मंथन – वेध ‘वेदर वेपन’चा
>> कमलेश गिरी
अमेरिकेच्या टेक्सास या राज्यात आलेल्या प्रचंड पुरामुळे शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. या नैसर्गिक आपत्तीबाबत केवळ मदत व बचावकार्याचीच चर्चा होत नाही, तर सोशल मीडिया आणि काही राजकीय वर्तुळांमध्ये याकडे घातपातच्या दृष्टीने पाहिले जात आहे. ही पूरस्थिती खरोखरच नैसर्गिक आहे की एखाद्या ‘वेदर वेपन’चा म्हणजेच हवामानबाधित करणाऱया शस्त्रास्त्रांचा परिणाम आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा वेध घेतानाच वेदर वेपन म्हणजे नेमका काय प्रकार आहे? आजवर कुणी असे शस्र वापरले आहे का? यांसारख्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेणे गरजेचे आहे.
अमेरिकेच्या टेक्सास राज्यामध्ये नुकत्याच आलेल्या विनाशकारी पुरामुळे शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत. मात्र या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर काही गट सोशल मीडियावर या घटनेला ‘नैसर्गिक आपत्ती’ न मानता ‘मानवनिर्मित विध्वंस’ ठरवत आहेत. माजी एनएसए अधिकारी मायकेल फ्लिन आणि रिपब्लिकन पक्षाच्या मार्जरी टेलर ग्रीन यांसारख्या व्यक्तींनी या चर्चेला अधिक जोर दिला आहे. ग्रीन यांनी तर याबाबत एक विधेयक सादर करण्याची मागणी केली आहे. याअंतर्गत कोणतीही व्यक्ती किंवा संस्था हवामान, तापमान किंवा सूर्यप्रकाश या नैसर्गिक प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप करणारी रसायने (केमिकल्स) सोडू शकणार नाही किंवा त्यात हस्तक्षेप करू शकणार नाही अशी तरतूद असावी. थोडक्यात ‘वेदर मॉडिफिकेशन’ म्हणजेच हवामान बदलण्याच्या तंत्रज्ञानावर बंदी आणण्याच्या प्रयत्नाशी संबंधित हे विधेयक असावे, असे त्यांचे म्हणणे आहे.
वेदर मॉडिफिकेशन म्हणजे काय?
ही एक तंत्रज्ञानावर आधारित संकल्पना आहे. याद्वारे माणूस हेतूपुरस्सर पृथ्वीच्या हवामानात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. यात कृत्रिम पाऊस पाडणे, दुष्काळ घडवून आणणे, भूकंप किंवा त्सुनामीसारख्या आपत्ती निर्माण करणेही शक्य असल्याचे मानले जाते. या तंत्रज्ञानामागे सकारात्मक हेतूही सांगितला जातो. उदा. नैसर्गिक आपत्ती रोखता येणे किंवा हवामान अधिक अनुकूल बनविणे, पण याची सुरुवात मात्र नकारात्मक हेतूनेच झाली होती. आता याचाच वापर ‘वेदर वॉरफेअर’ म्हणजेच हवामान युद्धासाठी होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते.
पहिले वेदर वेपन कोणी आणि केव्हा वापरले?
प्रत्येक आधुनिक व वादग्रस्त तंत्रज्ञानामागे अमेरिकेचा हात असतो, असे म्हटले जाते. याही बाबतीत अमेरिका अपवाद नाही. अमेरिकेने व्हिएतनाम युद्धादरम्यान याचा वापर केला होता. कारण तेव्हा या छोटय़ा देशासोबत चाललेली लढाई अमेरिकेला जिंकता येत नव्हती. त्या वेळी अमेरिकेने ‘ऑपरेशन पॉपाय’ नावाचा प्रयोग सुरू केला. या मोहिमेत लाऊड सिडिंग तंत्राचा वापर करून कृत्रिम पाऊस पाडण्यात आला. यामुळे सैनिक व रसद वाहतुकीचे रस्ते चिखलाने भरले आणि व्हिएतनामच्या हालचाली मंदावल्या. हा प्रयोग एखाद्या महिन्यासाठी नव्हे, तर 1967 पासून तब्बल सहा वर्षे सुरू होता. दरवर्षी मे ते ऑक्टोबर या काळात इतका पाऊस पडत असे की, प्रत्यक्षात सैनिकी हालचालींवर परिणाम होत असे. यामुळे रस्ते फुटले, पिके नष्ट झाली आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली. हवामानाचा युद्धासाठी शस्त्र म्हणून वापर करण्याची ही पहिलीच घटना होती.
यानंतर काय घडले?
