दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे; गिरीश महाजन यांचे निर्देश
पाणीटंचाई, चाराटंचाई आणि रोजगाराच्या प्रश्नांवर आतापासून नियोजन करा; सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांनाही गती देण्याच्या सूचना
मुंबई : जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच सर्वंकष नियोजन करावे. नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा व पाणी तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. जिल्ह्यात पाणीटंचाई किंवा चाराटंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास कांदे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार भास्कर भगरे, विविध आमदार, उपमहापौर विलास शिंदे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण क्षमतेने सज्ज राहणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेत कोणतीही कमतरता राहता कामा नये. प्रत्येक अधिकाऱ्याने जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारून प्रभावीपणे काम करावे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून कामकाज करावे, असे महाजन यांनी स्पष्ट केले.
जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कामांचा दर्जा आणि गुणवत्ता राखण्यासोबतच तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया गतिमान करावी. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, वीजपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी आणि नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, अशा सूचना त्यांनी केल्या. विकासकामांच्या अंमलबजावणीत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन राजशिष्टाचाराचे पालन करण्याचेही त्यांनी सांगितले.
गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यावर भर
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना गती देतानाच संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे महाजन यांनी सांगितले. गोदावरी नदीत थेट सांडपाणी मिसळू नये, यासाठी सांडपाणी वाहिन्या आणि प्रक्रिया केंद्रांची व्यवस्था करण्यात येत आहे. आगामी चार ते पाच महिन्यांत ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. कुंभमेळ्याच्या मुख्य पर्वणीपूर्वी गोदावरीत स्वच्छ पाणी प्रवाहित करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गोदावरी नदी वर्षभर प्रवाही ठेवण्याबरोबरच तिचे प्रदूषण रोखणे महत्त्वाचे आहे. नदीचे पाणी स्वच्छ करून नदीपात्रात सोडण्याचे नियोजन असून, त्यामुळे रामकुंड परिसरात येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पाण्याचा अनुभव घेता येईल. कुंभमेळ्यापर्यंत नाशिकमधील अनेक विकासकामे पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शहरातील हरितीकरणाच्या कामांचाही महाजन यांनी आढावा घेतला. शहरात सुमारे ७० हजार झाडे लावण्यात आली असून, त्यांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि खत दिले जात आहे. ही झाडे मोठी होत असून पर्यावरण संवर्धनाचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना प्राधान्याने निधी द्या
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पायाभूत सुविधांचा विकास आणि शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्याची सूचना केली. या शाळांमध्ये सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने शाळांच्या इमारती, दुरुस्ती आणि आवश्यक सुविधांसाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन व संबंधित विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
केवळ शासनाच्या आदेशांवर अवलंबून न राहता समन्वयाने काम केल्यास शाळांचे प्रश्न मार्गी लागू शकतात. संभाव्य दुष्काळ लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा व पाणी तसेच रोजगार हमी योजनेतील कामांचे नियोजन आतापासून करावे. पुढील नऊ महिन्यांतील संभाव्य परिस्थितीचा विचार करून सर्व विभागांनी पूर्वतयारी करावी, असेही भुसे यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी महापालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा सादर केला. सिंहस्थ कुंभमेळा आणि जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध विकासकामांना वेग आला असून, त्याचा स्थानिक उद्योग, व्यवसाय आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी संलग्न क्षेत्रासह ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांमध्येही वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघांतील विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि दुष्काळी उपाययोजनांबाबत सूचना मांडल्या. जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List