त्यांनी माझी पँट खाली खेचली..! उत्तर प्रदेशमध्ये कावड यात्रा मार्गावर पुन्हा राडा; धाबा मालक, कर्मचाऱ्यांची ओळख परेड
उत्तर प्रदेशमध्ये 11 जुलैपासून कावड यात्रा सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर यशवीर महाराज यांनी कावड यात्रा मार्गावरील दुकान मालक, कर्मचाऱ्यांची खरी ओळख समोर आणण्याची मोहीम सुरू केली आहे. यशवीर महाराजांची माणसं धाबा, मिठाईची दुकानं, चहाची टपरी येथे जाऊन ओळख परेड घेत आहे. या दरम्यान दुकान मालक आणि कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन झाल्याचेही समोर येत आहे. असाच एक प्रकार मुझफ्फरनगरमधील राष्ट्रीय महामार्ग 58 वरील पंडित जी वैष्णो धाब्यावर घडला. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची ओळख पटवण्यासाठी त्याची पँट उतरवण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कावड यात्रा मार्गावरील हिंदू नाव असणाऱ्या धाबा मालकांची आणि तेथील कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी स्वत:ला पिठाधीश्वर म्हणणाऱ्या यशवीर महाराजांकडून मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत मुझफ्फरनगर येथील पंडित जी वैष्णो धाब्यावर यशवीर महाजारांची लोक पोहोचली. तिथे स्कॅनरवर मुस्लिम नाव पाहून लोक धाब्यावरील कर्मचाऱ्यांना आधारकार्ड मागू लागले. आधार कार्ड न दाखवल्याने कर्मचाऱ्यांची पँट उतरवण्यात आली, असा दावा केला जात आहे. याच धाब्यावर काम करणाऱ्या तजम्मूल नावाच्या कर्मचाऱ्याने याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
पंडित जी वैष्णो धाब्यावर तजम्मूल हा गोपाळ हे नाव घेऊन काम करत होता. भीती आणि धाबा मालकाच्या सांगण्यावरून आपण हिंदू नाव धारण केल्याचे त्याने सांगितले. माझे नाव तजम्मूल आहे. धाबा मालक शर्माजी यांनी मला गोपाळ हे नाव धारण करून काम करण्यास सांगितले होते. कावड यात्रे दरम्यान कोणताही राडा होऊ नये म्हणून त्यांनीच मला हातात कडे घालायला सांगितले होते. तीन महिन्यापासून मी कडे घालून काम करतोय, असे तजम्मूलने माध्यमांशी बोलताना सांगितले. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
नेमके काय घडले?
28 जून रोजी स्वामी यशवीर महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांसह धाब्याला भेट दिली. यावेळी तजम्मूलने स्वत:ची ओळख गोपाळ अशी करून दिली. त्याच्याकडे आधारकार्ड मागितले असता त्याने ते गहाळ झाले आणि फोन तुटल्याचे सांगितले. यानंतर महाराजांसोबत असलेल्या माणसांनी मला मारहाण केली, माझी पँट खाली खेचली, असे तजम्मूलने सांगितले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
6 जणांना समन्स
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण पेटले. विरोधकांनी योगी सरकारला घेरल्यानंर मुझफ्फरनगर पोलिसांनी सहा जणांना समन्स बजावले. सुमीत, रोहित, विवेक, सनी, राकेश आणि सुमित बहराघी अशी आरोपींची नावे असून ते स्वामी यशवीर महाराजांच्या आश्रमाशी संबंधित आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List