टनेलमध्ये 718 तडे तरीही भुयारी मेट्रोचे उद्घाटन का केले? भ्रष्टनाथ आणि भाजपमुळेच मुंबईची तुंबई – आदित्य ठाकरे
पावसामुळे सोमवारी मुंबईची तुंबई झाली, त्याला भ्रष्टनाथ मिंधे आणि भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. पावसामुळे मुंबई व अन्य जिह्यांमध्ये लोकांचे जे नुकसान झाले त्याचे तातडीने पंचनामे करून नागरिकांना सरकारी तिजोरीतून भरपाई द्या. कारण हे सरकारचे अपयश आहे, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.
आदित्य ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पावसामुळे मुंबई आणि मुंबईकरांचे जे हाल झाले त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला जबाबदार धरले. राज्यात सरकार, प्रशासन, महानगरपालिका आहे की नाही अशी परिस्थिती सोमवारी होती, अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी यापूर्वी झालेल्या पावसात अंधेरी सब वे आणि साकीनाक्यात साचलेल्या पाण्याची छायाचित्रेही दाखवली. काल पावसामुळे नाही तर सरकारच्या अपयशामुळे मुंबई तुंबली, असे टीकास्त्र सोडत आदित्य ठाकरे यांनी गेल्या दोन-तीन वर्षांत महायुती सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचा पाढाच वाचून दाखवला. सिंधुदुर्गात शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेपासून मुंबईतील रस्ते घोटाळा, नालेसफाई घोटाळा अशी अनेक उदाहरणे त्यांनी दिली.
महानगरपालिकेत 92 हजार कोटी मुंबईकरांसाठी वाचवून ठेवले होते ते सरकारने खाली केले. महापालिकेची तिजोरी खाली केली. अडीच लाख कोटीचा डेफिसिट केला गेला. हा पैसा गेला कुठे? याचे उत्तर भाजपने दिले पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईच्या दोन्ही महामार्गावर गटारातून काढलेला गाळ तसाच ठेवला होता. श्रेय घ्यायला सरकार पुढे असते, कर लावायला पुढे असते मग आता दोष उघड झालेत तर मुंबईकरांना भरपाईही द्या, असे आदित्य ठाकरे पुढे म्हणाले. याप्रसंगी शिवसेना सचिव सूरज चव्हाण, साईनाथ दुर्गे आणि प्रवक्ते आनंद दुबे उपस्थित होते.
तुर्कीच्या कंपनीला हाकलून लावा
17-18 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले त्या भुयारी मेट्रोत पाणी भिंत फुटून बाहेर आले. मेट्रो प्रशासन म्हणते ती तात्पुरती भिंत होती, मग काय कोसळायला उभी केली होती? डॉगेस्टोमा या तुर्कीच्या कंपनीने भुयारीकरणाचे काम केले होते. पहलगाम घटनेनंतर तुर्कीच्या सेलेबी कंपनीला एअरपोर्टमधून काढून टाकले मग डॉगेस्टोमाला का काढून टाकले नाही? त्या कंपनीलाही हाकलून द्या, असे आदित्य ठाकरे म्हणाले. या कंपनीने मुद्दाम देशाला, मुंबईला धोका निर्माण करण्यासाठी असे केले नाही ना, असा सवालही त्यांनी केला. मेट्रोच्या टनेलमध्ये 718 तडे गेले आहेत असा रेल्वे सुरक्षा आयुक्तांचा अहवाल होता, तरीदेखील मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन कसे केले, अशी विचारणाही त्यांनी केली.
मुंबईकरांचे हाल करायचे प्लॅनिंग भाजपने केले होते का?
हिंदमाता हा पूर्वी तिथे दीडशे वर्षांपूर्वी तलाव होता. तो बुजवल्यानंतर तिथे वस्ती आली. सखल भाग असल्याने पाणी भरायचे. महाविकास आघाडी सरकार असताना 2021-22 मध्ये सेट झेवियर्स ग्राऊंड आणि प्रमोद महाजन उद्यानात पावसाचे पाणी साठवण्यासाठी टँक बनवले गेले. 300 मि.मी. पाऊस झाला तरी त्याचे पाणी तिथे साठते आणि नंतर ते समुद्रात सोडले जाते. पण सोमवारी तिथे पंप लावलेच नव्हते. पाणी तुंबल्यावर पंप आणले गेले, पण त्यामध्ये डिझेलच नव्हते. मुंबईकरांचे हाल करायचे प्लॅनिंग भाजपने केले होते का? असा संतप्त सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List