निमित्त – कुंचल्याचे समृद्ध अस्तित्व

निमित्त – कुंचल्याचे समृद्ध अस्तित्व

>> संजय मेस्त्री

हास्यचित्रकार शि. द. फडणीस 29 जुलै रोजी वयाची शंभरी पूर्ण करत आहेत. त्यानिमित्त कार्टुनिस्टस् कंबाईन आणि वसुंधरा क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात बालगंधर्व नाटय़मंदिर येथे तीन दिवसीय भव्य सोहळा संपन्न होत आहे. कार्टुनिस्टस् कंबाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री यांना शि. द. फडणीस यांचा सहवास लाभला. फडणीस यांच्यासोबतच्या या सहवासातील काही खास आठवणींना उजाळा देणारा हा लेख.

कार्टुनिस्टस् कंबाईन ही संस्था हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1983 साली शिवसेना भवन येथे स्थापन केली. त्या वेळी महाराष्ट्रात मोजकेच आणि दर्जेदार काम करणारे व्यंगचित्रकार होते. सगळय़ा व्यंगचित्रकारांनी बाळासाहेब ठाकरे यांची अध्यक्ष म्हणून एक मताने निवड केली. काही वर्षे त्यांचाचा सल्ला घेऊन ही संस्था काम करत असे. मात्र त्यानंतर बाळासाहेबांना त्यांच्या राजकीय व्यापामुळे या संस्थेला वेळ देणे जमत नसल्याने संस्थेच्या सदस्यांनी ते अध्यक्षपद सन्मानाने श्रीकांतजी ठाकरे यांना दिले.

कार्टुनिस्टस् कंबाईनच्या प्रत्येक कार्यक्रमाला बाळासाहेब, श्रीकांतजी आवर्जून वेळात वेळ काढून येत. दोघांनीही 1983 सालापासून कार्टुनिस्टस् कंबाईनचा एकही कार्यक्रम चुकविला नाही.

एका कार्यक्रमात बाळासाहेब, श्रीकांतजी आलेले असताना एका व्यंगचित्रकाराने सूचना मांडली. व्यंगचित्रकारांचे एक व्यंगचित्रांचे मासिक असावे. त्यावर बाळासाहेब आणि श्रीकांतजी म्हणाले, “अहो, ‘मार्मिक’ हे सगळय़ा व्यंगचित्रकारांचे हक्काचे व्यासपीठ आहे. माहेरघर आहे. तुमचंच आहे. मग वेगळा संसार कशाला?’’

सगळय़ा व्यंगचित्रकारांनी टाळय़ा वाजवून दाद दिली. त्यानंतर हे अध्यक्षपद शि. द. फडणीस यांच्याकडे आले आणि त्यांनीही व्यंगचित्रकारांसोबत कायम संवाद ठेवला. कापीराईटस्चा मुद्दा असो, मानधनाचा मुद्दा असो, त्यातून मार्ग कसा काढायचा हे आपल्या अनुभवांतून शि. द. फडणीस व्यंगचित्रकारांना समजावत असत. 1983 सालापासून संस्थेच्या कामानिमित्त बाळासाहेब, श्रीकांतजी यांच्या जसं जवळ गेलो तसं शि. द. फडणीस यांच्या सोबतही काम करायला मिळालं. शि. द. फडणीस यांच्यासोबत घालविलेले ते अमूल्य क्षण आहेत. त्यांचा कामातला उत्साह, समर्पण जितकं अनुकरणीय तितकंच एक कलाकार म्हणून त्यांचं सर्वव्यापी असणं भुरळ पाडणारं आहे. त्यांच्यासोबत अनेक आनंद देणाऱया क्षणांचा, प्रसंगांचा भागीदार होता आले, याहून पुण्याची गोष्ट दुसरी नसावी.

