बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक होणार

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे धोरण; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक होणार

पिंपरी-चिंचवड : शहरातील वाढती लोकसंख्या आणि जलस्रोतांवरील ताण लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. बांधकाम प्रकल्पांसाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर बंधनकारक करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यावरील ताण कमी होण्यासह भूजल पातळीचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या सात वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या प्रक्रिया केलेले सांडपाणी काही उद्यानांसाठी वापरले जाते. आता त्याचा वापर बांधकाम प्रकल्पांसाठीही उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

महापालिकेच्या मैलाशुद्धीकरण केंद्रांमधून दररोज सुमारे ५० एमएलडी प्रक्रिया केलेले सांडपाणी उपलब्ध होते. मात्र, बांधकाम क्षेत्रात या पाण्याचा वापर बंधनकारक नसल्याने विकासकांकडून पिण्याचे तसेच बोअरवेलचे पाणी वापरले जाते. त्यामुळे भूजल पातळीवर परिणाम होत आहे. नागपूर, सुरत आणि बंगळुरू यांसारख्या शहरांमध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी उद्योग व बांधकाम क्षेत्रासाठी पुरविले जाते. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवडमध्येही हे धोरण राबविण्यात येणार आहे.

नव्या धोरणानुसार बांधकाम प्रकल्पांसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरणे अनिवार्य करण्यात येणार आहे. ही अट बांधकाम परवानगी नियमावलीत समाविष्ट करण्यासाठी नियमावली तयार केली जात आहे. विकासक किंवा बांधकाम व्यावसायिकाने निर्धारित शुल्क जमा केल्यानंतर त्यांना प्रक्रिया केलेले पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. अतिरिक्त पाण्याची आवश्यकता असल्यास महापालिकेच्या मैलाशुद्धीकरण केंद्रातून प्रचलित दरानुसार पाणी पुरविले जाईल.

प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर न करणाऱ्या संबंधित व्यक्ती किंवा संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूदही प्रस्तावित आहे. महापालिकेच्या सर्व मैलाशुद्धीकरण केंद्रांवर टँकरद्वारे पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. टँकर किंवा पाइपलाइनद्वारे पाणी घेण्यासाठी आवश्यक व्यवस्था संबंधित बांधकाम व्यावसायिकांना स्वतःच्या खर्चाने करावी लागणार आहे.

या धोरणामुळे बांधकाम क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचा वापर कमी होईल, बोअरवेलवरील अवलंबित्व घटेल आणि भूजलसाठ्याचे संरक्षण होण्यास मदत होईल. तसेच प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर वाढून महापालिकेला महसूलही मिळणार आहे.

वाढत्या नगरीकरणामुळे भविष्यात पाणी प्रश्न तीव्र होऊ नये, यासाठी महापालिकेच्यावतीने कठोर पावले उचलली जात आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्प होत असल्याने भूजल पातळीवर परिणाम होत आहे. त्यामुळे बांधकामांसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचाच वापर बंधनकारक करण्यात येणार आहे; अन्यथा कारवाई केली जाईल. यासंदर्भात विकासक व बांधकाम व्यावसायिकांना काही अडचणी असल्यास त्यांना मदत केली जाणार आहे.

 - डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक होणार बांधकामांसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक होणार
पिंपरी-चिंचवड : शहरातील वाढती लोकसंख्या आणि जलस्रोतांवरील ताण लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची बचत करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. बांधकाम...
बेकायदा होर्डिंग्जवरील कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक
इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉनमुळे २९ नोव्हेंबरला शहरातील १५ मार्ग बंद
अतिक्रमणांना विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; आयुक्तांचे प्रशासनाला आदेश
सांगवीतील नूतनीकरण केलेल्या संविधान शिल्पाचे लोकार्पण
राज्यात ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ प्रणाली लागू होणार; प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र ओळख
राज्याच्या आरोग्य विभागाला मिळणार ३५० अद्ययावत रुग्णवाहिका