सिटी प्राईड इमारतीतील अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त
महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाची कारवाई
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक १५ मधील लोकमान्य टिळक रस्त्यावरील ‘सिटी प्राईड’ या व्यावसायिक इमारतीच्या पार्किंग व तळमजल्यावर करण्यात आलेल्या अनधिकृत पत्राशेड आणि बांधकामावर महापालिकेने शुक्रवारी (दि.२७ नोव्हेंबर) निष्कासनाची कारवाई केली. या कारवाईत अंदाजे ६४१ चौरस मीटर क्षेत्रावरील अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले.
सदर अनधिकृत बांधकामाबाबत महापालिकेच्या वतीने संबंधित बांधकामधारकाला यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. नोटिशीची मुदत संपल्यानंतरही संबंधितांनी स्वतःहून अनधिकृत बांधकाम हटविले नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने प्रत्यक्ष निष्कासनाची कारवाई केली.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे यांच्या अधिपत्याखाली उपअभियंता सुशीलकुमार लवटे, विटनिरक्षक राहुल निकम आणि सुहास भगत यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईसाठी २० एमएसएफ जवान, ९ मजूर आणि १ जेसीबी ब्रेकरची मदत घेण्यात आली. महापालिका प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई पूर्ण करत सुमारे ६४१ चौरस मीटर क्षेत्रावरील अनधिकृत पत्राशेड व बांधकाम निष्कासित केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List