रोखठोक – धनखडांचा गड कोणी पाडला? दिल्लीत जे सुरू आहे ते…

रोखठोक – धनखडांचा गड कोणी पाडला? दिल्लीत जे सुरू आहे ते…

नरेंद्र मोदी यांनीच जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदी आणलं. आता मोदींनीच त्यांना घालवलं. भविष्यातील राजकीय घडामोडींची ही सुरुवात आहे. धनखड यांना घालवण्यामागे मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघातला संघर्ष आहे आणि मोदी यांना वाटणारी असुरक्षितता हे एक मोठे कारण आहे. धनखड हे काही कर्तबगार व्यक्तिमत्त्व नव्हतं. दिल्लीत ते आले आणि गेले!

पंतप्रधान मोदी यांनीच नियुक्त केलेले आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. गेल्या दहा वर्षांच्या मोदी काळातील दिल्लीत घडलेली ही महत्त्वाची घडामोड आहे. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सध्या सुरू आहे. पहिल्याच दिवशी 21 तारखेला संध्याकाळी साधारण पाच वाजेपर्यंत उपराष्ट्रपतींची प्रकृती ठणठणीत होती. पाचनंतर भाजप वर्तुळात असे काय घडले की, पंतप्रधान मोदींचा संदेश आला व प्रकृतीचे कारण सांगून धनखड यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवला. श्री. धनखड यांची प्रकृती बरी नसल्याचे एकही लक्षण त्या दिवशी राज्यसभेच्या कामकाजात आढळले नाही (उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात). 11 वाजता नेहमीप्रमाणे कामकाज सुरू झाले. साडेअकरा वाजता विरोधी पक्षनेते श्री. खरगे यांनी पहलगाम हल्ला व ‘आापरेशन सिंदूर’बाबत त्यांची भूमिका मांडायला सुरुवात केली. सत्ताधाऱ्यांनी गोंधळ सुरू केला. खरगे यांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच त्यांचा माईक नेहमीप्रमाणे बंद केला. धनखड ‘नार्मल’ असल्याचे हे लक्षण मानायला हवे. खरगे बंद माईकसमोर बोलत असताना भाजप अध्यक्ष डा. नड्डा उभे राहिले. त्यांनी ओरडून सांगितले, “खरगेजी, तुम्ही जे बोलताय त्यातले काहीच रेकार्डवर जाणार नाही. मी बोलतोय तेच रेकार्डवर जाईल.” हे वक्तव्य म्हणजे सभापतींच्या अधिकारावर थेट आक्रमण होते. नड्डा यांच्या वक्तव्याने राज्यसभा अवाक् झाली. गोंधळात सभागृह संपवले. त्यानंतर सभापतींनी बोलावलेल्या कामकाज सल्लागार बैठकीत सगळे सामील झाले. सरकारतर्फे संसदीय कार्यमंत्री नड्डा व संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू उपस्थित राहिले नाहीत. बैठकीस जाऊ नका, अशा स्पष्ट सूचना या दोघांना दिल्या. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात तेव्हा मोदी, शहा, राजनाथ सिंह, नड्डा यांची बैठक सुरू होती व त्यानंतर उपराष्ट्रपतींची विकेट पडली!

मोदींची पसंत

जगदीप धनखड हे राज्यसभेचे सभापती म्हणून पंतप्रधान मोदींची खास पसंत होती. प. बंगालचे राज्यपाल म्हणून धनखड यांनी मोदींना जसे हवे तसेच ‘काम’ रेटले. ममता बानर्जी व त्यांच्या बहुमतातील सरकारची वेळोवेळी कोंडी करून धनखड यांनी मोदींकडून पाठ थोपटून घेतली आणि त्याच धनखडना उपराष्ट्रपती पदाची बक्षिसी दिली; पण कार्यकाल पूर्ण होण्याआधीच धनखड यांना जावे लागले! समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रा. राम गोपाल यादव हे राज्यसभेत माझ्या बाजूलाच बसतात. धनखड हे राज्यसभेचे ‘चेअरमन’ झाल्यावर त्यांचे वर्तन हे अत्यंत लाचारीचे होते. तेव्हा श्री. यादव मला म्हणाले, “ये आदमी अपना कार्यकाल पुरा कर नहीं पायेगा.” मी विचारले, “असे का म्हणता?” यावर प्रा. यादव म्हणाले, “मूळ भाजपाचे असलेले लोकही इतकी लाचारी करत नाहीत. हे जरा जास्तच लाळ घोटत आहेत.” प्रा. यादव यांचे भविष्य अशा पद्धतीने खरे ठरले.

