अमेरिकेने मर्यादेत राहवे, अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्यांचे गंभीर परिणाम होतील, इराणचा पुन्हा ट्रम्प यांच्याशी पंगा
सध्या अमेरिका आणि इराणमध्ये अण्वस्त्रबंदी करारवर चर्चा सुरू आहे. त्यामुळे दोन्ही देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अण्वस्त्र हल्ल्याचा धमकीवजा इशारा दिला होता. इराणने स्वतःहून अण्वस्त्रे नष्ट केली नाहीत तर आम्ही ती त्यांच्याच भूमीवर नष्ट करू, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. त्यावर आता इराणनेही ट्रम्प यांच्याशी पुन्हा पंगा घेत त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
अमेरिकेची ही धमकी मर्यादा ओलांडणारी आहे. त्यांनी कोणते कठोर पाऊल उचलले तर याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे. इराणची अधिकृत वृत्तसंस्था फार्स न्यूजने शुक्रवारी याबाबत वृत्त दिले. यामध्ये त्यांनी अमेरिकेला गंभीर इशारा दिला. अण्वस्त्र कराराबाबत अमेरिकेला राजनैतिक तोडगा हवा असेल तर त्यांनी धमक्या आणि निर्बंधांची भाषा सोडून द्यावी. अशा धमक्या ‘इराणच्या राष्ट्रीय हितसंबंधांसाठी शत्रुत्व निर्माण करत आहेत, असे इराणच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बुधवारी एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. मला (अणु करार) इतका कठोर हवा आहे की आपण निरीक्षकांसोबत जाऊ शकतो. आपल्याला जे हवे ते घेऊ शकतो, आपल्याला जे हवे ते उडवू शकतो. असे ते म्हणाले. दरम्यान आतापर्यंत अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या आहेत, परंतु अणुप्रश्नी कोणताही करार झालेला नाही. मात्र लवकर यावर विचार केला जाईल असेही ट्रम्प म्हणाले.
सौदी अरेबियाचाही इराणला इशारा
काही काळापूर्वी सौदी अरेबियाने इराणला इशारा दिल्याची बातमी आली होती. सौदी अरेबियाचे संरक्षण मंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान त्यांना ट्रम्प प्रशासनासोबतच्या अणुकराराबाबतच्या चर्चेला गांभीर्याने घेण्याचा इशारा दिला. अन्यथा इस्रायलसोबत युद्धासाठी तयार राहावे असे ते म्हणाले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List