कासारवाडीचा जलतरण तलाव पाच महिन्यांनंतर सुरू; मात्र सुविधांचा अभाव कायम!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात पाणीगळती, अस्वच्छता आणि सुरक्षेचे प्रश्न; नागरिकांकडून महापालिका प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या पाणीकपातीमुळे गेल्या जून महिन्यापासून बंद असलेला कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव तब्बल पाच महिन्यांनंतर सोमवार (दि. २३ नोव्हेंबर) पासून पुन्हा नागरिकांसाठी खुला होणार आहे. मात्र, तलाव सुरू होण्यापूर्वीच तेथील असुविधा, अस्वच्छता आणि सुरक्षेच्या प्रश्नांमुळे महापालिका प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाच महिन्यांचा कालावधी मिळूनही मूलभूत सुविधांची कामे पूर्ण झाली नसल्याने जलतरणपटूंच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
तलावाच्या इलेक्ट्रिक मॉनिटरिंग रूममध्ये मोठ्या पाइपमधून पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खोलीत पाणी साचत आहे. या खोलीत विद्युत उपकरणे असल्याने ही बाब गंभीर मानली जात आहे. पाणी साचल्यामुळे शॉर्टसर्किट किंवा विजेचा धक्का बसण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तलाव सुरू करण्यापूर्वी पाण्याचा निचरा करून विद्युत यंत्रणेची तांत्रिक तपासणी करणे आवश्यक आहे.
तसेच, तलावातील बाथरूममध्ये नळ उपलब्ध नसल्याचेही समोर आले आहे. तलाव बंद असताना चोरीची घटना घडली होती. मात्र, त्यानंतरही आवश्यक साहित्याची पूर्तता झालेली नसल्याने तलाव सुरू झाल्यावर जलतरणपटूंची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
पाच महिन्यांपासून तलाव बंद असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे आणि वेली वाढल्या आहेत. नियमित स्वच्छता न झाल्यामुळे परिसरात अस्वच्छता दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी साप दिसल्याचे सांगण्यात येत असल्याने जलतरणासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
पाच महिने मिळूनही दुरुस्ती का नाही?
पाणीकपातीमुळे जून महिन्यापासून जलतरण तलाव बंद होता. या कालावधीत देखभाल, स्वच्छता आणि तांत्रिक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाला पुरेसा वेळ होता. असे असतानाही मूलभूत सुविधांची पूर्तता झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अर्धवट तयारीनिशी तलाव सुरू करण्याची घाई कशासाठी? एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
बाथरूममध्ये नळ बसवलेले नाहीत. ते ठेकेदाराकडून सोमवारपर्यंत बसवून घेतले जातील. तसेच, परिसरातील झाडाझुडपांची साफसफाई करण्याबाबत वृक्ष प्राधिकरणाच्या विभागप्रमुखांशी चर्चा झाली आहे. येत्या दोन दिवसांत झाडाझुडपांची साफसफाई करून दिली जाईल.
- पंकज पाटील, उपायुक्त, क्रीडा विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List