सत्तेची तहान लागल्यावर कुणी गटारातलं किंवा गढूळ पाणी पित नाही; संजय राऊत स्पष्टच बोलले

सत्तेची तहान लागल्यावर कुणी गटारातलं किंवा गढूळ पाणी पित नाही; संजय राऊत स्पष्टच बोलले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी राज्याचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पथक परिश्रम आणि सातत्य याचे कौतुक केले. यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तुम्ही कितीही राजकीय टीका केली तरी एका नेत्यामध्ये जे गुण आहेत ते तुम्हाला, महाराष्ट्राला आणि देशाला मान्य करावेच लागतात. पण नुसते कौतुक करून चालणार नाही, तर त्यांच्या गुणांची कास फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली पाहिजे, असा टोला राऊत यांनी लगावला.

निवडणुकीचे यश, अपयश हे अनेक नेत्यांना थांबवत नाही. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही अनेक निवडणुका लढल्या, हरल्या, जिंकल्या, पण काम करत राहिले. आता शरद पवार हे सगळ्यांचे आदर्श आहेत. इतक्या वर्षांनेही का होईना देवेंद्र फडणवीस यांना पवारांचे हे गुण दिसले त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. तसेच ज्या अर्थी फडणवीस यांनी पवारांचे कौतुक केले त्या अर्थी त्यांनी दिल्लीची परवानगी घेतली असेलच. कारण पवारांविषयी आदर व्यक्त करायला आम्हाला कुणाची परवानगी लागत नाही, पण भाजपचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात, असेही राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आता असे आहे की फडणवीस यांनी छगन भुजबळ यांचेही कौतुक केले आहे. त्यांनीच त्यांना तुरुंगात टाकले होते. त्यामुळे त्यांच्या कौतुकाला फार महत्त्व देऊ नका. ते अजित पवारांचेही कौतुक करतात, प्रफुल्ल पटेलांचेही करतात आणि उद्या नवाब मलिक यांचेही कौतुक करतील. भाजपच्या नेत्यांचा काही भरवसा नाही. ते कधी कुणावर हल्ला करतील आणि मग कौतुक करतील हे त्यांचे त्यांनाच माहिती. ज्यांना तुरुंगात टाकले किंवा तुरुंगात टाकायला निघाले होते त्या सगळ्यांचे कौतुक आता फडणवीस करत आहेत.

दरम्यान, शरद पवारांच्या पक्षातील एक गट भाजपसोबत जाण्यास उतावळा असल्याच्या चर्चांवरही राऊत यांनी परखड भाष्य केले. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. पण मला जे काही ज्ञान आहे त्यानुसार शरद पवार हे भाजपबरोबर जाणार नाहीत. पवारांनी राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग खेळली आहे. आता ते कोचिंगच्या भूमिकेत आहेत. त्यांची विचारधारा आणि भूमिका मला माहिती आहे. शरद पवारांची विचारधारा, आतापर्यंतच्या भूमिका पाहिल्यावर ते भाजप किंवा अशा विचारांच्या लोकांबरोबर कधीच जाणार नाहीत हा विश्वस मला आहे. आता त्यांची नवीन पिढी काय निर्णय घेते माहिती नाही.

आम्ही घडवलेल्या पिढ्याही गेल्या. बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेल्या किंवा उद्धव ठाकरे यांनी ज्यांना उभे केले ते अनेक लोक पळून गेले. ते कुणाच्या हातात नाही. छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे, गणेश नाईक हे मूळचे कुठले लोक आहेत? हे मूळचे शिवसेनेचे लोक आहेत. आता सध्याच्या राजकारणामध्ये कुणी कुणाच्या हातात राहत नाही. राजकारण स्वार्थी आणि मतलबी झाले आहे. लोकांना तात्कालिक फायदे हवे आहेत, त्यासाठी लोक जातात. लोकांना आपली प्रॉपर्टी, संपत्ती वाचवायची आहे. सरकारच्या प्रचंड दबावामुळे भयभीत होऊन लोक जातात.

शरद पवार जाणार नाहीत, पण नवी पिढी तसा निर्णय घेईल का? असे विचारले असता राऊत म्हणाले की, मला वाटत नाही तसे. सुप्रिया सुळे यांचे नाव तुम्ही वारंवार घेता किंवा अन्य काही नेत्यांची नावे घेताय. त्यांना तहान नक्कीच लागली असेल. पण तहान लागल्यावर कुणी गटारातले किंवा गढूळ पाणी पित नाही. सत्तेची तहान सगळ्यांनाच लागली असेल, कारण सहकार क्षेत्रात असल्याने कारखाने आहेत, सूत गिरण्या आहेत. तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायची. कारण त्या महासागरात इतक्या लाटा उसळल्या आहेत, इतकी गर्दी आहे की तिथे प्रत्येकाला आपले स्थान शोधावे लागेल. जे गेलेले आहेत तेच अस्तित्वासाठी धडपडत आहेत, नवीन जाऊन काय करणार.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;