पालखीतील वारकऱ्यांसाठी ‘कळण्याची भाकरी व ठेच्याचा बेत, माळीपेठ वासीयांचा 20 वर्षांचा स्तुत्य उपक्रम
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावमधील मेहकर शहरात संत गजानन महाराजांची पालखी 26 जुलैला दाखल झाली. यानंतर पालखीने दुसऱ्या दिवशी सकाळी साडे सहा वाजता जानेफळच्या दिशेने प्रस्थान केले. जानेफळच्या दिशेने जाताना पालखी रस्त्यावरील विसावा या ठिकाणी थांबली. येथे वारकऱ्यांना माळी पेठ वासियांकडून कळण्याची भाकरी व ठेच्याचे जेवण देण्यात आले. येथे दरवर्षी वारकऱ्यांसाठी जेवणाची सोय केलेली असते. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला यावर्षी वीस वर्षे पूर्ण झाले आहेत.
रविवारी, 27 जुलैला पालखी जानेफळकडे रवाना होताना सकाळी साडेसहाच्या दरम्यान मेहकर-जानेफळ रस्त्यावरील ‘विसावा’ या ठिकाणी वारकऱ्यांसाठी खास भोजन सेवा आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी माळी पेठ वासीयांकडून गेली 20 वर्षे सातत्याने ‘कळण्याची भाकरी व ठेचा’, दही, मटकी यांचे चविष्ट भोजन भाविकांना दिले जाते.
या उपक्रमासाठी यंदा तब्बल साडेचार क्विंटल कळण्याचे पीठ दळले गेले असून, संपूर्ण माळी पेठ परिसरातील महिलांचे या कार्यात मोठे योगदान आहे. त्या प्रेमाने आणि श्रद्धेने भाकरी तयार करतात. वारकऱ्यांप्रमाणेच शहरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी आणि भाविक मंडळीही या प्रसादाचा लाभ घेतात.
माळी पेठ वासीयांचा हा उपक्रम केवळ धार्मिक भावना नसून एक सामाजिक बांधिलकीही दर्शवतो. एकात्मता, सेवाभाव, आणि वारकऱ्यांप्रती असलेली श्रद्धा याचे हे जिवंत उदाहरण असून, या स्तुत्य कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.याच ठिकाणी जुने अंदाजे 25 ते 30 वर्षापूर्वी बांधलेले संत गजानन महाराज, श्री भगवान मारुती, प्रभू श्रीरामाचे सुद्धा दोन छोटी मंदिरे आहेत. श्री हनुमान सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून याठिकाणी कार्यक्रम होतात. विसावा या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी आलेले अनेक भक्तमंडळी मंदिरात दर्शन घेऊन भाकरी व ठेचा हा प्रसाद आनंदाने घरी घेऊन जातात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List