पिंपळे सौदागरमध्ये ३० व्या राष्ट्रीय स्पोर्ट क्लायम्बिंग अजिंक्यपद स्पर्धेचा थरार
भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याकडून खेळाडूंना प्रोत्साहन
पिंपळे सौदागर : साहस, कौशल्य, शारीरिक क्षमता आणि जिद्दीचा अनोखा संगम असलेल्या ३० व्या राष्ट्रीय स्पोर्ट क्लायम्बिंग अजिंक्यपद स्पर्धेला पिंपळे सौदागर येथे उत्साहात सुरुवात झाली आहे. इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशन आणि महाराष्ट्र क्लायम्बिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित ही स्पर्धा पिंपळे सौदागर येथील योगा पार्कमधील क्लायम्बिंग कॉम्प्लेक्स येथे सुरू आहे.
या स्पर्धेदरम्यान भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी स्पर्धास्थळी भेट देत खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.
या राष्ट्रीय स्पर्धेत स्पोर्ट क्लायम्बिंग या साहसी क्रीडा प्रकारातील खेळाडूंना आपले कौशल्य आणि क्षमता दाखविण्याची संधी मिळत आहे. उंच क्लायम्बिंग वॉलवर चढताना वेग, संतुलन, एकाग्रता, तंत्र आणि शारीरिक ताकद यांचा कस लागतो. प्रत्येक प्रयत्नात खेळाडूंची जिद्द आणि आत्मविश्वास अनुभवायला मिळत असून स्पर्धेच्या ठिकाणी क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यावेळी शत्रुघ्न काटे यांनी स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीची पाहणी केली. खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या तयारीची आणि अनुभवांची माहिती घेतली. राष्ट्रीय स्तरावरील अशा स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळते, तसेच साहसी क्रीडा प्रकारांविषयी तरुणांमध्ये आवड निर्माण होण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.
पिंपळे सौदागर येथील योगा पार्कमधील क्लायम्बिंग कॉम्प्लेक्समुळे शहरातील क्रीडा सुविधांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. अशा स्पर्धांमुळे स्थानिक पातळीवर क्रीडा संस्कृतीला चालना मिळण्यासोबतच नव्या पिढीला साहसी खेळांकडे आकर्षित करण्यास मदत होणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहराला क्रीडा क्षेत्रातील एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून, खेळाडूंच्या सहभागामुळे आणि उत्साहामुळे स्पर्धेचे वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.
“पिंपळे सौदागर येथे राष्ट्रीय स्तरावरील स्पोर्ट क्लायम्बिंग स्पर्धेचे आयोजन होणे ही आपल्या शहरासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अशा स्पर्धांमुळे खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळते. स्पोर्ट क्लायम्बिंगसारख्या साहसी खेळासाठी शारीरिक ताकदीसोबतच मानसिक एकाग्रता, आत्मविश्वास आणि जिद्द आवश्यक असते. खेळाडूंची मेहनत आणि त्यांचा उत्साह निश्चितच प्रेरणादायी आहे. शहरात अशा राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत राहावे आणि स्थानिक खेळाडूंनाही या माध्यमातून प्रोत्साहन मिळावे, यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचा आमचा प्रयत्न राहील. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा!”
– शत्रुघ्न (बापू) काटे
शहराध्यक्ष,भाजप,पिंपरी चिंचवड शहर
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List