Vaishnavi Hagawane Case – वकिलालाच कोर्टात खेचण्याची वेळ आलीये! हगवणेंच्या वकिलाने केलेल्या अजब युक्तीवादावर अभिनेता भडकला
हुंडा आणि शारिरीक छळाला कंटाळून वैष्णवी (23) या तरुणीने अवघे 9 महिन्यांचे बाळ पदरात असताना टोकाचे पाऊल उचलले आणि आपले जीवन संपवले. या प्रकरणामुळे संपूर्ण देशभारात संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देऊन आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. याप्रकरणी तिचा नवरा, सासरा, सासू, नणंद आणि दिराला अटक करण्यात आली. दरम्यान, बुधवारी हगवणे कुटुंबाला न्यायालयात हजर करण्यात आले होते . यावेळी त्यांच्या वकीलाने केलेल्या युक्तीवादामुळे अजूनच संतापाचे वातावरण निर्माण झाले.
वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि दिर सुशील हगवणे यांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली. यानंतर हगवणे परिवाराला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी हगवणे कुटुंबीयांची बाजू मांडणाऱ्या वकिलांकडून अजब युक्तिवाद करण्यात आला. अमानुषपणे मारहाण करणाऱ्या, छळ करणाऱ्या हगवणे परिवाराच्या बचावासाठी कोर्टात त्यांच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे देखील उडवले. वैष्णवी नको त्या व्यक्तीसोबत चॅट करायची, तिचे चॅट पकडले असा संतापजनक दावा हगवणेच्या वकिलांनी केला. वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यासोबतच तिची प्रवृत्तीच आत्महत्या करणारी होती, असंही हगवणेंचे वकील म्हणाले आहेत.
वकीलावरच केस फाईल करण्याची वेळ आलीय!
हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात मांडणेदेखील अवमानकारक आहे…
कठीण आहे! https://t.co/2yV1ASigUQ
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) May 28, 2025
हगवणेंच्या वकीलाने केलेल्या युक्तीवादानंतर त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. अशातच मराठी कलाकारांनीही हगवणेंच्या वकिलावर ताशेरे ओढले. मराठी अभिनेता हेमंत ढोमेने ट्वीटरवर पोस्ट शेअर केली आहे. “वकीलावरच केस फाईल करण्याची वेळ आलीय! हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात मांडणेदेखील अवमानकारक आहे. कठीण आहे!” असं त्याने पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List