एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास वाहनांच्या कामांवर निर्बंध

वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, परवाना नूतनीकरणासह विविध सेवा बंद; पिंपरी-चिंचवड आरटीओचे वाहनधारकांना आवाहन

एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास वाहनांच्या कामांवर निर्बंध

पिंपरी : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, अद्यापही अनेक वाहनधारकांनी आपल्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविलेली नाही. अशा वाहनधारकांना आता प्रादेशिक परिवहन कार्यालयातील विविध सेवांवर निर्बंधांचा सामना करावा लागणार आहे. वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, परवाना नूतनीकरण, वाहनावरील कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे यांसारखी कामे एचएसआरपी नसल्यास करता येणार नसल्याचे पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ५० नुसार वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविण्याची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांनाही एचएसआरपी बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ नव्या वाहनांनाच नव्हे, तर जुन्या वाहनांनाही ही प्लेट बसविणे आवश्यक आहे. मुदत संपल्यानंतरही प्लेट न बसविणाऱ्या वाहनधारकांच्या आरटीओसंबंधित कामांवर मर्यादा लागू करण्यात आल्या आहेत.

एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांसाठी वाहन हस्तांतरण, पत्त्यातील बदल, वाहनाच्या नोंदणीशी संबंधित काही प्रक्रिया, परवाना नूतनीकरण तसेच वाहनावरील कर्जबोजा नोंदविणे किंवा कमी करणे यांसारख्या सेवा उपलब्ध होणार नाहीत. वाहनांची पुनर्नोंदणी आणि वाहनात बदल करण्यासंबंधीची कामेही करता येणार नाहीत. मात्र, योग्यता प्रमाणपत्राचे नूतनीकरण या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी आरटीओतील कामे अडचणीची होण्यापूर्वी एचएसआरपी बसवून घेणे आवश्यक आहे.

वाहनांच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्लेट

जुन्या पद्धतीच्या नंबर प्लेटवरून वाहनांची अचूक ओळख पटविणे अनेकदा कठीण होते. वाहन चोरी, अपघात किंवा गुन्हेगारी घटनांमध्ये संबंधित वाहनाचा शोध घेणे सोपे व्हावे, तसेच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने निश्चित करता यावी, या उद्देशाने एचएसआरपी प्रणाली लागू करण्यात आली आहे. या नंबर प्लेटमध्ये वाहनाचा नोंदणी क्रमांक, राज्याचा कोड आणि विशिष्ट सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश असतो.

उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट सहजपणे तुटणार नाही किंवा काढता येणार नाही, अशा पद्धतीने बसविण्यात येते. तसेच, तिच्यात फेरफार करणे कठीण असल्याने बनावट नंबर प्लेटचा वापर आणि वाहनांच्या ओळखीत होणारी छेडछाड रोखण्यास मदत होते. त्यामुळे वाहनांची नोंदणी आणि ओळख अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था महत्त्वाची मानली जात आहे.

वाहनधारकांनी तातडीने नोंद घ्यावी

पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सर्व वाहनधारकांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑटोरिक्षा, टॅक्सी, ट्रक आणि बस संघटनांनीही आपल्या सदस्यांना याबाबत माहिती द्यावी. तसेच वाहन वितरकांनी जुन्या वाहनधारकांना एचएसआरपी बसविण्याबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आरटीओतील विविध कामांसाठी भविष्यात अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी वाहनधारकांनी या सूचनेची गांभीर्याने दखल घेऊन आपल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवून घ्यावी, असे कार्यालयाने कळविले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बुधवार पेठेत एफडीएची मिठाई विक्रेत्यांवर धडक कारवाई; ५१२ किलो मिठाई नष्ट बुधवार पेठेत एफडीएची मिठाई विक्रेत्यांवर धडक कारवाई; ५१२ किलो मिठाई नष्ट
पुणे : ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवार (दि. २७ नोव्हेंबर) रोजी बुधवार पेठ...
लोहगावच्या आकाशात तिरंग्याची शान; हवाई कसरतींनी पुणेकर मंत्रमुग्ध
एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास वाहनांच्या कामांवर निर्बंध
सिटी प्राईड इमारतीतील अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त
शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना आता मालकी हक्क; फक्त ५ टक्के अधिमूल्य
दुष्काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; एकनाथ शिंदे यांची ग्वाही
गुन्हेगारी प्रवृत्तींचे कृत्य खपवून घेणार नाही; सुनेत्रा पवार यांचा पोलिसांना इशारा