राजकीय भविष्य संपणार म्हणून मिंधे गटाच्या पोटात भीतीचा गोळा, संजय राऊत यांनी फटकारले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्रित येऊन हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवला. त्यामुळे सरकारला हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द करावा लागला. मराठी माणसाच्या एकजुटीमुळे मराठीचा विजय झाला. आता वरळी डोम येथे विजय मेळावा होत आहे. यामुळे आम्हाला सोडून गेलेल्या जुन्या सहकाऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे, अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रामदास कदम यांच्यासह मिंधे गटातील नेत्यांना फटकारले. ते शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी वरळी डोम येथे होणाऱ्या विजय जल्लोष कार्यक्रमाचीही माहिती दिली.
उद्या महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक दिवस आहे. मराठी माणसाच्या जीवनातला एक ऐतिहासिक आणि आनंदी दिवस आहे. एक तर मराठी विजय दिवस आहेच, पण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये नवे बदल घडवणारा हा दिवस आहे. उद्या वरळीतल्या डोम सभागृहात होणाऱ्या विजय जल्लोष कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्रित उपस्थित राहतील. याची महाराष्ट्राला प्रचंड उत्सुकता आहे, असे संजय राऊत म्हणाले.
लोक राज्याच्या कानाकोपऱ्यातून यायला निघाले आहेत. संपूर्ण कार्यक्रमाची तयारी शिवसेना आणि मनसेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रित करत आहेत. आज आम्ही तिकडे जाणार आहोत आणि उद्या साधारण सकाळी 11 वाजल्यापासून जल्लोषाचा कार्यक्रम सुरू आहे. हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे. खूप दिवसांनी मराठी माणसाच्या एकजुटीमुळे भाषा, संस्कृती म्हणून मराठी भाषेला विजयाचा दिवस पाहता आला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रित येऊन हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन पुकारले, त्यामुळे ही एकजूट शक्य झाली. एकत्र येऊन त्यांनी मराठीचा विजय मिळवून दिला, असेही राऊत म्हणाले.
राजकीय भविष्य संपणार म्हणून शिवसेना सोडून गेलेले आमचे जे जुने सहकारी आहेत त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. त्या भयातून, वैफल्यातून ते काहीही विधाने करत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या निमित्ताने मराठी माणूस एकत्र आला आहे आणि 5-25 टाळक्यांना हे एकत्र आलेले नको आहे. यात खास मिंधे गटाचे लोक आहेत. त्यांचे राजकीय भविष्यच खतम होत आहे. या भीतीपोटी त्यांना काहीही कल्पना सुचतेय. चाराण्याची भांग मारली की खूप कल्पना सुचतात, स्वप्न पडतात, तशी अवस्था त्यांची झाली आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
कालपर्यंत बाळासाहेबांचे असणारे मोदी-शहांचे झाले. त्यामुळे तुम्ही तेवढ्यापुरते बघा, आमच्यात पडू नका, असा इशाराच राऊत यांनी दिला. आता आमचे काय होणार? या भीतीग्रस्त वैफल्यातून मिंधे गटाची लोक वेगवेगळी विधाने करत आहेत. त्यामुळे त्यांनी मोदी, शहा, फडणवीस, बावनकुळे, महाजन यांची चिंता करावी. याच लोकांचे बूट तुम्हाला चाटायचे आणि पुसायचे आहेत. तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करू नका. शिवसेना, मनसेचे काय होणार याची चिंता करायचे कारण नाही, असेही राऊत यांनी ठणकावले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List