गावगोष्टी- गुलाबी गावाची गोष्ट

गावगोष्टी- गुलाबी गावाची गोष्ट

>> वर्णिका काकडे

निसर्गाचे सिद्धहस्त वरदान लाभलेल्या, डोंगर-दऱयांमध्ये लपलेल्या शेळकेवाडी गावाने 100 टक्के सौर ऊर्जेवर चालणारं जिह्यातील पहिलं गाव म्हणून मान मिळवला आहे. बायोगॅस प्रकल्प राबवणारं, सौर ऊर्जेवर चालणारं गाव ही ओळख राखत ‘गुलाबी घरांचं गाव’ ही गावाची ओळखदेखील वैशिष्टय़पूर्ण ठरत आहे.

कोल्हापूर म्हणजे करवीर नगरी हे आपले आद्य शक्तिपीठ. जगाच्या नकाशावर प्रसिद्ध असणाऱया कोल्हापूर जिह्यातील करवीर तालुक्यातील एका गावानेही स्वतची ओळख तयार केली आहे. शेळकेवाडी हे 100 घरांच्या वस्तीचं छोटंसं टुमदार गाव. डोंगरदऱयांमध्ये लपलेल्या या गावाने 100 टक्के सौर ऊर्जेवर चालणारं जिह्यातील पहिलं गाव म्हणून गावाने मान मिळवला आहे.

शेळकेवाडी या गावाची पर्यावरणपूरक गाव म्हणून वाटचाल सुरू आहे. गाव 100 टक्के पर्यावरणपूरक व्हावे यासाठी वेगवेगळे प्रकल्प गावात राबवले जातात आणि यात ग्रामस्थांचा संपूर्ण सहभाग असतो. ग्रामपंचायतीच्या विचारांना ग्रामस्थांच्या कृतीची जोड लाभते. त्यामुळेच इथला प्रत्येक प्रकल्प संपूर्णत यशस्वी ठरतो. पर्यावरणाचे संवर्धन करणारे अनेक उपक्रम इथे राबविले जातात. त्याला शेतीपूरक उपक्रमांची जोड मिळते. बायोगॅसला जोडणाऱया शौचालयांचे बांधकाम, ओल्या कचऱयाचे योग्य संकलन, परसबागांमधून खत व सांडपाण्याचे व्यवस्थापन, गावातील सुका कचरा, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, शोषखड्डे असे वेगवेगळे उपाय कचरा नियोजन व स्वच्छतेसाठी राबविले जातात. ज्यायोगे कचऱयाचे नियोजन होऊन खतनिर्मिती होते. अगदी सण, उत्सवांच्या माध्यमातूनही पर्यावरणाचा संदेश पोहोचवला जाईल याची काळजी इथले ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत करते. यासाठी बीज संकलन उत्सव, पर्यावरणपूरक गणेश मूर्ती वाटप, अंगणात अथवा कृत्रिम तलावात मूर्तींचे विसर्जन, मूर्ती विसर्जनासाठी कुंडी व रोप वाटप, ध्वनी प्रदूषण व फटाकेमुक्त दिवाळी या उपक्रमांद्वारे पर्यावरण जागरुकता व कृती दोन्हीबाबत प्रयत्न केले जातात.

