राज्यात ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ प्रणाली लागू होणार; प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र ओळख

मंजूर इमारतींमधील सदनिकांसाठी स्वतंत्र अधिकार अभिलेख; सात कोटी नागरिकांच्या मालमत्ता हक्कांशी संबंधित प्रारूप नियमावली प्रसिद्ध

राज्यात ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ प्रणाली लागू होणार; प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र ओळख

मुंबई : राज्यातील मंजूर आणि अधिकृत इमारतींमधील प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र ओळख आणि पूरक अधिकार अभिलेख देण्यासाठी राज्य शासन ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ प्रणाली लागू करणार आहे. महसूल विभागाने यासंबंधीची प्रारूप अधिसूचना २६ नोव्हेंबर २०२६ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. या नियमावलीचा मसुदा ३० दिवस नागरिकांच्या सूचना आणि हरकतींसाठी खुला राहणार आहे. प्राप्त अभिप्रायांचा विचार करून पुढील दोन महिन्यांत अंतिम नियमावली तयार करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या उपक्रमाचा राज्यातील सुमारे सात कोटी नागरिकांच्या मालमत्ता हक्कांशी संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्रालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी महसूल राज्यमंत्री योगेश कदम आणि सहसचिव संजय बनकर उपस्थित होते. ‘महाराष्ट्र जमीन महसूल इमारतीमधील सदनिकांचे अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, २०२६’ या प्रारूप अधिसूचनेवरील हरकती, सूचना आणि कार्यालयीन अभिप्राय एकत्रित करून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

सदनिकेला मिळणार स्वतंत्र ओळख

ग्रामीण भागातील जमिनींसाठी सातबारा, तर नागरी भागातील जमिनींसाठी मिळकत पत्रिका उपलब्ध आहे. मात्र, इमारतीतील स्वतंत्र सदनिकेला महसुली अभिलेखात स्वतंत्र ओळख मिळत नाही. सदनिकाधारकांकडे नोंदणीकृत दस्त आणि मालमत्ता कराची नोंद असली, तरी स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध नसते. ही त्रुटी दूर करून राज्यभर एकसमान व्यवस्था लागू करण्यासाठी महसूलविषयक नियमांमध्ये सुधारणा प्रस्तावित करण्यात आली आहे.

नव्या प्रणालीत जमीन आणि इमारतीच्या मुख्य अभिलेखासोबत प्रत्येक सदनिकेचा स्वतंत्र पूरक अधिकार अभिलेख तयार केला जाणार आहे. त्यामुळे सदनिकेची स्वतंत्र ओळख, मालकी हक्क आणि संबंधित बोजे यांची माहिती महसूल अभिलेखात नोंदवली जाईल.

मंजूर बांधकामांनाच प्रॉपर्टी कार्ड

सक्षम नियोजन किंवा विकास प्राधिकरणाने मंजूर केलेला बांधकाम नकाशा आणि नोंदणीकृत हक्कदस्त असलेल्या अधिकृत इमारतींनाच व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. अनधिकृत बांधकामांना या व्यवस्थेचा लाभ मिळणार नाही. भोगवटा प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झालेल्या प्रकरणांमध्येही संबंधित प्राधिकरणाचा मंजूर नकाशा आणि नोंदणीकृत हक्कदस्त आवश्यक राहतील.

नागरी भागात ‘डी-१’ नमुन्यात भूखंड, इमारत आणि सामायिक क्षेत्राची मूलभूत माहिती, तर ‘डी-२’ नमुन्यात प्रत्येक सदनिकेची स्वतंत्र माहिती नोंदवली जाईल. ग्रामीण भागासाठी अनुक्रमे ‘१-अ’ आणि ‘१-ब’ हे नमुने असतील.

प्रॉपर्टी कार्डमध्ये सदनिका क्रमांक, धारकाचे नाव, मंजूर क्षेत्रफळ, स्वतंत्र ओळख क्रमांक, संबंधित हक्क आणि बोजे यांची माहिती असेल. तसेच इमारतीचे मंजूर बांधकाम क्षेत्र, खुली जागा, रस्त्याखालील क्षेत्र आणि सामायिक क्षेत्राची नोंद केली जाईल. बँक कर्ज, दंड, मालमत्ता कराची थकबाकी, गृहनिर्माण संस्थेची देणी, न्यायालयीन निर्बंध आणि शासकीय देणी यांचाही अभिलेखात समावेश असेल. सामायिक बोजा मुख्य अभिलेखात, तर वैयक्तिक कर्ज किंवा बोजा संबंधित सदनिकेच्या अभिलेखात नोंदवला जाणार आहे.

