पंचगंगेच्या पातळीत वाढ; 50 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यात कधी विश्रांती, तर कधी संततधार अशी पावसाची उघडझाप अजूनही सुरूच आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि धरणातील विसर्ग यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत पंचगंगेच्या पाणीपातळीत एक फुटाची वाढ झाली. सायंकाळी सहाच्या सुमारास पाणीपातळी 32 फूट झाली होती, तर 50 बंधारे पाण्याखाली गेले होते.
दरम्यान जंगमहट्टी, घटप्रभा सर्पनाला, कोदे लपा पाठोपाठ आज सकाळी आंबेओहोळ हा मध्यम प्रकल्पही शंभर टक्के भरला. शिवाय वारणा धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, धरणातून 24 तासांत वक्राकार दरवाजासह विद्युतगृहातून एकूण 4500 क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिह्यातील राधानगरी धरण 69 टक्के भरले आहे. तर तुळशी-68, वारणा 76, दूधगंगा 55, कासारी 68, कडवी 76, कुंभी 69, पाटगाव 81, चिकोत्रा 64, चित्री 92 आणि धामणी 90 टक्के भरले आहे.
अलमट्टीसह हिप्परगी धरणातून विसर्ग वाढवावा
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील महापुराला कारणीभूत असलेला कर्नाटकातील अलमट्टीसह हिप्परगी धरणातील पाणीसाठा यंदाही आतापासूनच त्रासदायक ठरत आहे. अलमट्टीसह हिप्परगी धरणात महाराष्ट्रातील कृष्णा आणि पंचगंगा नदीतून जमा होणारे पाणी आणि त्या तुलनेत या दोन्ही धरणातून होणारा विसर्ग अत्यल्प असल्याने, परिणामी कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाण्याला फुग आली आहे. अलमट्टी धरणात महाराष्ट्रातून 93 हजार 965 क्युसेक पाणी जमा होत आहे. तर या धरणातून केवळ एक लाख क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. तसेच हिप्परगी धरणामध्ये 93 हजार 500 क्युसेक पाणी जमा होत असून, त्या तुलनेत विसर्ग मात्र केवळ 92 हजार 750 क्युसेक इतकाच होत आहे. त्यामुळे यंदा अलमट्टी धरणातील पाणीपातळी येत्या दि. 15 ऑगस्टपर्यंत 517.50 मीटरपर्यंत नियंत्रित ठेवण्यासंदर्भात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या दोन्ही सचिव स्तरावर झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार जलसंपदा विभागाने यावर देखरेखीसाठी अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे.
आढळा धरण तुडुंब
अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढळा धरण आज तुडुंब भरले असून, वाऱयाच्या लाटांनी सांडव्याबाहेर पाणी पडत असल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. लवकरच जल पूजनाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती अकोले उपविभागीय अभियंता योगेश जोरवेकर यांनी दिली.
एकंदर 1060 दलघफू क्षमता असलेले हे धरण चालूवर्षी जून अखेरीस भरल्यामुळे शेतकरी बांधव समाधानी आहेत. या पाण्यामुळे आता रब्बी पीक व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे. अकोले तालुक्यातील देवठाण, वीरगाव, हिवरगाव, डोंगरगाव, पिंपळगाव व गणोरे तसेच संगमनेर तालुक्यातील धांदरफळ जवळेकडलग, पिंपळगावकोंझिरा, वडगावलांडगा, चिकणी, राजापूर, निमगाव, चिखली ही आठ, गावे व सिन्नर तालुक्यातील नळवाडी व कासारवाडी दोन गावे, अशा या 16 गावांना शेतीसाठी याच आढळा धरणातून पाणी मिळते.
घाटघर, रतनवाडीत धुवाँधार पाऊस
निसर्गाचं वरदान असलेल्या भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाचे तांडव सुरू असल्याने धरणात येणाऱया नवीन पाण्याची आवक मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. यामुळे बुधवारी (दि. 2) सायंकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 7 हजार 38 दलघफू (63.76 टक्के), तर निळवंडेचा पाणीसाठा 4 हजार 429 दलघफू (53.18 टक्के) झाला आहे.
गेल्या 24 तासांत भंडारदरा जलाशयात 339 दलघफू, तर निळवंडेत 216 दलघफू नवीन पाणी जमा झाले आहे. यामुळे पाण्याच्या पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. याचबरोबर देवठाण येथील आढळा धरणाचा पाणीसाठाही बुधवारी सायंकाळी 96.23 टक्क्यांवर पोहोचला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत आढळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List