काय कुणाचे अडले?

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींमुळे आता देशाचे काही अडत नाही. पंतप्रधानांमुळे तर अजिबात खोळंबा होत नाही. आपले पंतप्रधान तर संसदेचे अधिवेशन सुरू असतानाही परदेशात असतात. त्यामुळे धनखड गेले त्याचा राष्ट्रावर परिणाम झाला नाही. उपराष्ट्रपती झाल्यापासून धनखड यांनी लोकशाहीचा गळा घोटण्याची तपस्या केली व संवैधानिक पदावर बसून ‘मोदी’ यांची भलतीच भलामण करत राहिले. धनखड यांनी उपराष्ट्रपती म्हणून राज्यसभेत विरोधी पक्षाला न्याय दिला नाही. शेतकऱयांच्या आंदोलनास त्यांनी ‘घाणेरडे’ राजकारण म्हटले. राज्यसभेत चर्चेच्या ऐवजी गोंधळास उत्तेजन दिले. लोकशाहीत ‘असहमती’ला महत्त्व आहे; पण असहमती म्हणजे राष्ट्रविरोध असे त्यांनी सांगितले.

धनखड यांना उपराष्ट्रपती म्हणून काही पथ्ये पाळायला हवी होती; पण संवैधानिक खुर्चीवर बसून त्यांनी भाजप प्रवक्त्याचेच कर्तव्य पार पाडले. प्रयागराजच्या महाकुंभ मेळाव्याच्या वेळी विमान कंपन्यांनी आपल्या तिकिटांचे दर अवाच्या सवा वाढवल्याचा मुद्दा खा. प्रमोद तिवारी यांनी उपस्थित करताच सभापती धनखड म्हणाले, “सनातन धर्मासाठी तुम्ही इतका भार उचलू शकत नाही?” संसदेच्या पायऱ्यांवरील आंदोलनात तृणमूलचे खा. कल्याण बानर्जी यांनी धनखड यांची ‘मिमिक्री’ केली. त्याचे चित्रण राहुल गांधी यांनी केले. यावर धनखड यांनी सभापतींच्या खुर्चीवर बसून अश्रू गाळले व भावनिक कार्ड खेळले. धनखड यांचे राजकारण हे विरोधी पक्षातून सुरू झाले. ते सेक्युलर, समाजवादी विचारांचे तरीही सत्तेसाठी मोदींचे अंधभक्त बनले. त्यांच्या अंधभक्तीमुळे मूळचे भाजपवाले आश्चर्यचकित झाले. ते मोदी-शहांचे ‘येस मान’ होते. धनखड हे सदैव वाकलेल्या व हात जोडलेल्या अवस्थेत होते. तरीही त्यांना त्यांचा कार्यकाल पूर्ण करू दिला गेला नाही. हुकूमशहाला खूश ठेवणे सोपे नसते. कारण हुकूमशहा फक्त स्वतःचीच पर्वा करतो. धनखड यांच्या बाबतीत तेच घडले व मोदींच्या जवळचे असल्याचा दावा जे करतात त्यांच्यासाठी धनखड यांचे अधःपतन हा एक धडा आहे.

काही राजकीय प्रश्न

धनखड यांना का जावे लागले, हा प्रश्न तरीही आहेच व नवे उपराष्ट्रपती कोण, हासुद्धा प्रश्न आहे! धनखड नक्की का गेले?

– पी. चिदंबरम सांगतात त्याप्रमाणे उपराष्ट्रपती धनखड व मोदी सरकारचे संबंध कमालीचे बिघडले होते. धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारल्याची घोषणा राज्यसभा, उपसभापती तालिकेवरील एक सदस्य तिवारी यांनी केली. ती सभागृहातील गोंधळात कुणाला ऐकूही आली नाही.

– न्या. यशवंत वर्मा यांच्या विरोधातला महाभियोग प्रस्ताव राज्यसभेत श्री. धनखड यांनी स्वीकारला. त्याचबरोबर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. शेखर यादव यांच्या विरुद्धचा महाभियोग स्वीकारीत असल्याचे संकेत धनखड यांनी दिले. ते मोदी सरकारला आवडले नाही.

– खासगी बैठकांत व चर्चेत श्री. धनखड हे मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका करीत.

