राज्याच्या आरोग्य विभागाला मिळणार ३५० अद्ययावत रुग्णवाहिका
हिवाळी अधिवेशनापूर्वी प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात वितरणाचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश; एकात्मिक कॉल सेंटर उभारण्याचाही प्रस्ताव
मुंबई : राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, आपत्कालीन रुग्णसेवेला बळ देण्यासाठी आरोग्य विभागाच्या ताफ्यात लवकरच ३५० अद्ययावत रुग्णवाहिकांची भर पडणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघात या रुग्णवाहिकांचे वितरण करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.
मंत्रालयात रुग्णवाहिकांच्या लोकार्पणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री आबिटकर बोलत होते. यावेळी आरोग्य आयुक्त डॉ. संजय काटकर तसेच संबंधित एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. नव्या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून आपत्कालीन रुग्णसेवा अधिक गतिमान करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या वाहनांचे ब्रँडिंग आठ ते दहा दिवसांत पूर्ण करावे, तसेच वाहन नोंदणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश आबिटकर यांनी दिले.
लोकार्पणानंतर स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत संबंधित मतदारसंघांमध्ये या रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात येणार आहे. या रुग्णवाहिकांमध्ये प्रशिक्षित डॉक्टर, वाहनचालक आणि सहायकांसह आधुनिक लाइफ सपोर्ट सिस्टिम उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मंत्री आबिटकर यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी १२०० प्रशिक्षित मनुष्यबळाचाही उल्लेख केला.
चालक व्यवस्थापनावरही लक्ष
रुग्णवाहिकांच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना नवीन वाहनांची उपलब्धता, चालकांची नियुक्ती आणि त्यांचे व्यवस्थापन या मुद्द्यांवर मंत्री आबिटकर यांनी भर दिला. १०२ रुग्णवाहिकांच्या पेट्रोल कार्ड वितरणाचा प्रश्न तसेच वाहनचालकांशी संबंधित अडचणी तातडीने निकाली काढून या रुग्णवाहिकांचे कामकाज गतिमान करावे, असे त्यांनी सांगितले.
रुग्णवाहिका सेवेत कामकाजादरम्यान त्रुटी आढळणाऱ्या चालकांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नवीन रुग्णवाहिकांचे वितरण, आपत्कालीन सेवांमधील समन्वय आणि चालक व्यवस्थापनाच्या माध्यमातून राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम करण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपत्कालीन सेवांसाठी एकात्मिक कॉल सेंटर
दरम्यान, न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक सुसूत्र आणि प्रभावी करण्यासाठी एकात्मिक कॉल सेंटर उभारण्याचा प्रस्तावही पुढे आला आहे. १०२, १०८ आणि ११२ या आपत्कालीन सेवांसह खासगी रुग्णवाहिकांचा समन्वय साधणारी यंत्रणा उभारण्याबाबत परिवहन आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या व्यवस्थेमुळे विविध आपत्कालीन सेवांमधील रुग्णवाहिकांची उपलब्धता एकाच ठिकाणी समन्वित करता येणार आहे. परिणामी, गरजू रुग्णांना वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास मदत होईल. नव्या रुग्णवाहिका आणि एकात्मिक कॉल सेंटरच्या माध्यमातून राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List