देवाला तरी सोडा! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला गळती, कोटय़वधींचा खर्च पाण्यात
>>सुनील उंबरे
महायुती सरकारच्या भ्रष्टाचाराचा फटका आता महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रखुमाईला बसला असून मंदिराच्या डागडुजीचे काम सुरू असतानाच गळती सुरू झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. भारतीय पुरातत्व विभागाकडून मंदिराचे पुरातन सौंदर्य जपण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी गेल्या तीन वर्षांत 50 कोटींहून अधिक रक्कम खर्च झाली आहे. मात्र मंदिराला गळती लागल्याने या कामाची पोलखोल झाली असून देवाला तरी सोडा अशी भावना व्यक्त होत आहे.
पंढरपूरच्या मंदिराचे जतन-संवर्धनासाठी राज्य शासनाने 150 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 2023 पासून या कामाला सुरुवात झाली आहे. यात विठ्ठल मंदिर, सभामंडप, शिखर, रुक्मिणी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, नामदेव पायरी, नगारखाना, बाजीराव पडसाळ, विनायक मंदिर, व्यंकटेश मंदिर, टेन्साईल वर्क (आतील व बाहेरील), दर्शनबारी, स्ट्रक्चरल ऑडिट, वॉटर सप्लाय व ड्रेनेज, इलेक्ट्रीकल वर्प, साऊंड सिस्टम, फायर फायटिंग सिस्टम, लक्ष्मण पाटील देवस्थान, अंबाबाई मंदिर, श्री रोकडोबा मंदिर, श्री सोमेश्वर मंदिर, श्री विठ्ठल मंदिर सभामंडप सागवानी काम, इतर परिवार देवता मंदिरे आणि संत नामदेव महाद्वार आदी कामांचा समावेश आहे.
कामाचे थर्ड पार्टी ऑडिट
गळतीची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाची तारांबळ उडाली. पावसाळा लवकर सुरू झाल्याने वॉटरप्रूफिंगची कामे वेळेत पूर्ण करता आली नसल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले. दरम्यान, मंदिराच्या सर्व कामांचे त्रयस्थ शासकीय संस्थेकडून ऑडिट करण्याबाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांना प्रस्ताव दिल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
भाविकांची गैरसोय, दोषींवर कारवाई करा
श्री विठ्ठल मंदिराचा गाभारा, चोखांबी, सोळखांबी, मुखदर्शन दरवाजा आदी भागात पावसाच्या पाण्याच्या धारा लागल्या, या पावसाच्या धारामधून वाट काढत वारकरी भाविकांना श्री विठू- रखुमाईच्या दर्शनाला जावे लागत असल्याने भाविकांना गैरसोय सहन करावी लागत आहे. याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे लेखी तक्रारी करूनही कारवाई केली जात नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List