Air India Plane Crash- विमान कंपनी आणि यूकेच्या लॉ फर्ममध्ये वाद, नुकसान भरपाईच्या नावाखाली अनावश्यक माहिती मागवल्याचा केला आरोप
अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत बळी गेलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी एअर इंडियावर गंभीर आरोप केले असून, भरपाईसाठी आर्थिक माहिती देण्यास भाग पाडले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडिया ही एअरलाइन ‘आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार’ असल्याचं म्हणत आहे. एअर इंडियाने स्पष्ट केलं आहे की, नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत पोहोचवण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे.
12 जून रोजी लंडनला जाणारी एआय 171 हे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण करताच बी. जे. मेडिकल कॉलेज जवळ कोसळले. या अपघातात एकूण 242 प्रवासी व क्रू मेंबर्सपैकी फक्त एक जण बचावला. अपघातात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे निवासस्थान उद्ध्वस्त झाले आणि अनेक जणांचा मृत्यू झाला. टाटा समूहाने प्रत्येक मृतांच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे, तर तात्पुरती 25 लाखांची भरपाई स्वतंत्रपणे देण्यात येत आहे.
यूकेमधील स्टुअर्ट्स लॉ नावाची कायदेशीर संस्था पीडित कुटुंबांकडून बोलणी करत असून, त्यांनी एअर इंडियाच्या प्रश्नावलीवर आक्षेप घेतला आहे. ही प्रश्नावली कायदेशीर भाषेत असून ती सामान्य व्यक्तीला समजणे कठीण असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कुटुंबांवर ‘भरपाई नाकारण्याच्या धमकीखाली’ ही माहिती भरायला लावली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
एअर इंडियाने स्पष्टीकरण देत सांगितले की, भरपाई त्याच कुटुंबांना मिळावी जे खरेच त्या व्यक्तीवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून होते, यासाठी ‘हो’ किंवा ‘नाही’ या स्वरूपात माहिती विचारली जात आहे. अहमदाबादमधील ताज स्कायलाइन हॉटेलमध्ये मदत केंद्र उघडण्यात आले असून, प्रश्नावली ई-मेलद्वारेही पाठवली जात आहे. तसेच, एअर इंडियाचे कर्मचारी माहिती समजावून सांगण्यासाठी उपस्थित आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले.
एअर इंडियाने आतापर्यंत 47 कुटुंबांना तात्पुरती भरपाई दिल्याचं सांगितलं असून, आणखी 55 प्रकरणांची पडताळणी सुरू आहे. बाकी कुटुंबांशी सातत्याने संवाद ठेवत त्यांना शक्य तितक्या लवकर मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. कोणतीही चुकीची माहिती पसरवू नये, यासाठी त्यांनी सर्व संबंधितांकडून जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले आहे.
UK Law Firm Alleges Air India Threatened Plane Crash Victims’ Families Over Compensation
Families of Air India crash victims claim they were pressured for financial data under threat of no compensation. Airline denies allegations.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List