पावसाचा जोर कायम; पंचगंगा पात्राबाहेर, पाटपन्हाळ्यात दरड कोसळली; शिरोळमध्ये 11 एकर शेतजमीन वाहून गेली

पावसाचा जोर कायम; पंचगंगा पात्राबाहेर, पाटपन्हाळ्यात दरड कोसळली; शिरोळमध्ये 11 एकर शेतजमीन वाहून गेली

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. धरण क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत पंचगंगा नदी पाणीपातळीत तब्बल सात ते आठ फूट वाढ झाली असून, राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी सायंकाळी आठच्या सुमारास 31 फूट 6 इंचावर पोहोचली होती. तर, सकाळी प्रथमच पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली असून, पात्रातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. तर, 45 बंधारे पाण्याखाली गेले होते.

राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा या गावात दरड कोसळल्याची, तर शिरोळ तालुक्यातील केनवाड गावात कृष्णा नदी काठची अकरा एकरहून अधिक शेतजमीन वाहून गेल्याची घटना समोर आली आहे.

राधानगरी धरणाच्या विद्युतगृहातून अजूनही 3 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपत्रात सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदी पाणीपातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण 64 टक्के भरले आहे. गगनबावडा तालुक्यातील अकनूर आणि कोगेसह अनेक लघु पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे इतरही नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होत आहे.

दोन दिवसांपूर्वी पंचगंगेच्या पातळीत पाच फुटांची घट झाली होती.आता पुन्हा वाढ होत असून, काल सकाळी 8च्या सुमारास 24 फूट 8 इंच असलेली पाणीपातळी आज दुपारी तीनच्या सुमारास 30 फूट 3 इंच झाली होती. तर, सायंकाळी आठच्या सुमारास 31 फूट 6 इंच झाली होती. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट, तर धोका पातळी 43 फूट आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस धुवाँधार सुरूच राहिल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होताना दिसत होती.

दरम्यान, पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, सुर्वे, राजापूर, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर, कुंभी नदीवरील सांगशी, कासारी नदीवरील ठाणे, आळवे, यवलुज, भोगावती नदीवरील हळदी, राशिवडे, शिरगाव, कोगे तसेच दूधगंगा नदीवरील दत्तवाड यासह जिल्ह्यातील 45 बंधारे पाण्याखाली गेले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून, पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.

धोकादायक कामगार चाळ इमारतीचा काही भाग कोसळला

छत्रपती संभाजीनगर कामगार चाळमध्ये महापालिकेचे सर्व कामगार व त्यांचे कुटुंब राहते. आज छत्रपती संभाजीनगर येथील कामगार चाळ ‘ब’मधील धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला. याची माहिती प्रशासनास मिळताच प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार तातडीने सकाळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त स्वाती दुधाने, शहर अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, स्ट्रक्चरल ऑडिटर प्रशांत हडकर, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन जागेवर पाहणी केली. या ठिकाणी 5 धोकादायक इमारती व 2 बैठय़ा इमारती असून, सन 2014 पासून या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कामगारांना दरवर्षी नोटिसा दिल्या आहेत. तरीदेखील या इमारती कामगारांनी रिकाम्या केल्या नाहीत.

अलमट्टीतून 70 हजार क्युसेक विसर्ग

सकाळी सातच्या आकडेवारीनुसार कर्नाटकातील अलमट्टी धरणात कृष्णा आणि पंचगंगा नदीतील 83 हजार 426 क्युसेक पाणी जमा होत हो, तर अलमट्टीतून 70 हजार क्युसेक विसर्ग सुरू होता. तसेच हिप्परगी धरणात 77 हजार 451 क्युसेक पाणी जमा होत होते, तर हिप्परगीमधून 76 हजार 401 क्युसेक विसर्ग सुरू होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;