रिक्षावर झाड कोसळल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू, पेशवे पार्क परिसरातील घटना
पुणे शहरात बुधवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसात झाड कोसळल्याने रिक्षात प्रवास करणाऱ्या ७६ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पेशवे पार्कजवळ घडली, तर रिक्षाचालक जखमी झाला आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शुभदा यशवंत सप्रे (वय – 76, रा. सिंहगड रोड) असे मृत महिलेचे नाव आहे. रिक्षाचालक संजय अवचरे हे जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ना. सी. फडके चौकातून सिंहगड रस्त्याच्या दिशेने निघालेली रिक्षा पेशवे पार्कजवळ पोहोचताच अचानक उद्यानातील एक जुने गुलमोहराचे झाड मोडून रस्त्यावर कोसळले. या झाडाचा मोठा फांदीचा भाग थेट रिक्षावर पडला. अपघात इतका भीषण होता की, रिक्षाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना मदत केली. शुभदा सप्रे यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रिक्षाचालक संजय अवचरे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मुसळधार पावसात अशाप्रकारे झाडे कोसळण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून महापालिकेच्या वृक्ष देखभाल विभागावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
जबाबदारी कोण घेणार?
या घटनेनंतर पुन्हा एकदा महापालिकेच्या वृक्ष छाटणी आणि देखभाल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पावसाळ्यापूर्वी झाडांची तपासणी, छाटणी व नाजूक झाडांची विल्हेवाट लावणे आवश्यक असते; मात्र वेळेवर उपाययोजना न केल्यामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
दोन दिवसांपूर्वी तरुणाचा मृत्यू
दोन दिवसांपूर्वीच कर्वेनगर भागात झाड पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर आता ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. यापूर्वीही अशा घटनांनंतर महापालिकेने झाडांचे सर्वेक्षण आणि कटिंग करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु त्याची अंमलबजावणी अपुरी पडल्याचे दिसते. त्यामुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List