Uddhav Thackeray महाराष्ट्र धर्माचे रक्षणकर्ते
>> डॉ. कुमार सप्तर्षी
आपल्याला हिंदीचा राग करायचं कारण नाही. मात्र हिंदीचे वर्चस्व व्हावे आणि महाराष्ट्र धर्म संकटात यावा असा याचा अर्थ नाही. आज गरज आहे ती महाराष्ट्र धर्माचे रक्षण करण्याची. मराठी भाषेचे, मराठी माणसाचे रक्षणकर्ते म्हणून पुढे येणे म्हणजेच महाराष्ट्र धर्म निभावणे. हा महाराष्ट्र धर्म उद्धव ठाकरेच निभावू शकतात. महाराष्ट्र धर्माचे रक्षणकर्ते म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा आहेत!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझी वेगवेगळ्या निमित्ताने भेट होत असे. खूप वेळ गप्पा व्हायच्या. ‘आपला डाक्टर आलाय,’ असे ते प्रेमाने म्हणायचे. मला आठवतंय 1992 मध्ये ‘सत्याग्रह’ दिवाळी अंकासाठी बाळासाहेबांची मुलाखत घ्यायला गेलो होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही माझा जुना स्नेह आहे.
महाराष्ट्राला आणि भारताला पचेल असं कोणतं तत्त्वज्ञान आहे जे इतर प्रांतांकडे नाही, पण महाराष्ट्राकडे आहे, तर ते म्हणजे महाराष्ट्र धर्म. हा महाराष्ट्र धर्म फार जुना आहे, जो महानुभावपासून सुरू झालाय. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, जनाबाई, चोखामेळा, सावता माळी या सगळ्यांमध्ये समतेचा विचार आहे. त्यांनी मानवतावाद स्वीकारला. मानवतावादाचा वारसा त्यांनी टिकवला. शिवाय छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, रानडे, आगरकर, गांधीजी अशा अनेकांच्या विचारांचा वसा महाराष्ट्राने आजही टिकवला आहे. गांधीजी म्हणायचे, महाराष्ट्रात खूप कार्यकर्ते आहेत. गुजरात सोडून ते महाराष्ट्रात आले. महाराष्ट्राचे हे वैभव आहे की, मी कार्यकर्ता आहे असे म्हणण्यामध्ये त्याला अभिमान वाटतो. म्हणजे मी नेता आहे, असं कोणी म्हटलं तर त्या मराठी माणसाची प्रतिष्ठा कमी होते. तर हाच महाराष्ट्र धर्म आहे.
मात्र हा महाराष्ट्र धर्मच संकटात आणण्याची कटकारस्थाने सुरू आहेत. हिंदी भाषेची सक्ती हा त्याच कारस्थानाचा भाग होता. हा जो हिंदी भाषिक गट आहे तो वर्चस्ववादी आहे. पुन्हा हिंदी भाषेला फार इतिहास नाही. त्यांनी 100-150 बोलीभाषा एकत्र करून हिंदी भाषा तयार केली आहे. हिंदी अशी स्वतंत्र भाषा नाही. ती त्या त्या प्रदेशातल्या म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान यामध्ये राहणाऱ्या लोकांच्या बोलीभाषा एकत्र येऊन तयार झाली आहे. लखनऊला हिंदीमिश्रित उर्दू बोलली जाते आणि वरचा वर्ग संस्कृतमिश्रित उर्दू बोलतो. त्यामुळे हिंदी ही सगळ्यांची मिश्र भाषा आहे, आपल्याला हिंदीचा राग करायचं कारण नाही. मात्र हिंदीचे वर्चस्व व्हावे आणि महाराष्ट्र धर्म संकटात यावा असा याचा अर्थ नाही. आज गरज आहे ती महाराष्ट्र धर्माचे रक्षण करण्याची. मराठी भाषेचे, मराठी माणसाचे रक्षणकर्ते म्हणून पुढे येणे म्हणजेच महाराष्ट्र धर्म निभावणे. हा महाराष्ट्र धर्म उद्धव ठाकरेच निभावू शकतात. कारण महाराष्ट्र धर्माचे रक्षणकर्ते म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा आहेत!
सत्तर सालची गोष्ट आहे, डॉ. राम मनोहर लोहिया यांनी यूपीएससीच्या परीक्षा हिंदीत घ्या असं म्हटलं होतं. ते अँटीइंग्लिश होते. मात्र त्याची प्रतिक्रिया दक्षिण भारतात लगेच उमटली होती. तसं आंदोलन झालं होतं. ‘किल किल हिंदी, किस किस इंग्लिश’ म्हणजे हिंदी नको, इंग्रजी चालेल आम्हाला. दक्षिणेतील राज्यांमध्ये हिंदी विरोधाची ही धार आजही कायमच आहे. त्रिभाषा सूत्राच्या निमित्ताने हा विरोध उफाळून आलेला आपण अलीकडेच पाहिला. महाराष्ट्रातही अशाच तीव्र प्रतिक्रिया हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून उमटलेल्या दिसल्या. अर्थात मराठी लोकांनी आता आपली एकी दाखवायला हवी, टिकवायला हवी, हेदेखील खरेच. आज जातीयवाद फोफावला आहे. हे सगळं संपवायचं असेल तर मराठी माणसाची प्रेमाने एकजूट करायला हवी. मराठी माणसाने बिगर मराठींशी वाईट वागावे असे नाही, पण महाराष्ट्रात मराठी आणि महाराष्ट्र धर्म हेच असायला हवे.
महाराष्ट्र धर्म हा अँटीनॅशनल होऊच शकत नाही. कारण त्याची सरहद्द कोणत्याही परदेशाला लागलेली नाही. आपण असे मध्ये आहोत की, कुठूनही फुटून गेलो तरी आपण फक्त भारतातच जाणार आहोत. हा महाराष्ट्र धन्य आहे. महाराष्ट्र नेहमीच देशासाठी तारणहार ठरला आहे. आपण जे नेहमी म्हणतो, ‘सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला’ हे खरेच आहे. महाराष्ट्र धर्म हा असाच व्यापक आणि सर्वसमावेशक आहे. त्यात संत आले, महात्मा फुले आले, प्रबोधनकार आले, गांधीजी आले… या सर्वांचा विचार करून आपण महाराष्ट्र धर्म टिकवला पाहिजे. तसे झाले तर सध्याच्या जातीय आणि धर्मद्वेषावर मात करता येईल.
महाराष्ट्रात सध्या जे राज्य सरकार असे आहे ज्याला नैतिक आधार नाही. असं महाराष्ट्रात पहिल्यांदाच झालं आहे. तीन ठोकळ्यांची गोळाबेरीज केली आहे. एकमेकांवर हे ठोकळे कायम आदळतात. म्हणून महाराष्ट्रात अराजकाची परिस्थिती आहे. महाराष्ट्रात जिथे जिथे दर्गे आहेत, ते ताब्यात घेऊन मुस्लिम द्वेष खेड्यापाड्यांत न्यायचा. तिथं मंदिरच होतं हा आग्रह धरायचा असे सगळे सुरू आहे. हे भाजपचेच लोक करत आहेत. तुम्ही जनसुरक्षा कायदा आणला आहे, पण तुम्ही कृती काय करताय? जनसुरक्षा विधेयक चुकीचंच आहे. महाराष्ट्रात आता राज्य नाही तर केवळ तमाशा सुरू आहे.
(लेखक ज्येष्ठ विचारवंत व गांधीवादी नेते आहेत.)
शब्दांकन – मेधा पालकर
[email protected]
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List