– शेवटी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे धनखड यांची संघ परिवाराशी जवळीक वाढली होती. वयाच्या 75च्या आसपास नेत्यांनी निवृत्त व्हायला हवे. हा सरसंघचालक मोहन भागवत यांचा इशारा धनखड यांनी मानला. वयाच्या 74व्या वर्षी उपराष्ट्रपती पदावरून निवृत्त होऊन सरकारातील ‘वय 75’ वाल्यांची कोंडी केली. सप्टेंबरमध्ये पंतप्रधान मोदी 75चे होत आहेत.

– धनखड व सरसंघचालक मोहन भागवत यांच्यातील जवळीक या काळात वाढली. धनखड यांनी भागवत यांना पाच ते सहा वेळा भोजनासाठी निमंत्रित केले. संघ आणि धनखड यांच्यात शिजत असलेल्या खिचडीमुळे मोदी कमालीचे नाराज झाले होते.

उपराष्ट्रपती धनखड यांच्या राजीनाम्याने दिल्लीच्या पोटातील खळबळ बाहेर आली. भाजपात सगळे आलबेल नाही हे स्पष्ट झाले. मोदींनीच धनखड यांना आणले व मोदींनीच घालवले. सप्टेंबर महिन्यात मोदी 75 वर्षांचे होतील व त्यांनीच केलेल्या नियमानुसार मोदी यांना पंतप्रधान पद सोडावे लागेल. तर मोदींचा वारस कोण? यावर भाजपातच चर्चा सुरू झाली आहे. त्याआधी मोदी उपराष्ट्रपती पदावर कोणाला बसवतात हे पाहायला हवं. राजनाथ सिंहांपासून राज्यपाल मनोज सिन्हांपर्यंत नावे चर्चेत आहेत. मोदी यांच्यानंतर अमित शहांना त्यांच्या खुर्चीवर बसायचे आहे, पण स्वतः मोदीच अमित शहांना विरोध करतील. भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानेच मला हे सांगितले. गुजरातच्या दोन नेत्यांतले संबंध आता वरवरचेच राहिले आहेत. पूर्वीचा गोडवा आता राहिलेला नाही. पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा असलेल्या एखाद्या नेत्यास मोदी उपराष्ट्रपतीपदी बसवतील अशी दिल्लीची हवा आहे व या सर्व घडामोडीत अमित शहा मला कोठेच दिसत नाहीत.

मोदींचे भ्रमण

जगदीप धनखड यांनी संसदेच्या सर्वोच्च सभागृहात लोकशाही मूल्यांची बूज राखली नाही. उपराष्ट्रपतींचा राजीनामा व नव्या उपराष्ट्रपतींची निवड या घडामोडीत भाजपचे राजकारण आहेच. देशाची आर्थिक गाडी साफ घसरली आहे व पहलगाम हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान मोदींची पत साफ घसरली. तरीही मोदी जगाच्या नकाशातील देश शोधतात व भ्रमण करतात. देशात फक्त धार्मिक, जातीय तेढ निर्माण करून मोदी राज्य करीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आता केंद्रात बदल हवा आहे. सप्टेंबर महिन्यात दिल्लीत अधिक वेगाने घडामोडी घडतील. उपराष्ट्रपतींचा राजीनामा ही त्या घडामोडींची सुरुवात आहे. 75 वर्षांच्या मोदींना पद सोडावे लागेल असे वातावरण आहे. मोदी गेले की शहांचा गडही पडेल व दिल्लीचे आकाश मोकळे होईल.

देशात बदलाचे वारे वाहत आहेत. दहा वर्षांत जे घडले नाही ते घडेल. घडायलाच हवे.

Twitter – @rautsanjay61
Gmail – [email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बदलांचं स्वागतच! बदलांचं स्वागतच!
>> महेश काळे, प्रसिद्ध शास्त्राीय गायक आपलं संगीत, आपला संस्कृतीचा जो वारसा आहे, तो टिकविण्याकरिता काय बदल करायला लागतील, त्या...
बदलती सामाजिक मानसिकता
गुंतवणुकीचे नवे मार्ग
मराठा असल्याने मंत्रीपद मिळाले नाही, मराठ्यांची फक्त मते हवीत, आमदार प्रकाश सोळंके यांचा सरकारला घरचा आहेर
सुंदरता वाढवण्यासाठी ही बॉलिवूड अभिनेत्री करते पाण्याचा उपवास; 9 दिवस जगते फक्त पाण्यावर
माझे मोठे बंधू… उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो शेअर करत राज ठाकरे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव, देशभरातील नेत्यांनी दिल्या शुभेच्छा