देवळावर डल्ला… दानपेटी, घंटा, समया चोरणे हाच त्याचा धंदा; रेवदंड्यातील चोरट्याला अटक
देवळात नमस्काराच्या बहाण्याने जायचे, रेकी करायची आणि दानपेटी, घंटा आणि समया चोरायच्या हा नेहमीचा धंदा असलेल्या एका चोरट्यावर पेण पोलिसांनी झडप घातली. या चोरट्याला रेवदंड्याच्या थेरोंडा आगळ्याची वाडी येथून अटक करण्यात आली असून महेश चायनाखवा असे त्याचे नाव आहे.
पेण शहरातील साई मंदिरात चोरीची घटना घडली. चोरट्याने मंदिरातील दोन मोठ्या घंटा आणि समई चोरून नेली होती. या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस उपअधीक्षक गजानन टेम्पो व पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली खास दोन पथके तयार करण्यात आली. या पथकाने शहरातील 15 सीसीटीव्ही तपासून पाहिले. त्यात चोर चोरीचा ऐवज घेऊन पनवेलला जाणाऱ्या एसटीत चढताना दिसला.
पोलिसांनी मंदिरात चोरी करणाऱ्या चोरांचा रेकॉर्ड तपासला असता त्यांना रेवदंडा पोलीस ठाण्यात महेश चायनाखवा (रा. थेरोंडा आगळ्याची वाडी) याचा रेकॉर्ड मिळाला. देवळातील किमती वस्तू चोरण्याच्या प्रकरणात महेश 21 मे रोजी तुरुंगातून शिक्षा भोगून आला होता. पेण पोलिसांनी सीसीटीव्हीतील फोटोसोबत त्याचा चेहरा तपासला असता पेणमधील चोरी त्यानेच केली असल्याचे स्पष्ट झाले. याआधी या चोरट्याने वडखळ, दादर (पेण), रोहा, कोलाड, पेण येथील मंदिरांमध्ये दानपेट्या लांबवणे, समया, घंटा चोरल्याचे उघड झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List