नितीश कुमार यांची ‘इव्हेंटबाजी’, शहीद जवानाच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी रेड कार्पेट; लाखो रुपये केले खर्च
जम्मू कश्मीरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बीएसएफचे उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज हे शहीद झाले होते. मोहम्मद इम्तियाज हे बिहारच्या छपरा जिल्ह्यातील नारायणपूरचे रहिवासी होते. बिहारची राजधानी पाटणा येथे विमानाने त्यांचे पार्थिव शरीर आल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तेथे जाणे अपेक्षित होते. मात्र त्यावेळी मुखमंत्री तिथे गेले नाहीत. बुधवारी नितीश कुमार यांनी इम्तियाज यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मात्र या भेटीसाठी लाखो रुपये खर्च झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेसने याला नितीश कुमार यांची इव्हेंटबाजी म्हटले आहे.
10 मे रोजी मोहम्मद इम्तियाज हे पाकिस्तानने आर एस पुरा भागात केलेल्या गोळीबारात शहीद झाले. घटनेच्या चार दिवसानंतर बुधवारी नितीश कुमार यांनी इम्तियाज यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मात्र या पाच मिनिटांच्या भेटीसाठी नितीश कुमारांकरिता लाखो रुपये खर्च करण्यात आले. नितीश कुमार येणार म्हणून गावात एक मोठा तंबू बांधून तिथे रेड कार्पेट घालण्यात आले होते. तसेच मोठ मोठे सोफे, पंखे तिथे ठेवण्यात आलेले.
नितीश कुमारांसाठी केलेल्या या रेड कार्पेट सोयींवरून काँग्रेस व राजदने जोरदार टीका केली आहे. ‘आपले जवान शहीद झाले आहेत त्यामुळे संपूर्ण देश दुखी आहे. मात्र या दुखाच्या क्षणी देखील नितीश कुमार यांना इव्हेंटबाजी करत आहेत. नितीश कुमार यांचे हे असंवेदनशील वागणं शहीद कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. हे अत्यंत लाजिरवाणे आहे. देश सर्व बघतोय”, असे ट्विट काँग्रेसने केले आहे.
नितीश कुमारांच्या भेटीपूर्वी बांधले रस्ते
मुख्यमंत्री येणार म्हणून नारायणपूर गावात दीड किलोमीटरचा पक्का रस्ता बांधण्यात आला. मंगळवारी रात्री घाई घाईत या कामाला सुरुवात करण्यात आली.
इम्तियाज यांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत
शहीद मोहम्मद इम्तियाज यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे 50 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. त्या मदतीचा धनादेश नितीश कुमार यांनी इम्तियाज यांच्या कुटुंबियांना दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List