खुर्ची डोक्यात जाण्यासारखे दुसरे पाप नाही! सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या वक्तव्याची देशभरात चर्चा
खुर्ची कोणतीही असो, ती या देशातील नागरिकांची सेवा करण्यासाठी मिळालेली आहे. या खुर्चीचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे. काही जणांना खुर्ची मिळाली की ती लगेच डोक्यात जाते. खुर्ची डोक्यात जाण्यासारखे दुसरे कोणतेही पाप नाही! सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दर्यापूर सत्र न्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या या परखड वक्तव्याची देशभरात चर्चा होत आहे.
अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना न्या. गवई यांनी आपल्याला टीका करणे आवडत नसल्याचे स्पष्ट सांगितले. महाराष्ट्र पायाभूत सुविधांमध्ये मागे आहे असे सांगितले जाते. परंतु मला असे वाटत नाही. सरकार कोणत्याही पक्षाचे असो न्याय विभागाची कामे अत्यंत तत्परतेने झाली आहेत असे ते म्हणाले.
वकील आणि न्यायाधीशांचे संबंध चांगले असावेत
वकील आणि न्यायाधीशांमध्ये संबंध चांगले असावेत, अशी अपेक्षा सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली. कनिष्ठ वकिलांनी ज्येष्ठ वकिलांचा सन्मान ठेवला पाहिजे. परंतु दुर्दैवाने असे होताना दिसत नाही. एखादा तरुण कनिष्ठ वकील खुर्चीवर बसलेला असतो आणि ज्येष्ठ वकील त्याच्यासमोर उभा असतो. ज्येष्ठांचा मान ठेवला पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी कनिष्ठ वकिलांचे कान टोचले. न्यायाधीशांनीही वकिलांना मान दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.
खुर्ची लोकांच्या सेवेसाठी
खुर्ची कोणाचीही असो, जिल्हाधिकार्यांची, पोलीस अधीक्षकांची, न्यायाधीशांची! खुर्ची ही लोकांची सेवा करण्यासाठी मिळालेली आहे. पण खुर्ची मिळाली की लगेच काही जणांच्या डोक्यात जाते. खुर्ची डोक्यात जाण्यासारखे दुसरे कोणतेही पाप नाही. या खुर्चीचा सन्मान आपण केलाच पाहिजे, असे खडे बोल सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सुनावले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List