कचरा व्यवस्थापनात महापालिका अपयशी; सुनेत्रा पवार यांची प्रशासनावर नाराजी
मोशी दुर्घटना, सहा महिन्यांपासून बंद असलेला वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आणि डेपोच्या क्षमतेवर उपस्थित केले प्रश्न; कचरा प्रक्रिया प्रकल्पाची स्वतः पाहणी करणार
पिंपरी-चिंचवड : शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या नियोजनात अनेक त्रुटी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प गेल्या सहा महिन्यांपासून बंद का आहे, मोशी दुर्घटनेनंतर कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, मोशी कचरा डेपोची क्षमता संपल्यानंतर पर्यायी जागेचे नियोजन झाले आहे का, असे सवाल त्यांनी प्रशासनाला केले. कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नाकडे आता अधिक गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा आणि शहराच्या भविष्यातील गरजांचे नियोजन करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी सोमवारी महापालिका प्रशासनासोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करण्याची इच्छा व्यक्त केली. प्रकल्पाचे काम सध्या कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहिती घेऊन स्वतः लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पाचे काम प्रलंबित न ठेवता तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या.
अजितदादांचे शहर घडवण्याचे स्वप्न पूर्ण करू!
शहराच्या विकासासाठी अजित पवार यांनी दिलेला वेळ, घेतलेले कष्ट आणि दाखवलेली निष्ठा यांची जाणीव प्रत्येकाला आहे. त्यांनी या शहरासाठी जितका वेळ दिला, तितका वेळ कदाचित आपल्या कुटुंबालाही दिला नसेल, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
अजित पवार सुरुवातीला या शहरात आले, तेव्हा पिंपरी-चिंचवडची परिस्थिती वेगळी होती. या शहराला सुंदर, नियोजनबद्ध आणि विकसित बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. शहर घडवताना त्यांनी अनेक माणसेही घडवली. त्यांच्या स्वप्नातील या शहरासमोर आज विविध प्रश्न निर्माण होत असल्याचे ऐकून मनाला वेदना होतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दुष्काळी परिस्थिती, वाढती लोकसंख्या आणि बदलत्या नागरी गरजांमुळे शहरासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. पक्ष कोणताही असो, सर्वपक्षीय नेत्यांनी शहराच्या विकासासाठी विशेष लक्ष द्यावे, ही अजित पवार यांची इच्छा होती. शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींना त्यांनी नेहमी निधी उपलब्ध करून दिला. आज देशात पिंपरी-चिंचवडचा उल्लेख झाला की अजितदादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, असेही त्या म्हणाल्या.
पालकमंत्री म्हणून अजितदादांप्रमाणेच माझेही या शहरावर प्रेम आहे. महायुती सरकार आणि मी स्वतः पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. शहरातील सर्व विकासकामे दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
मोशी कचरा दुर्घटनेबाबत प्रशासनाला जाब
मोशी येथील कचरा दुर्घटना अत्यंत वेदनादायी होती. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी कचरा नेणे थांबवण्यात आले. मात्र, त्यानंतर शहरातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जात आहे आणि त्यासाठी कोणती व्यवस्था करण्यात आली आहे, याची माहिती त्यांनी प्रशासनाकडून घेतली.
दुष्काळी परिस्थिती आणि स्थलांतराचे नियोजन करा
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे विविध भागांतील नागरिक रोजगार आणि इतर कारणांसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अचानक वाढणारा लोकसंख्येचा भार लक्षात घेऊन पाणीपुरवठा, निवारा, आरोग्य, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेसाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
पवना आणि इंद्रायणी नद्यांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी तसेच नदी पुनरुज्जीवनाच्या कामांना गती देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
औद्योगिक गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य
पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. औद्योगिक क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याबाबतही प्रशासनाला सूचना देण्यात आल्या. नाशिक फाटा ते एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम पूर्णत्वाकडे असून, लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पिंपरी-चिंचवडला पुन्हा देशातील अग्रगण्य आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम महापालिका बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. अजितदादांनी या शहरासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. शहराच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक अडचणीच्या वेळी मी महापालिका प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List