घरमालकीणीच्या मृत्यू दिवशीच तिच्या सोन्यावर डल्ला, घरकामगार महिलेला अटक
घर मालकीणीचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीची तयारीही सुरू झाली. हीच संधी साधून घरकाम करणाऱया महिलेने घरमालकीण व तिच्या सुनेच्या दहा तोळ्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. घरकामाच्या निमित्ताने किचनपर्यंत वावरणाऱया महिलेने घर मालकिणीच्या मृत्यूच्या दिवशीच निर्दयीपणाचा कळस गाठला. कुटुंब एकीकडे दुःखात असताना, त्यांच्या घरातील 9 लाखांचे दागिने चोरले. परंतु शाहूपुरी पोलिसांनी कौशल्याने तपास करून घरकामगार महिलेचा भांडाफोड करून तिच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत केले.
सीमा संजय कोकरे (कय 42, रा. शाहूपुरी, सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. सीमा कोकरे ही महिला शाहूपुरीतीलच महेंद्र अशोक पवार (वय 38) यांच्या घरी सहा महिन्यांपासून काम करत होती. त्यामुळे तिचा वावर अगदी स्वयंपाकघरापर्यंत होता. रोजचे येणे-जाणे असल्यामुळे तिच्यावर विश्वास होता. परंतु 17 मे 2025 रोजी घरमालकीणीचे अचानक निधन झालं. अंत्यविधीची तयारी सुरू झाली. त्यावेळी सीमा कोकरे ही सुनेच्या लहान मुलाला मी सांभाळते, असे म्हणून घरात गेली. अंगणात मालकीणबाईंना अखेरचा निरोप दिला जात होता. त्यावेळी ही सीमा कोकरे कपाट उघडून घरातील दागिने चोरत होती. एक दोन नव्हे, तर तब्बल 9 लाख 60 हजारांचे साडेदहा तोळ्यांचे दागिने तिने चोरले. पवार कुटुंबीय अंत्यविधीवरून आल्यानंतर दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
ज्या घरात चोरी झाली तेथे जाऊन पोलिसांनी सर्व बाजूंनी पाहणी करून माहिती घेतली. त्यावेळी सीमा कोकरे ही बेडरूममध्ये बाळाला घेऊन बसली होती. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या दिवसांपासून पोलिसांनी तिच्यावर वॉच ठेवला. दोन दिवसांपूर्वी तिला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावलं. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली; परंतु विश्वासात घेताच, तिने चोरी केल्याची कबुली दिली.
पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश घोडके, नीलेश काटकर, मनोज मदने, जोतिराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, माधुरी शिंदे, कोमल पवार, गायत्री गुरव यांनी ही कारकाई केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List