केंद्राने पाकिस्तानी टीमला पायघड्या घातल्या, हे न खपणारे! अंबादास दानवेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यान तणावाची परिस्थिती असतानाही हॉकी आशिया चषक व ज्युनियर वर्ल्ड कपसाठी यजमान हिंदुस्थानने पाकिस्तानी संघाला दौऱ्यासाठी ग्रीन सिग्नल दिला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला आहे.
अंबादास दानवे यांनी शुक्रवारी सकाळी एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवर ट्विट करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. पहलगाम हल्ल्यातील लोकांचे रक्तही वाळले नसेन आणि केंद्राने पाकिस्तानी टीमला पायघड्या घातल्या. हे न खपणारे आहे, अशी टीका दानवे यांनी केली.
“त्यांनी धर्म विचारून आपली माणसे मारायची आणि केंद्र सरकारने पाकिस्तानी संघ खेळायला बोलवायचे! पहलगाम हल्ल्यातील लोकांचे रक्तही वाळले नसेल अजून की केंद्राने पाकिस्तानी टीमला पायघड्या घातल्या. असे असेल तर हे न खपणारे आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर हेच यांचे ‘न्यू नॉर्मल’ आहे का?”, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला.
क्रीडा मंत्रालय काय म्हणाले?
आम्ही फक्त द्विपक्षीय मालिकेसाठी पाकिस्तानविरुद्ध खेळत नाही. मात्र, हिंदुस्थानात होणाऱया आंतरराष्ट्रीय स्पर्धांना आम्ही कुठल्याही संघांना हिंदुस्थानात येण्यासाठी अडविणार नाही, असे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले. त्यामुळे पाकिस्तानी संघाने ‘चलो बिहार’चा नारा बुलंद केला आहे.
पाकिस्तानी संघ 2016मध्ये हिंदुस्थानात आला नव्हता
पठाणकोट एअरबेसवर 2016मध्ये दहशतवादी हल्ल्यामुळे हिंदुस्थानात झालेल्या ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघाने सहभाग घेण्यास नकार दिला होता. म्हणून त्यावेळी पाकिस्तानाऐवजी मलेशियाला या स्पर्धेत संधी देण्यात आली होती. आता हिंदुस्थानात या वर्षी 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत चेन्नई व मदुराई येथे ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप होणार आहे. मात्र, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कुठल्याही देशाला आम्ही अडवणार नाही, असे सरकारने स्पष्ट केल्याने आता पाकिस्तानी संघ या स्पर्धेत सहभागी होणार की नाही याबाबतची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List