शेळकेवाडीचा महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे 100 टक्के सौर ऊर्जेचा अवलंब. सौर ऊर्जेचा प्रकल्प पूर्ण करून जिह्यातील पहिलं सौर ऊर्जेवरील गाव होण्याचा मान या गावाने मिळवला आहे. गावातील 102 घरं सौर ऊर्जेवर चालतात. यासाठी ग्रामस्थांनी एकत्र सहभाग घेतला असून गावातील प्रत्येक कुटुंबांनी सोलर सिस्टीमसाठी वाटा उचलला आहे. केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’तून मिळालेल्या 30 हजारांच्या अनुदानासह विविध शासकीय योजनांमध्ये घेतलेल्या सहभागातून गावाला मिळालेल्या रकमेच्या आधारावर प्रत्येक कुटुंबाचा पाच हजारांचा हिस्सा ग्रामपंचायतीने भरला आहे. या योजनेनुसार गावातील घरांमध्ये 1 कि. वॅट प्रकल्प बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या सोलरसाठी ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, व्यायामशाळा, पथदिवे, पाणी पुरवठा योजना यांना विशेष निधीसुद्धा मिळवण्यात ग्रामपंचायत शेळकेवाडीला यश मिळाले असल्याचे ग्रामपंचायतचे माजी सरपंच सांगतात. या योजनेचा महत्त्वाचा लाभ असा झाला की, विद्युत उपकरणं वापरूनही शून्य लाईट बिल येत आहे. याच आधारावर शेळकेवाडीतील इतर पर्यावरणपूरक प्रकल्पदेखील ग्रामस्थांना फायदेशीर ठरले आहेत. गावातील सांडपाणी शोषखड्डय़ांमध्ये मुरवत शोषखड्डय़ांच्या बाजूला केळीची लागवड केली आहे. ओला कचरा वापरून बायोगॅस प्रकल्प सुरू केला आहे. तसेच 100 टक्के शौचालयं या प्रकल्पाला जोडली आहेत. त्यामुळे कचऱयाची समस्या मिटून इंधनाचीही बचत होत आहे.

शेळकेवाडीतील ग्रामस्थ या साऱया उपक्रमांत संपूर्ण सहभाग नोंदवत असल्यानेच हे शक्य होत आहे. जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या स्पर्धा, योजनांमध्ये ग्रामपंचायतीद्वारे सहभाग घेतला जातो व त्यासाठी ग्रामस्थ एकजुटीने प्रयत्न करतात, नियमांचे काटेकोर पालन करतात. ही एकजूट दिसावी याकरता इथल्या ग्रामस्थांनी सर्व घरांना गुलाबी रंग दिला आहे. इथली शाळा, गावाची कमान व इतर महत्त्वाच्या वास्तुदेखील गुलाबी रंगाचा डौल मिरवताना दिसतात. ग्रामस्थांच्या विचारांतील एकसंधपणा दर्शवणारी ही कृती निश्चितच अनुकरणीय आहे.

सिमेंटविटांच्या जंगलात हिरवाई हरवत असताना पर्यावरणाचे संवर्धन व्हावे याकरिता गाव एकीने झटत आहे. पर्यावरणपूरक आणि समृद्धीमुळे गाव एक पाऊल पुढे टाकत आहे. शंभर टक्के सौरऊर्जेचा वापर करणारं गाव म्हणून या गावाने आता बहुमान मिळवला आहेच, शिवाय प्रत्येक घर गुलाबी बनवत एकतेचा संदेशसुद्धा या गावानं संपूर्ण महाराष्ट्राला दिला आहे. शेळकेवाडीच्या निमित्ताने पर्यावरण राखण्याचा, गावाच्या विचार आणि कृतीच्या एकतेचा संदेश देण्याचा हा वसा अनेक गावांपर्यंत पोहोचेल.

[email protected]

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सुंदरता वाढवण्यासाठी ही बॉलिवूड अभिनेत्री करते पाण्याचा उपवास; 9 दिवस जगते फक्त पाण्यावर सुंदरता वाढवण्यासाठी ही बॉलिवूड अभिनेत्री करते पाण्याचा उपवास; 9 दिवस जगते फक्त पाण्यावर
तंदुरुस्त राहण्यासाठी आपण आपल्या आहारात किती तरी प्रयोग करत असतो. त्यात बॉलिवूड अभिनेत्री तर सर्वात जास्त आपल्या डाएटची काळजी घेताना...
माझे मोठे बंधू… उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो शेअर करत राज ठाकरे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव, देशभरातील नेत्यांनी दिल्या शुभेच्छा
Photo – हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘हास्य गॅलरी प्रदर्शन’
Photo – राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरे यांची भेट घेत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
मृत्यूनंतरही आपल्या शरीराचा हा अवयव 10 वर्षे जिवंत राहतो; जाणून आश्चर्य वाटेल