माणिकराव कोकाटे शनिचरणी
मंत्रिपदावरील ईडापीडा टाळण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज नंदुरबार जिह्यातील शनि मंदिरात धाव घेतली आणि मंत्रीपद वाचवण्यासाठी शनिदेवाच्या चरणी लोटांगण घातले
राज्यातील शेतकरी त्रस्त असताना विधान परिषदेच्या सभागृहात मोबाईलवर रमीच्या खेळात व्यस्त असल्याचा माणिकराव कोकाटे यांची व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांचे कृषीमंत्रीपद धोक्यात आले आहे. या पदावरून त्यांना कधीही डच्चू मिळू शकतो. त्यामुळे मंत्रीपद वाचवण्यासाठी माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबारच्या शनिमांडव गावातले प्रसिद्ध शनिमंदिर गाठले.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केली. तुम्ही चुका करा, मी तुमच्या पाठीशी आहे असे शनिमहाराज कधीही सांगत नाहीत. स्वार्थासाठी कोणत्याही मंत्र्याने शनिदेवाला कितीही तेलाचा अभिषेक केला तरी राज्यातील कोटय़वधी शेतकऱयांच्या कृषी विभागाला आणि समाजकल्याण विभागाला लागलेली पिडा आणि ती लावणारे या दोघांनाही दूर कर अशी मी शनिमहाराजांना प्रार्थना करतो असे पोस्टमध्ये म्हटले आहे
दरम्यान महायुतीमधील मंत्री संजय शिरसाट यांचेही मंत्रीपद धोक्यात आले आहे. मंत्रीपद वाचवण्यासाठी आठ दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांनी शनिशिंगणापूर मंदिरात धाव घेतली होती.
दिल्लीत विचारतात विधिमंडळात रमी कोण खेळतं!
‘विधिमंडळात रमी कोण खेळत होतं’, असं मला दिल्लीतील अनेक खासदार विचारत असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्रात एवढी अस्वस्थता सुरू आहे. दररोज सामाजिक, आर्थिक आणि गुन्हेगारीची स्थिती बिघडत असल्याने राज्यासमोर आव्हाने आहेत. असे असताना एक मंत्री विधानसभेत रमी कसे खेळू शकतात, असा सवाल खासदारांकडून उपस्थित होत असल्याचे त्या म्हणाल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List