शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना आता मालकी हक्क; फक्त ५ टक्के अधिमूल्य
नागरी निवारा परिषदेतील ११३ संस्थांना वर्ग-१ दर्जाचे आदेश; ६,२५० सदनिकाधारकांसह २५ हजार रहिवाशांना लाभ
मुंबई : मुंबईतील शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना वार्षिक बाजारमूल्य दरपत्रकाच्या (रेडी रेकनर) केवळ पाच टक्के अधिमूल्य भरून भोगवटादार वर्ग-१ दर्जा आणि मालकी हक्क मिळणार आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे संबंधित गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास आणि स्वयं-पुनर्विकासाचा मार्ग सुलभ होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
वांद्रे येथील उत्तर भारतीय संघ सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नागरी निवारा परिषदेअंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वर्ग-१ रूपांतरणाचे आदेश वितरित करण्यात आले. या वसाहतीतील सुमारे ६२ एकर क्षेत्रावर असलेल्या ११३ सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील ६ हजार २५० सदनिकाधारक आणि २५ हजारांहून अधिक रहिवाशांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. मालकी हक्क मिळाल्यामुळे या संस्थांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने २०१७-१८ मध्ये कायद्यात बदल करून भाडेपट्ट्यावरील जमिनी वर्ग-१ करण्याची व्यवस्था निर्माण केली. सुरुवातीला यासाठी २५ टक्के आणि त्यानंतर १० टक्के अधिमूल्य आकारण्यात येत होते. मात्र, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाची गरज लक्षात घेऊन अधिमूल्य पाच टक्के करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने एकमताने मंजूर केला. यामुळे विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा मिळेल.
राज्य शासनाने स्वयं-पुनर्विकासासाठी विविध सवलती दिल्यामुळे मुंबईत सुमारे १ हजार ६०० प्रस्ताव पुढे आले आहेत. मुंबईतील शासकीय जमिनीवरील अन्य पात्र सहकारी गृहनिर्माण संस्थांनाही वर्ग-१ रूपांतरणाचा लाभ मिळावा, यासाठी महसूल विभागाने व्यापक मोहीम राबवावी. संस्थांच्या परिसरात शिबिरे आयोजित करून नागरिकांना आवश्यक मदत करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र मालमत्ता पत्रक
उंच इमारती आणि टॉवरमधील प्रत्येक सदनिकाधारकाला स्वतंत्र मालमत्ता पत्रक देण्याचा निर्णयही राज्य शासनाने घेतला आहे. यामुळे सदनिकेचा मालकी हक्क अधिक स्पष्ट होईल. तसेच एकच सदनिका एकापेक्षा अधिक व्यक्तींना विकण्यासारख्या गैरप्रकारांना आळा बसेल. मुंबईतील मराठी माणूस मुंबईतच राहिला पाहिजे आणि सर्वसामान्यांना उत्तम जीवनमान मिळाले पाहिजे, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
‘सक्षम’ उपक्रमातून युवकांना रोजगाराच्या संधी
तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. वांद्रे परिसरात ‘सक्षम’ योजनेअंतर्गत कौशल्य गणनेच्या अभिनव उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या उपक्रमातून तरुणांना रोजगार देणाऱ्या संस्थांशी जोडण्याचे काम होत आहे. रोजगार बाजारपेठेच्या गरजेनुसार युवकांना प्रशिक्षण आणि कौशल्यवृद्धीची संधी देणारे हे प्रारूप राज्यातील अन्य भागांतही राबविता येईल, असे ते म्हणाले.
दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या विकासासाठी मानखुर्द येथील जागा देण्यात येत आहे. या जागेवर मराठी चित्रपटांना सवलत देण्याबाबत सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांना सूचना केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ करण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतलेल्या पुढाकाराचा उल्लेख करून, एकत्रित प्रयत्नांतून अमली पदार्थांच्या समस्येवर मात करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
पाच टक्के अधिमूल्यामुळे पुनर्विकासाला चालना
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेनुसार मुंबईतील नागरिकांना त्यांच्या घरांचे कायदेशीर आणि शाश्वत मालकी हक्क मिळावेत, यासाठी शासनाने नियम सुलभ केले आहेत. पाच टक्के अधिमूल्याच्या निर्णयामुळे नागरी निवारा परिषदेतील कुटुंबांवरील आर्थिक भार कमी होऊन घरांच्या पुनर्विकासाला चालना मिळेल. पात्र गृहनिर्माण संस्थांपर्यंत ही मोहीम व्यापक स्वरूपात पोहोचविण्यात येईल. महसूल, सहकार आणि नगरविकास विभाग समन्वयाने काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी नागरी निवारा परिषदेतील संस्थांना वर्ग-१ दर्जा मिळणे हा मुंबईच्या सामाजिक इतिहासातील महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे सांगितले. वांद्रे-सांताक्रूझ परिसरात राबविलेल्या ‘सक्षम’ कौशल्य गणनेत सुमारे ३१ हजार नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, ३ हजार ५०० युवकांना रोजगाराच्या संधींशी जोडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
१४ एकर जागा चित्रनगरीच्या विकासासाठी
या कार्यक्रमात मानखुर्द येथे अतिक्रमणमुक्त करण्यात आलेली १४ एकर शासकीय जमीन चित्रनगरीच्या विकासासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आली. मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने विशेष मोहिमेद्वारे आतापर्यंत सुमारे ६० एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त केली आहे. या जमिनींचा सार्वजनिक प्रकल्प आणि शासकीय कामांसाठी उपयोग करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सक्षम’ कौशल्य विकास अभियानांतर्गत ३१ हजार ५६९ उमेदवारांना करिअर मार्गदर्शन देण्यात आले. त्यापैकी ३ हजार ४४९ युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, १ हजार १२८ उमेदवारांनी नोकरी स्वीकारली आहे. कौशल्य सर्वेक्षणाचे हे प्रारूप अनेक जिल्ह्यांनी स्वीकारले आहे.
मुंबईतील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ३ हजार १०८ समुपदेशन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून ५३८ समुपदेशक कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत ३३० समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार रवींद्र वायकर, आमदार प्रवीण दरेकर, सुनील प्रभू, मुरजी पटेल, गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List