महायुतीचे सरकार विश्वासघातकी; शेतकर्यांना वार्यावर सोडले : जयश्री शेळके
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम राबविण्यात आले. उद्धव ठाकरेंच्या उदंड व निरोगी आयुष्यासाठी बुलढाण्याचे ग्राम दैवत असलेल्या जगदंबा देवीला पातळ चढवून महाआरती करण्यात आली. तत्पूर्वी 24 जुलै रोजी शेतकर्यांना मोफत वृक्ष वाटप आणि बुलढाणा तालुक्यातील ग्रामीण भागात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. 25 जुलै रोजी जिल्हा परिषद शाळेतील 5 हजार विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. 26 जुलैला सकाळी सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप, मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. त्यानंतर बुलढाणा येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद मेळावा देखील पार पडला.
यावेळी प्रवक्ता जयश्री शेळके, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदा बढे, सहसंपर्क प्रमुख छगनदादा मेहेत्रे, डी. एस. लहाने, जिल्हा समन्वयक संदीप शेळके, युवांसेना जिल्हाप्रमुख नंदू कर्हाडे, अॅड सुमित सरदार, उपजिल्हा प्रमुख लखन गाडेकर, तालुका प्रमुख विजय इतवारे, विजय इंगळे, दीपक चांभारे पाटील, अशोकमामा गव्हाणे, गजानन उबरहंडे, मोहित राजपूत, शुभम घोंगटे, सिद्धेश्वर आंधळे, अनिल नरोटे, सुधाकर आघाव, रणजीत राजपूत, सरपंच संजय शिंदे, एकनाथ कोरडे, बबन खरे, शेख रफीक यांचेसह प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी शिवसेना प्रवक्ता जयश्री शेळके यांनी आपल्या भाषणामध्ये महायुती सरकारवर हल्लाबोल केला. ”येता काळ हा कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिवसैनिकांना सत्ता पदे मिळाली पाहिजे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकला पाहिजे, यासाठी झोकून देऊन सर्वांना काम करावे लागणार आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाची अमिट छाप सोडली. शेतकर्यांना दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ केलं. पर्यावरण पूरक निर्णय घेतले. आता केवळ आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसले आहेत. केवळ उद्धव ठाकरेंवर टीका करणे हाच एकमेव उद्योग त्यांचा उरला आहे. सत्याला कसोटी असते मात्र शेवटी विजय सत्याचाच होतो. महायुती सरकारला आश्वासनांचा विसर पडला आहे. मायबाप शेतकरी अडचणीत असताना राज्याचे कृषिमंत्री यांना रमी खेळण्यापासून वेळ मिळत नाही. विधान मंडळात ते रमी खेळतात. सरकारच्या आठ महिन्याच्या कार्यकाळात आठ मंत्र्याना घरी जाण्याची वेळ आली आहे. मतदारांचा अपमान करणारी आणि केवळ आणि केवळ बेताल वक्तव्य हीच या सामान्य माणसांच्या पदरी पडत आहेत. याउलट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना समाज हिताचा आपला वसा जपत आहे. उद्धव ठाकरे हे सामाजिक भान आणि जाणीव असलेले नेते असल्याने त्यांचा विचार घेऊन तळागाळापर्यंत शिवसेना काम करत असे देखील त्या म्हणाल्या”. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांनी भविष्यात हाच समाज हिताचा विचार आपल्या कार्यकर्तृत्वतून अमलात आणावा असे आवाहन केले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के, समाजकारण आणि 20 टक्के राजकारणाचा मंत्र दिला. उद्धव ठाकरे यांनी कोरोना सारख्या काळामध्ये महाराष्ट्र सांभाळला. काहींनी गद्दारी केली. त्यामुळे राजकारणातील या देव माणसाला सत्तेतून उतार व्हावे लागले. शिवसेना कधीही सत्तेसाठी नाही तर समाजासाठीच काम करते. त्यामुळे बाळासाहेबांचा समाज हिताचा विचार पुढे नेऊन तळागाळातील लोकांना न्याय देण्याचं काम सुरूच राहील असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले. जिल्हा सहसंपर्कप्रमुख प्रा. डी.एस.लहाने, जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांनी भाषण केले. सूत्रसंचालन गजानन धांडे यांनी केले. तर आभार लखन गाडेकर यांनी मानले. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List