नवी मुंबई विमानतळावरून ऑगस्टमध्ये पहिले इंडिगोचे विमान उडणार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणे सुरू करणारी इंडिगो एअरलाइन्स ही पहिली कंपनी ठरणार आहे. विमानतळाचे उद्घाटन ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता असून पहिली इंडिगोचीच विमाने उडणार आहेत. सुरुवातीला रोज 18 विमानांचे टेकऑफ आणि 18 विमानांचे लॅण्डिंग होणार आहे. नवी मुंबईतून देशातील 15 शहरे हवाईमार्गे जोडली जाणार आहेत. येत्या नोव्हेंबरपर्यंत उड्डाणांची संख्या 79 पर्यंत वाढणार असून त्यामध्ये 14 आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश असेल. या भागीदारीचा करार अदानी एअरपोर्ट होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि इंडिगो एअरलाइन्सच्या दरम्यान आज झाला.
अदानी एअरपोर्ट होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि इंडिगो एअरलाइन्सच्या वतीने या भागीदारीची घोषणा आज करण्यात आली. विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर इंडिगो एअरलाइन्स या नवी मुंबई विमानतळावरून सर्वप्रथम हवाई सेवा सुरू करणार आहे. सुरुवातीला 18 विमानांचे टेकऑफ आणि 18 विमानांचे लॅण्डिंग होणार आहे. त्यानंतर येत्या नोव्हेंबरपर्यंत विमानांचे टेकऑफ आणि लॅण्डिंगची संख्या सुमारे 140च्या आसपास जाणार आहे. त्यामध्ये 30 आंतरराष्ट्रीय सेवांचाही समावेश असणार आहे. या भागीदारीचा करार इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंगचे सीईओ अरुण बन्सल यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.
दोन कोटी प्रवासी हाताळणार
नवी मुंबई विमानतळाचे पहिल्या टप्प्यातील काम सध्या पूर्ण झाले आहे. या पहिल्या टप्प्यात विमानतळाची क्षमता वार्षिक दोन कोटी प्रवासी हाताळण्याची आहे. विमानतळाचे चारही टप्पे पूर्ण झाल्यानंतर प्रवासी हाताळण्याची वार्षिक क्षमता थेट 9 कोटीपर्यंत जाणार आहे. तसेच या विमानतळावरून पहिल्या टप्प्यात 500 टन मालाची वाहतूक होणार आहे. विमानतळाचा पूर्ण विस्तार झाल्यानंतर मालवाहतुकीची वार्षिक क्षमता 32 कोटी टनापर्यंत जाणार आहे.
उड्डाणाची तयारी पूर्ण
1 हजार 160 हेक्टरमध्ये विस्तारलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या टप्प्यातील उड्डाणाची तयारी सध्या पूर्ण करण्यात आली आहे. धावपट्टी, टॅक्सी रनवे यांची कामे पूर्ण झाली आहे. येत्या 7 ऑगस्टपर्यंत विमानतळ टेकऑफ आणि लॅण्डिंगसाठी उपलब्ध नसल्याची नोटीस हवाई प्राधिकरणाने विमान कंपन्या आणि वैमानिकांना दिली आहे. त्यामुळे या विमानतळाचे उद्घाटन ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अदानी समूह आणि सिडकोने मात्र विमानतळाच्या उद्घाटनाबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List