अर्ज प्रक्रिया होणार ऑनलाइन

जमीनधारक, प्रवर्तक, विकासक, सदनिकाधारक किंवा गृहनिर्माण संस्थेची अधिकृत व्यक्ती प्रॉपर्टी कार्डसाठी अर्ज करू शकेल. गृहनिर्माण संस्थेला सर्व सदस्यांच्या वतीने सामायिक अर्ज करता येईल. त्याचबरोबर सदनिकाधारकांना वैयक्तिक अर्ज करण्याचीही सुविधा असेल.

अर्जासोबत प्रकरणानुसार मूळ अधिकार अभिलेख, मंजूर आराखडा, संबंधित प्रमाणपत्रे, अभिहस्तांतरण किंवा मानीव अभिहस्तांतरणाची कागदपत्रे आणि महारेराकडील नोंदणीची कागदपत्रे सादर करावी लागतील. अर्ज, माहिती संकलन, स्वयंचलित छाननी, आवश्यक पडताळणी, त्रुटीपूर्तता आणि अभिलेख मंजुरीची संपूर्ण कार्यपद्धती ऑनलाइन केली जाणार आहे. मंजुरीनंतर सदनिकाधारकाला डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रॉपर्टी कार्ड मिळेल. हे कार्ड डिजिटल स्वरूपात तसेच खिशात ठेवता येईल अशा स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

विविध विभागांच्या प्रणालींचे एकत्रीकरण

नोंदणी व मुद्रांक विभाग, सहकार विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, नियोजन प्राधिकरणे, महारेरा आणि भूमी अभिलेख विभाग यांच्या प्रणालींचे एपीआय आधारित एकत्रीकरण केले जाणार आहे. त्यामुळे संबंधित विभागांमध्ये डिजिटल माहितीची देवाणघेवाण होऊन अभिलेख अद्ययावत ठेवणे शक्य होईल.

इमारत पाडल्यानंतर किंवा पुनर्विकास व पुनर्वाटप झाल्यानंतर जुन्या नोंदी नियमानुसार बंद करून नवीन मंजूर आराखड्यानुसार अभिलेख तयार केले जातील. या व्यवस्थेच्या अंमलबजावणीसाठी जमाबंदी आयुक्तांच्या कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध करून दिले जातील.

खरेदी-विक्री आणि कर्जप्रक्रिया होणार सुलभ

व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड प्रणालीमुळे सदनिकेच्या हक्कांची पडताळणी, खरेदी-विक्री आणि कर्जप्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. मालमत्तेवरील बोजे आणि थकबाकीची माहिती पारदर्शकपणे उपलब्ध झाल्याने फसवणूक तसेच मालमत्ताविषयक वाद कमी होण्यास मदत होईल. ही सुविधा ऐच्छिक असून सेवा शुल्काबाबत राज्य शासन स्वतंत्रपणे निर्णय घेणार असल्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

प्रारूप मसुदा संकेतस्थळांवर उपलब्ध

प्रारूप अधिसूचना महसूल विभागाच्या rfd.maharashtra.gov.in आणि भूमी अभिलेख विभागाच्या bhumiabhilekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच तहसील कार्यालये, दुय्यम निबंधक कार्यालये, उपअधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत आणि गावांच्या चावडीतील सूचना फलकांवरही स्थानिकांना समजेल अशा भाषेत मसुदा प्रदर्शित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी निर्धारित मुदतीत आपल्या सूचना आणि हरकती सादर कराव्यात, असे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात आले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अतिक्रमणांना विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; आयुक्तांचे प्रशासनाला आदेश अतिक्रमणांना विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; आयुक्तांचे प्रशासनाला आदेश
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करावी. पदपथ अतिक्रमणमुक्त करून पादचाऱ्यांसाठी सलग मार्गिका तयार कराव्यात. कारवाईला...
सांगवीतील नूतनीकरण केलेल्या संविधान शिल्पाचे लोकार्पण
राज्यात ‘व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड’ प्रणाली लागू होणार; प्रत्येक सदनिकेला मिळणार स्वतंत्र ओळख
राज्याच्या आरोग्य विभागाला मिळणार ३५० अद्ययावत रुग्णवाहिका
‘आकाश ही मर्यादा नाही, नव्या संधींचे प्रवेशद्वार’; अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश
डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या निवडीने पिंपरी-चिंचवडचा साहित्यविश्वात गौरव : आमदार शंकर जगताप
शरणकुमार लिंबाळे यांची साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड अभिमानास्पद!