बुधवार पेठेत एफडीएची मिठाई विक्रेत्यांवर धडक कारवाई; ५१२ किलो मिठाई नष्ट

आठ आस्थापनांची तपासणी; २ लाख ८८ हजार २०० रुपयांची मिठाई जप्त, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांना बंदची नोटीस

बुधवार पेठेत एफडीएची मिठाई विक्रेत्यांवर धडक कारवाई; ५१२ किलो मिठाई नष्ट

पुणे : ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवार (दि. २७ नोव्हेंबर) रोजी बुधवार पेठ परिसरातील मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांवर धडक कारवाई केली. आठ आस्थापनांची तपासणी करताना अस्वच्छ वातावरणात मिठाईची निर्मिती आणि आवश्यक परवान्यांशिवाय व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार आढळून आले. या कारवाईत तब्बल ५१२.१ किलो वजनाची आणि २ लाख ८८ हजार २०० रुपये किमतीची मिठाई जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आली. तसेच, विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

सणासुदीच्या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते. अशा वेळी नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत बुधवार पेठेतील मिठाई उत्पादन केंद्रे आणि विक्रीच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. तपासणीदरम्यान काही ठिकाणी स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे, तर काही आस्थापना आवश्यक नोंदणी किंवा परवान्याशिवाय सुरू असल्याचे निदर्शनास आले.

श्री मंगल मूर्ती येथे सर्वाधिक मिठाई नष्ट

श्रीकृष्ण कॉम्प्लेक्स येथील श्री मंगल मूर्ती या आस्थापनेत अस्वच्छ वातावरणात मिठाई तयार केली जात असल्याचे तसेच आवश्यक परवाना आणि नोंदणी नसल्याचे आढळले. येथील १ लाख १७ हजार रुपये किमतीची १९५ किलो मिठाई नष्ट करण्यात आली. तपासणीसाठी तीन नमुने घेण्यात आले असून, आस्थापनाला तात्काळ व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली.

मंत्री किशोर आर्केड येथील धारवाडी पेढे स्वीट्स अँड स्नॅक्समध्ये अस्वच्छता आढळल्याने २३ हजार ८४० रुपये किमतीची ४३ किलो मिठाई नष्ट करण्यात आली. येथूनही तीन नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. याच परिसरातील मे. मंगलमूर्ती पेढे येथेही पथकाने तपासणी केली.

परिमंडळ आठमध्येही कारवाई

परिमंडळ आठ अंतर्गत जय गणेश स्वीट सेंटर येथे अस्वच्छता आढळल्याने २० हजार ४०० रुपये किमतीची ३५ किलो मिठाई नष्ट करण्यात आली. या ठिकाणाहून तीन नमुने घेण्यात आले. अथर्व स्वीट सेंटरमध्ये अस्वच्छ परिस्थितीमुळे ८ हजार ८८० रुपये किमतीची २४ किलो मिठाई नष्ट करण्यात आली. तसेच खव्याच्या मोदकाचा एक नमुना तपासणीसाठी घेण्यात आला.

हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्र हे नोंदणी प्रमाणपत्राशिवाय सुरू असल्याचे आढळले. या प्रकरणी ३० नोव्हेंबर रोजी तडजोड अर्ज दाखल केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. श्री कृपा दुग्धालयातून मलाई, केशरी व कंदी मोदक पेढा आणि सुटे म्हशीचे दूध असे एकूण चार नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाची कारवाई

ही कारवाई सह आयुक्त (दक्षता) प्रीती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक आयुक्त (अन्न) ना. रा. सरकटे आणि सय्यद इम्रान हश्मी यांच्या मार्गदर्शनात तसेच सह आयुक्त (अन्न) श्रीकांत करकळे यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने ही मोहीम राबविली. अन्नपदार्थांच्या उत्पादन आणि विक्रीच्या ठिकाणी स्वच्छतेचे नियम तसेच परवाना व नोंदणीसंबंधीच्या अटी पाळल्या जात आहेत की नाही, याची तपासणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बुधवार पेठेत एफडीएची मिठाई विक्रेत्यांवर धडक कारवाई; ५१२ किलो मिठाई नष्ट बुधवार पेठेत एफडीएची मिठाई विक्रेत्यांवर धडक कारवाई; ५१२ किलो मिठाई नष्ट
पुणे : ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवार (दि. २७ नोव्हेंबर) रोजी बुधवार पेठ...
लोहगावच्या आकाशात तिरंग्याची शान; हवाई कसरतींनी पुणेकर मंत्रमुग्ध
एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास वाहनांच्या कामांवर निर्बंध
सिटी प्राईड इमारतीतील अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त
शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना आता मालकी हक्क; फक्त ५ टक्के अधिमूल्य
दुष्काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; एकनाथ शिंदे यांची ग्वाही
गुन्हेगारी प्रवृत्तींचे कृत्य खपवून घेणार नाही; सुनेत्रा पवार यांचा पोलिसांना इशारा