“हिंदुस्थानचा ‘विकास’ विदेशात फिरतोय अन्…”, वाराणसीतील विहिरीएवढा खड्डा दाखवत संजय राऊतांचा मोदींना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या घाना, त्रिनिदाद अँड टोबॅगोसह पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. तिथे मोदींचे पर्यटन सुरू असताना इकडे त्यांचा मतदारसंघ वाराणसीमध्ये रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. वाराणसीतील रस्त्यावर विहिरीएवढा खड्डा पडला आहे. यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून अपघाताला आमंत्रण मिळत आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एक फोटो मोदींच्या वाराणसी मतदारसंघातील आहे. यात रस्त्यावर विहिरीएवढा खड्डा पडल्याचे दिसतेय. तर दुसऱ्या फोटोत मोदी विदेशात जेवणाचा आस्वाद घेताना दिसताहेत. या फोटोंसोबत राऊत यांनी मोदींवर टीका करणारे कॅप्शनही लिहिले आहे.
“नरेंद्र मोदी सध्या घाना, त्रिनिदाद वगैरे देशांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचे हिंडणे, फिरणे, पर्यटन जोरात आहे! त्यांच्या वाराणसी मतदार संघातल्या रस्त्यांची ही अशी अवस्था आहे! विदेशांत भारताच्या विकासावर प्रवचने, वाराणशीत ही अशी अवस्था! भारताचा विकास विदेश दौऱ्यावर आहे!”, अशी टीका राऊत यांनी केली. या संदर्भात त्यांना माध्यमांनीही प्रश्न विचारला.
नरेन्द्र मोदी सध्या घाना,त्रिनिदाद वैगरे देशांच्या दौऱ्यावर आहेत,
त्यांचे हिंडणे फिरणे पर्यटन जोरात आहे!
त्यांच्या वाराणसी मतदार संघातल्या रस्त्यांची ही अशी अवस्था आहे!
विदेशांत भारताच्या विकासावर प्रवचने…वाराणशीत ही अशी अवस्था!
भारताचा विकास विदेश दौऱ्यावर आहे! pic.twitter.com/OLsNZs8cwz— Sanjay Raut (@rautsanjay61) July 4, 2025
आज सोशल मीडियावर वाराणसीतील रस्त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा मतदारसंघ आहे. तिथून निवडून आलेले सदस्य देशाचे पंतप्रधान आहेत. ते आपल्या मतदारसंघातील रस्ते नीट करू शकत नाहीत. तिथे विकास होत नाही आणि हे विकासपुरुष घाना, त्रिनिदाद अँड टोबॅगो अशा महान देशात फिरताहेत, तिथल्या राष्ट्रपतींसोबत जेवणावळ्या झोडताहेत आणि इकडे वाराणसीची जनता त्यांचा शोध घेत आहे, असे राऊत म्हणाले.
वाराणसीच्या रस्त्यांवर विहिरीएवढे खड्डे झाले आहेत. या खड्ड्यात एवढे अपघात झालेत की त्याची चर्चाच नाही. कारण वाराणसीची विकास विदेशात फिरतोय. पंतप्रधान हेलिकॉप्टरने येतात, त्यामुळे त्यांना रस्ते कसे दिसतील? असा खोचक सवालही राऊत यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List