जागतिक मराठी परिषदेचे रामदास फुटाणे यांनी अहिल्यानगर येथे एक संमेलन केले होते. त्या वेळी शि. द. फडणीस, प्रशांत कुलकर्णी आणि मला व्यंगचित्रांचे प्रात्यक्षिक करायला बोलावले होते. त्या वेळी राज ठाकरे यांचीही जाहीर मुलाखत आयोजित केली गेली होती. ठाकरे नावाची जादूच तशी असल्याने प्रचंड जनसमुदाय त्या वेळी उपस्थित होता. त्यामुळे आम्हाला नकळतपणे रसिकांची गर्दी मिळाली होती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना साठ वर्षे पूर्ण झाली तेव्हा पुण्याच्या शिवसेनेचे प्रकाश देवळे यांनी बाळासाहेबांच्या साठीनिमित्त एक व्यंगचित्र प्रदर्शन आणि सहा व्यंगचित्रकारांचा बाळासाहेबांच्या हस्ते सत्कार असा कार्यक्रम ठेवला होता. मी थोडा लवकर गेल्यामुळे प्रकाश देवळे यांच्या कार्यालयात चहा पित बसलो होतो तोच बाहेर फटाक्यांच्या जोरदार माळा चालू झाल्या. प्रकाश देवळे म्हणाले, “बाळासाहेब आले.’’ आम्ही बाळासाहेबांच्या स्वागताला गेलो. भेट घडताच त्यांनी नेहमीच्या आस्थेने मुंबईहून कोण कोण आलंय, राहण्याची व्यवस्था झालीय का हे विचारलं. विकास सबनीस यांच्याबद्दल खास प्रेम होतं. “विकास आलाय का?’’ विचारलं. माझ्या बाजूला असलेल्या व्यंगचित्रकार द. अ. बंडमंत्री, विजय पराडकर यांचीही बाळासाहेबांनी आस्थेने चौकशी केली. त्यानंतर बालगंधर्व कलादालनात बाळासाहेबांच्या हस्ते व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमातच आम्हा व्यंगचित्रकारांचा सत्कार होणार होता.

झालं असं… प्रचंड गर्दी झाल्यामुळे आम्ही सगळे व्यंगचित्रकार हालच्या बाहेर राहिलो. डोअरकिपर, सुरक्षारक्षक आत सोडेनात. तेव्हा ओळखपत्रही नव्हते. आम्ही सारे व्यंगचित्रकार बालगंधर्वच्या पाण्टीनमध्ये आता काय करायचं यावर विचार करीत होतो. तेवढय़ात शि. द. फडणीस काहीतरी अफाट कल्पना सुचल्यासारखे बोटांची टिचकी वाजवून म्हणाले, “मी मागच्या दाराने जाऊन बाळासाहेबांना भेटून त्यांना आपल्याला कुणी आत सोडत नाही हे सांगून येतो.’’ त्याप्रमाणे शि. द. मागच्या दाराने बाळासाहेबांना भेटून आले आणि एखाद्या लहान मुलाने उडय़ा मारत यावे तसे आले व हसतच म्हणाले, “अरे, चला सगळे! बाळासाहेबांनी आपल्याला आत बोलावलंय.’’ म्हणून आम्ही हॉलमध्ये गेलो तर पहिल्या रांगेत सगळे शिवसैनिक बसले होते. बाळासाहेबांनी स्वतः माईक हातात घेत आम्हाला बसायला जागा द्यायला सांगितले. त्या कार्यक्रमात बाळासाहेब, व्यंगचित्रकार आणि शि. द. अशी छान मैफल जमली. संस्मरणीय अशी ही मैफल ठरली. ते अनमोल क्षण केवळ शिदंमुळेच आम्हास अनुभवता आले.

अशा बऱयाच आठवणी आहेत. कलेचं अस्सल हृदय लाभलेल्या शिदंनी असे अनेक वाढदिवस साजरे करावेत आणि त्यांच्या कुंचल्याचं अस्तित्व समृद्ध राहावं याच शुभेच्छा!

 sanjay.mistry 555@gmail. com
(लेखक अध्यक्ष कार्टुनिस्टस् कंबाईन संस्थेचे अध्यक्ष आहेत.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सुंदरता वाढवण्यासाठी ही बॉलिवूड अभिनेत्री करते पाण्याचा उपवास; 9 दिवस जगते फक्त पाण्यावर सुंदरता वाढवण्यासाठी ही बॉलिवूड अभिनेत्री करते पाण्याचा उपवास; 9 दिवस जगते फक्त पाण्यावर
तंदुरुस्त राहण्यासाठी आपण आपल्या आहारात किती तरी प्रयोग करत असतो. त्यात बॉलिवूड अभिनेत्री तर सर्वात जास्त आपल्या डाएटची काळजी घेताना...
माझे मोठे बंधू… उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो शेअर करत राज ठाकरे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव, देशभरातील नेत्यांनी दिल्या शुभेच्छा
Photo – हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘हास्य गॅलरी प्रदर्शन’
Photo – राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरे यांची भेट घेत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
मृत्यूनंतरही आपल्या शरीराचा हा अवयव 10 वर्षे जिवंत राहतो; जाणून आश्चर्य वाटेल