दुष्काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; एकनाथ शिंदे यांची ग्वाही
कर्जवसुलीसाठी सक्ती केल्यास कारवाईचा इशारा; पाणी, चारा आणि शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी शासन कटिबद्ध
मुंबई : राज्यात दुष्काळाचे मोठे संकट निर्माण झाले असले, तरी शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी खचून न जाता धीराने परिस्थितीचा सामना करावा. शासन पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मेहकर येथे आयोजित दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद मेळावा आणि सेवा संकल्प अभियानात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट, आमदार संजय गायकवाड, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार किरण सरनाईक, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भालचंद्र चव्हाण, माजी आमदार संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेऊन मदत आणि निधी उपलब्ध करून दिला आहे. शेतकऱ्यांना मदत करताना शासन कधीही हात आखडता घेणार नाही. शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये. वित्तीय संस्था किंवा फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची वसुली अथवा दादागिरी झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पाणी आणि चारा नियोजनाला प्राधान्य
दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणि चारा उपलब्ध करून देण्यासाठी चारा छावण्या, चारा गाड्या यांसह आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे. जलसंधारणाच्या कामांना गती देण्याबरोबरच जलतारा यांसारख्या उपक्रमांतून भूजल पातळी वाढविण्यावर भर दिला जात आहे. कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचे नियोजन करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
महिला, विद्यार्थी आणि गरजू कुटुंबांना मदत
दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिलांसाठी आरोग्य तपासणी मोहिमा आयोजित करण्याबरोबरच गरजू महिलांना शिलाई मशीनसारखे साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त कुटुंबांतील विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी आवश्यक मदत केली जाईल. गरजू कुटुंबांना धान्य किट, मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच विवाहासाठी मदत देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरूच राहणार असून, पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुलींचे मोफत उच्च शिक्षण आणि महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत यांसारख्या योजनांचाही लाभ नागरिकांना मिळत आहे. लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया तसेच कर्करोग तपासणी व उपचारांसाठी आरोग्य विभागामार्फत विशेष मोहिमा राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
तीन हजार शिलाई मशीन आणि सायकलींचे वाटप
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. जिल्ह्यातील सुमारे तीन हजार शेतकरी कुटुंबांतील मुला-मुलींना सायकलींचे वाटप सुरू करण्यात येत आहे. तसेच शेतकरी कुटुंबांतील विधवा, परित्यक्त्या आणि गरजू महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी तीन हजार शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वार्षिक सहा हजार रुपयांच्या मदतीत राज्य शासनाकडून आणखी सहा हजार रुपयांची भर घालण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना एकूण १२ हजार रुपयांची वार्षिक आर्थिक मदत मिळत असल्याचे जाधव यांनी सांगितले.
विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न
बुलढाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे नाव देण्यात आले आहे. जळगाव जामोद येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली. वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्प, खामगाव-जालना रेल्वेमार्गासाठी ५० टक्के निधी देण्याबाबतची कार्यवाही आणि अकोट-संग्रामपूर-जळगाव-बऱ्हाणपूर रेल्वेमार्ग यांसारख्या प्रकल्पांमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले. मेहकर, बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
सहा महिन्यांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी
दुष्काळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या सहा महिन्यांच्या मानधनाची सात लाख ५१ हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली. याबाबतचा धनादेश त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गरजू लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, शिलाई मशीन आणि सायकलींचे वितरण करण्यात आले. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान आणि धनादेशांचे वाटप करण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List