या प्रकरणाचा उलगडा झाल्यावर अमेरिकेवर प्रचंड टीका झाली. भविष्यात कोणताही देश असे करू नये म्हणून संयुक्त राष्ट्रांनी एक करार केला. संयुक्त राष्ट्र संघटनेने 1977 साली एनव्हायर्नमेंटल मॉडिफिकेशन कनव्हेन्शन नावाचा एक आंतरराष्ट्रीय करार केला. या करारानुसार कोणत्याही देशाला नैसर्गिक पर्यावरणात जाणूनबुजून बदल घडवून आणून युद्ध, आंतरराष्ट्रीय संघर्ष किंवा कोणत्याही स्वरूपाच्या आक्रमक कारवाईसाठी हवामानाचा वापर करता येणार नाही. या करारावर अमेरिका, रशिया आणि चीन यांसारख्या मोठय़ा देशांनी स्वाक्षरी केली असून आजही हा करार जागतिक स्तरावर मान्य आहे. या करारानंतर काहीसा फरक पडला. कोणत्याही देशाने उघडपणे लाऊड सिडिंगद्वारे हल्ला केला नाही, पण आतल्या आत प्रगत तंत्रज्ञानावर प्रयोग सुरू राहिले. अमेरिका, रशिया, चीन या देशांनी परस्परावर सतत आरोप केले.
जिओ-इंजिनीअरिंग म्हणजे काय?
याचाच एक भाग म्हणजे ‘जिओ-इंजिनीअरिंग’. यामध्ये सल्फर डायऑक्साईडसारख्या वायू हवेत सोडून सूर्यप्रकाश कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे पृथ्वीचे तापमान कमी करता येते. पर्यायाने ग्लोबल वॉर्मिंग कमी होते, पण हेच तंत्र जर एखाद्या विशिष्ट देशावर टार्गेट करून वापरले गेले, तर त्या देशातील शेती, जीवनमान उद्ध्वस्त होऊ शकते. कारण त्या भागावर सूर्यप्रकाश पोहोचणार नाही.
वेदर वेपनचे ठोस पुरावे आहेत का?
बहुतेक प्रकरणांमध्ये याचा वापर झाल्याचे ठोस पुरावे उपलब्ध होत नाहीत. खरी नैसर्गिक घटना आणि कृत्रिमरीत्या आणलेली आपत्ती यामध्ये फरक ओळखणे कठीण असते. बहुतांश देशांकडे हे तंत्र नाही. फक्त व्हिएतनाम युद्धानंतर अमेरिकेच्या सिनेटने कबूल केले होते की, त्यांनी शत्रूच्या हवामानात बदल केला होता. यापलीकडे देश एकमेकांवर आरोप करत राहतात.
आता टेक्सासमध्ये घडलेल्या घटनेने पुन्हा याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या अमेरिका जगभरातील तणावाचा केंद्रबिंदू आहे. रशियाविरोधात युक्रेनला अमेरिका मोठय़ा प्रमाणावर मदत देत आहे. इराण व इस्रायल यांच्यातील युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. चीन-तैवान तणावात तो तैवानच्या बाजूने उभा आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिका जर गुप्त हवामान हल्ल्याचा बळी ठरला असेल तर फारसे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, पण ‘व्हाईट हाऊस’ किंवा इंटेलिजन्स यंत्रणांनी यास दुजोरा दिलेला नाही.
वादग्रस्त प्रकल्प कोणते?
अमेरिकेने हाय-फ्रिक्वेन्सी अॅक्टिव्ह ऑरोरल रिसर्च प्रोग्राम (एचएएआरपी) नावाचा प्रकल्प सुरू केला. याचा उद्देश वायुमंडलाच्या वरच्या स्तरावर ऊर्जा पाठवून परिणाम अभ्यासणे असा सांगितला गेला. पण टीकाकारांचे म्हणणे आहे की, हे तंत्र हवामान बदलण्यासाठी वापरले जाते. रशिया व चीनने अमेरिकेवर आरोप केला की, या प्रकल्पामुळे वादळ, भूकंप आणि पूर यावर परिणाम करता येतो. मध्यंतरी तुर्कस्तानमध्ये आलेला भीषण भूकंप अमेरिकेने घडवून आणल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. अमेरिकेने आपल्या प्रगत हवामान तंत्रज्ञानाचा वापर करुन हे केल्याचे बोलले गेले. यापूर्वीही नैसर्गिक आपत्तींबाबत (एचएएआरपी) संशयाच्या भोवऱयात राहिली होती. अनेक देशांमध्ये भूकंप, त्सुनामी आणि भूस्खलनासाठी या संशोधन संस्थेला जबाबदार धरण्यात आले. हा अलास्का येथील वेधशाळेत असलेला एक अमेरिकन प्रकल्प आहे, जो रेडिओ ट्रान्समीटरच्या मदतीने वरच्या वातावरणाचा (आयनोस्फीअर) अभ्यास करतो.
चीननेही वापरले हवामान अस्र
चीनच्या ‘वेदर मॉडिफिकेशन’ तंत्रज्ञानाबाबतही वाद झाले. 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकपूर्वी त्यांनी लाऊड सिडिंगद्वारे आधीच पाऊस पाडला, जेणेकरून स्पर्धेदरम्यान हवामान स्वच्छ राहील. चीनच्या स्टेट काऊन्सिलने काही वर्षांपूर्वी सांगितले होते की, ते लवकरच 5.5 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रावर लाऊड सिडिंग व अन्य तंत्राद्वारे हवामानावर नियंत्रण मिळवू शकतील.
(लेखक आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List