‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार!
एक्सप्रेस मीडिया इंटरप्राईसचा पिंपरी-चिंचवडमध्ये दिमाखदार सोहळा : विविध क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा ‘‘फेस ऑफ इन्स्पिरेशन’’ ने सन्मान
‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार’’ हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण उद्योगविश्वासाठी प्रेरणादायी टप्पा आहे.
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी : ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार’’ हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण उद्योगविश्वासाठी प्रेरणादायी टप्पा आहे. उत्पादन, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाच्या बळावर महाराष्ट्र $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असून, या प्रवासात उद्योग क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,’’ असे प्रतिपादन ‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध उद्योजक भरत गीते यांनी केले.
पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योग, समाजसेवा आणि प्रेरणादायी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक्सप्रेस मीडिया इंटरप्राईसचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात के. राहूल यांच्या गायनाने झाली, त्यानंतर गुरुवर्य ॲकॅडेमी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर केली.

सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले, त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांमध्ये जेष्ठ अभिनेते व नाम फाऊंडेशनचे संस्थापक मा. मकरंद अनासपुरे, संसदरत्न खासदार मा. श्रीरंग बारणे, महापौर रवी लांडगे, प्रमुख प्रायोजक कुमार लाईफस्पेसेसचे संचालक मा. अमेय जैन आणि उद्योगक्षेत्रातील मा. भरत गीते, महावितरण चे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, शिवसेनेचे मुख्य सचिव वैभव थोरात, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष कविता अल्हाट, नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांचा समावेश होता. यावेळी उद्योजक भारत गीते यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यांच्या मुलाखतीमध्ये उपस्थित विद्यार्थी, श्रोत्यांना प्रेरणा मिळाली.
सोहळ्यात उद्योगक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल उद्योजक आणि ‘‘ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’’ म्हणून ओळखले जाणारे मा. भरत गीते यांना महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर उर्वरित विशेष पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
संचालिका मनीषा थोरात-पिसाळ यांनी आपल्या भाषणात संस्थेची ओळख, सामाजिक बांधिलकीसाठी पुरस्काराचे महत्त्व, कुटुंबाचा आधार आणि प्रेरणादायी संदेश यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, दृढनिश्चय, प्रामाणिकपणा, मेहनत आणि समाजासाठी योगदान हेच खरे यश निर्माण करतात. तसेच उपस्थितांना संदेश दिला की, प्रत्येक अडचणीत धैर्याने सामना करावा आणि मेहनत व विश्वासाने स्वप्न पूर्ण करावेत.
सोहळ्यात रमा-मंगल फाउंडेशनचे संस्थापक संतोष सौंदणकर यांच्यासह अनेक मान्यवरांचे सहकार्य होते. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक कुमार लाईफ स्पेसेस, विठ्ठल हॉस्पिटल मोशी, धनश्री हॉस्पिटल, लोटस ग्रुप, रिव्हर नेस्ट, पार्श्व रिॲलिटी, वृंदा लाईफस्पेसेस, सोनिगरा क्रॉप अशा प्रमुख प्रायोजकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी जेष्ठ अभिनेते मा. मकरंद अनासपुरे, महापौर रवी लांडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर आभार प्रदर्शन मा. संतोष सौंदणकर यांनी केले. सोहळा प्रेरणादायी ठरला आणि समाजातील प्रेरक व्यक्तिमत्त्वांचा योग्य सन्मान करण्यात यश मिळाले.
पुरस्कारार्थींची नावे पुढीलप्रमाणे :
भरतजी गीते (महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार), वैभव थोरात (शिक्षणमहर्षी), विठ्ठल हॉस्पिटल, मोशी (महाराष्ट्र धन्वंतरी गौरव पुरस्कार), रविंद्र दत्तात्रय ठिकेकर (यशस्वी उद्योजक पुरस्कार), संदीप बेलसरे (उद्योग नवोन्मेष पुरस्कार), सुनील काकडे (मुख्य अभियंता महावितरण) (कार्यगौरव पुरस्कार), नितीन सूर्यवंशी (कार्यगौरव पुरस्कार), दीपक अशोक माने (सामाजिक कार्यगौरव), डॉ. जयश्री सुरवसे (द्रोणाचार्य पुरस्कार), ज्योत्स्ना भूषण मावळे (मानसशक्ती पुरस्कार), नवनाथ ढवळे (शिक्षण रत्न पुरस्कार), वंदना चौव्हाण (नारीशक्ती कार्यगौरव), मराठवाडा युवा मंच (सामाजिक कार्यगौरव), समर्थ महिला बहुउद्देशीय (महिला सशक्तीकरण कार्यगौरव), नीता पाडाळे (आदर्श नगरसेविका), प्रिती बोंडे(उत्कृष्ट व्यक्तिमत्व), केसर ग्रुप (उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक), विश्वकल्याण इंग्लिश मिडीयम स्कूल (ज्ञानदीप गौरव पुरस्कार), जाणीव परिवार (मोशी) (सामाजिक कार्यगौरव), आपला परिवार सोशल फाउंडेशन (पर्यावरण संवर्धन कार्यगौरव), शिवयोद्धा ग्रुप (महाराष्ट्र शिवविचार गौरव).
"उद्योग म्हणजे फक्त नफा नाही; ते समाजासाठी, लोकांसाठी आणि पुढील पिढीसाठी नवीन संधी निर्माण करण्याचे माध्यम आहे. दृढनिश्चय, प्रामाणिकपणा आणि मेहनत यांवर टिकून राहिल्यास यश आपोआप आपल्यासमोर येते."
- भरत गीते, महाराष्ट्र उद्योग भूषण.
"जगण्यासाठी फक्त स्वप्ने पाहणे पुरेसे नाही, ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न, धैर्य आणि समाजाची सेवा आवश्यक आहे. प्रत्येक कृतीत समाजाला काही तरी देण्याचा विचार असावा, मग यश आपोआप पाठलाग करते."
- मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ अभिनेता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List