाद त्यांचा उद्धव ठाकरे यांच्याशी होता. मग आता या संवादामध्ये मिठाचा खडा का पडतोय? याचा अर्थ सगळे आलबेल नाही. जे दिसतंय ते वरवरचे आहे किंवा एका दहशतीपोटी आहे. ईडीची फाईल उघडू नये म्हणून भितीपोटी सर्व एकत्र आहेत.

दरम्यान, नरकातला स्वर्ग या पुस्तकाची एक प्रत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांनाही पाठवण्यात आली आहे. ही प्रत पाठताना संजय राऊत यांनी यासोबत एक पत्रही पाठवले आहे. यात राऊत यांनी केंद्रीय यंत्रणांचाही उल्लेख केला. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, भाजपा पुरस्कृत यंत्रणांनी गेल्या 10 वर्षामध्ये राजकारणात प्रचंड दहशतवाद, दबाव अशा प्रकारचे काम करून मोदी आणि त्यांच्या पक्षाला मदत होईल अशा पद्धतीने कारवाया केल्या. सर्वाधिक नव्हे तर 100 टक्के कारवाया या भाजप विरोधकांवर करून त्यांच्या मदतीने विरोधकांचे पक्ष फोडले, आमदार-खासदार फोडले, सरकारं पाडली. तरीही या देशामध्ये आमच्यासारखे लोक या दहशतीला बळी पडले नाही आणि स्वाभिमाने जगले आणि आजही जगताहेत.

आम्ही निष्ठेने आमच्या पक्षाबरोबर आहोत. अशा पद्धतीने संघर्ष करून सुद्धा आपल्याला उभे राहता येते. जुलमी राज्यव्यवस्थेला आपल्यासमोरचे आव्हान हे जेव्हा लोकशाही मार्गाने संपवता येत नाही तेव्हा सत्तेचा आणि यंत्रणाचा गैरवापर करून विरोधकांना खतम केले जाते. त्यासाठी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीस यांचे राज्य निर्माण करते. त्याला घाबरून काही लोक पळून जातात. काही लोक हा दबाव स्वीकारत नाहीत. त्यातूनच हे पुस्तक निर्माण झाले, असे राऊत म्हणाले.

नरकातला स्वर्ग हे पुस्तक फडणवीस यांनी वाचावे, कारण त्यांनी यंत्रणांचा गैरवापर केला. ते, मोदी, शहा जुलमी राज्यव्यवस्थेचे ते सूत्रधार आहेत. मोदी-शहा यांनीही हे पुस्तक वाचले पाहिजे. शिंदेंनीही वाचले पाहिजे. जर त्यांना व्यवस्थित वाचता, लिहिता येत असेल तर त्यांनी शांतपणे त्या पुस्तकाचा गाभा समजून घेतला पाहिजे. बराच काळ ते आमचे सरकारी होते, विशेषत: जेव्हा त्यांचा जो मार्ग निर्माण झाला भाजपात पळून जाण्याचा. त्याच्या आधी आणि त्या काळात ते माझ्याबरोबर होतेच. माझ्या बाबतीत काय चालले याची पूर्ण कल्पना त्यांना होती. त्याच्यामुळे त्यांच्या पत्रात लिहिले की, तुम्ही या सगळ्या अनेक घटनांचे, प्रवासाचे साक्षीदार आहात, म्हणून ते पुस्तक वाचले पाहिजे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;