लोहगावच्या आकाशात तिरंग्याची शान; हवाई कसरतींनी पुणेकर मंत्रमुग्ध
‘नो यूवर फोर्सेस’ मोहिमेअंतर्गत एअर शोचे आयोजन; १३ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि नागरिकांची उपस्थिती
पुणे : आकाशात उमटलेले तिरंग्याचे रंग, ‘सुखोई’ विमानांचा कानठळ्या बसवणारा आवाज, सारंग हेलिकॉप्टर्सच्या चित्तथरारक कसरती आणि ‘सूर्यकिरण’ विमानांच्या नेत्रदीपक हवाई हालचाली... अशा रोमांचक वातावरणात शुक्रवारी लोहगाव येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर आयोजित एअर शो रंगला. भारतीय हवाई दलाच्या ‘नो यूवर फोर्सेस’ या मोहिमेअंतर्गत आयोजित या कार्यक्रमाने उपस्थितांना देशाच्या हवाई सामर्थ्याची झलक अनुभवण्याची संधी दिली. विविध लष्करी उपकरणे, विमाने आणि संरक्षणविषयक तंत्रज्ञानाचे प्रदर्शनही यावेळी भरविण्यात आले होते.
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य दलांची कार्यपद्धती, क्षमता आणि देशाच्या संरक्षणातील योगदानाची माहिती मिळावी, तसेच तरुणांना लष्करी सेवेत दाखल होण्याची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या एअर शोला शहर आणि परिसरातील सुमारे १३ हजारांहून अधिक विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांनी उपस्थिती लावली. विमानांच्या हवाई कसरती पाहताना प्रेक्षकांनी मोबाइलमध्ये प्रत्येक क्षण टिपला. विमानांची रचना, लष्करी उपकरणे आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांसोबत छायाचित्रे काढण्यासाठीही मोठी गर्दी झाली होती.
‘सुखोई’च्या गर्जनेने एअर शोची सुरुवात
‘सुखोई’ लढाऊ विमानांच्या दणदणाटी ‘फ्लायपास्ट’ने एअर शोची सुरुवात झाली. वेगवान उड्डाणे आणि कमी उंचीवरून केलेल्या हवाई हालचालींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर ‘आकाशगंगा’ स्काय डायव्हिंग पथकाने विमानातून उड्या घेत पॅराशूटच्या साहाय्याने आकाशात विविध प्रात्यक्षिके सादर केली. पथकातील सदस्यांनी हवेत केलेल्या हालचालींना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
सारंग हेलिकॉप्टर्सच्या कसरतींनी वेधले लक्ष
स्वदेशी बनावटीच्या ‘एएलएच ध्रुव’ हेलिकॉप्टर्सचा समावेश असलेल्या ‘सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीम’ने आपल्या सादरीकरणातून उपस्थितांना थक्क केले. पाच हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून विविध हवाई कसरती सादर करण्यात आल्या. पाचही हेलिकॉप्टर्सची एकत्रित रचना, अचूक समन्वय आणि क्षणार्धात होणारे दिशाबदल हे या सादरीकरणाचे वैशिष्ट्य ठरले. ‘डॉल्फिन लीप’, ‘वाईनग्लास’ आणि ‘डायमंड’ या फॉरमेशन्सनी प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले. दोन हेलिकॉप्टर्सचे जवळून झालेले क्रॉसिंग पाहताना उपस्थितांनी श्वास रोखून धरला.
‘सूर्यकिरण’च्या तिरंगी धुराने आकाश रंगले
‘सूर्यकिरण एरोबॅटिक टीम’च्या नऊ ‘हॉक एमके-१३२’ जेट विमानांनी सादर केलेल्या कसरती एअर शोचे प्रमुख आकर्षण ठरल्या. ‘डायमंड’, ‘क्लोज ट्रेल’, ‘क्रॉसओव्हर’ आणि ‘लूप’ अशा विविध रचना आणि हवाई प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. विमानांनी एकमेकांच्या जवळून केलेली उड्डाणे, आकाशात तयार केलेल्या विविध आकृत्या आणि अचूक समन्वयातून सादर केलेल्या कसरतींना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अखेरीस विमानांतून केशरी, पांढऱ्या आणि हिरव्या रंगांचा धूर सोडत आकाशात तिरंगी पट्टा साकारण्यात आला. हा क्षण पाहताच उपस्थितांनी ‘भारत माता की जय’चा जयघोष केला.
विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय अनुभव
एअर शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय हवाई दलाची कार्यक्षमता, लढाऊ विमानांची क्षमता आणि देशाच्या संरक्षणातील हवाई दलाचे महत्त्व जवळून समजून घेता आले. हवाई दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळाली. विमानांची इंजिन्स, शस्त्रास्त्रे आणि रडार यांविषयी अधिकाऱ्यांनी सोप्या भाषेत माहिती दिली. देशाचे रक्षण करणारे जवान किती कठीण प्रशिक्षण घेतात, याची प्रत्यक्ष जाणीव झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
‘हवाई दलात लढाऊ वैमानिक होण्याचा माझा निश्चय या एअर शोमुळे अधिक पक्का झाला,’ अशी भावना आर्या देशमुख या विद्यार्थिनीने व्यक्त केली. तर, ‘एअर शो पाहण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. विमानांची इंजिन्स, शस्त्रे आणि रडारची माहिती अधिकाऱ्यांनी सोप्या शब्दांत सांगितली. देशाचे रक्षण करणारे जवान किती कठीण प्रशिक्षण घेतात, हे प्रत्यक्ष पाहता आले,’ असे तन्मय कुलकर्णी या विद्यार्थ्याने नमूद केले. या एअर शोमुळे विद्यार्थ्यांमध्ये हवाई दलाविषयी कुतूहल निर्माण होण्यासोबतच देशसेवेची प्रेरणाही मिळाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List