ऑपरेशन सिंदूरबाबत पोस्ट केली म्हणून गुन्हेगार कसे ठरवता? इंजिनीयरिंगच्या विद्यार्थिनीला अटक केल्याप्रकरणी हायकोर्टाकडून पोलिसांची खरडपट्टी
‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल पोस्ट करणाऱया इंजिनीयरिंगच्या विद्यार्थिनीला अटक केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज सरकारला झापले. केवळ पोस्ट केली म्हणून विद्यार्थिनीला गुन्हेगार कसे काय ठरवले? हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे, असे ताशेरे हायकोर्टाने ओढले. तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत का, असा सवाल करत न्या. गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने विद्यार्थिनीला तुरुंगातून तत्काळ सोडण्याचे आदेश दिले.
पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सिंहगड अकादमी ऑफ इंजिनीयरिंग या महाविद्यालयात मूळची जम्मू आणि कश्मीरची रहिवासी असलेल्या विद्यार्थिनीने प्रवेश घेतला होता. ऑपरेशन सिंदूरबाबत इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह ट्विट रिपोस्ट केल्याने तिला कॉलेजमधून काढून टाकण्यात आले. कॉलेज प्रशासनाचा काढून टाकण्याचा निर्णय मनमानी असून तो रद्द करावा व पुन्हा कॉलेजमध्ये सामावून घ्यावे अशी मागणी करत तरुणीने हायकोर्टात याचिका दाखल केली या याचिकेवर आज मंगळवारी सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी तरुणीला केलेल्या अटकेप्रकरणी न्यायालयाने सरकारला कठोर शब्दांत फटकारत जाब विचारला. इतकेच नव्हे तर, आजच्या आज तरुणीला तुरुंगातून सोडून देण्याचे आदेश येरवडा कारागृह प्रशासनाला दिले. त्याचबरोबर कॉलेज प्रशासनाने तिचे नाव कमी करण्याच्या निर्णयाला खंडपीठाने स्थगिती देत तिला परीक्षेला बसण्यासाठी हॉल तिकीट देण्याचे आदेश कॉलेज प्रशासनाला दिले.
हायकोर्टाचे ताशेरे
– हे एक अतिशय धक्कादायक प्रकरण असून पोलिस संबंधित तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत का? ती एक कट्टर गुन्हेगार आहे का, असे खरमरीत सवाल विचारत खंडपीठाने सरकारवर ताशेरे ओढले.
– हा असा खटला नाही, जिथे मुलीला आता कोठडीत राहावे लागेल. त्यामुळे तरुणीची तत्काळ सुटका करावी.
प्रकरण काय?
ऑपरेशन सिंदूरनंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी 19 वर्षीय तरुणीने 7 मे रोजी इन्स्टाग्रामवर ‘रिफॉर्मिस्तान’ नावाच्या अकाउंटवरून केलेली पोस्ट पुन्हा रिपोस्ट केली. या पोस्टमध्ये सरकारने पाकिस्तानविरुद्ध युद्ध भडकवल्याची टीका करण्यात आली होती याप्रकरणी तरुणीविरोधात 9 मे रोजी निदर्शने झाल्यानंतर तिला कॉलेजमधून काढून टाकण्यात आले. याशिवाय, तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर काsंढवा पोलिसांनी तिला अटक केली.
– आक्षेपार्ह अशी पोस्ट शेअर करण्याचे कृत्य विद्यार्थिनीने केले असून या कृत्याला अविवेकी कृत्य असे म्हणता येईल; मात्र तिला तिची चूक लक्षात येताच तिने पोस्ट हटवत माफी मागितली. परंतु तिला सुधारण्याची संधी देण्याऐवजी सरकारने तिला अटक करत गुन्हेगार ठरवले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List