शनिभक्तांची फसवणूक; बनावट ऍपची चौकशी होणार; शनेश्वर देवस्थानची सायबर पोलिसांकडे तक्रार

शनिभक्तांची फसवणूक; बनावट ऍपची चौकशी होणार; शनेश्वर देवस्थानची सायबर पोलिसांकडे तक्रार

शनीची साडेसाती दूर व्हावी, यासाठी देशासह परदेशांतील भक्त शनिमंदिरात माथा टेकवतात, तर काही भक्त ऑनलाइन पूजा दर्शन सुविधेला पसंती देतात. या ऑनलाइन पूजा दर्शनात अनेक भाविक फसवणुकीला बळी पडल्याचा प्रकार शनिशिंगणापुरात उघड झाला आहे. भाविकांचा गैरफायदा घेत सेवेकरी, पुजारी, नोकरदार यांनी शनिभक्तांच्या पैशावर डल्ला मारल्याचे प्रकरण उजेडात आले. देवस्थानच्या नावे बनावट ऍप तयार करून ऑनलाइन दर्शन पूजा व तेल चढावातून भाविकांची लूट केली गेली. याबाबत आता शनेश्वर देवस्थानने या बनावट ऍपची चौकशी करण्यासाठी सायबर पोलिसांकडे लेखी अर्ज सादर केला आहे.

तीन ऑनलाइन बनावट ऍप व्यतिरिक्त आणखी काही ऍप राजरोस सुरू असून, या लुटमारीत मंदिरातील पुजारी, देवस्थानचे कर्मचारी, या घोटाळ्याच्या साखळीत अडकले आहेत. या प्रकरणात भाविक स्वतःहून बळी पडल्याने त्यांच्यापुढे हात चोळण्याची वेळ आली आहे. शनीची साडेसाती दूर व्हावी, यासाठी ऑनलाइन दर्शनची सुविधा सुरू आहे. मात्र, या ऑनलाइन दर्शन पूजा सर्व्हिसमध्ये दानशूर भक्तांनी दिलेल्या दानावरच महाभागांनी डल्ला मारला आहे. ही बाब देवस्थानच्या लक्षात आल्याने शनेश्वर देवस्थानने बनावट ऑनलाइन ऍप घोटाळ्याची चौकशी करावी, अशी लेखी तक्रार सायबर पोलिसांकडे केली आहे. ‘वामा कलकत्ता’, ‘पूजा साई सेवा’, ‘हरी ओम’ ही बनावट ऑनलाइन ऍप आढळून आली आहेत. याशिवाय आणखी काही ऍप सुरू असल्याचा संशय बळावला आहे. ऑनलाइन पूजेसाठी 1800 रुपये नोंदणी करून व्हिडीओद्वारे पूजा केली जाईल. त्याचे व्हिडीओ पुरावे पाठवले जातील. यात पूजेचे खर्च वेगळा, अशा पद्धतीने भाविकांना गंडा घालण्यात आला आहे. यापूर्वी 2022ला देवस्थानने चार ऑनलाइन ऍपला अधिकृत परवानगी दिली होती. दिल्ली नोएडा या ऍप कंपनीसोबत करार केले. मात्र, बनावट ऍपचा गैरवापर घोटाळा उघडकीस आल्याने देवस्थानने ही सर्व ऍप बंद केली आहेत.

याविरोधात देवस्थानचे माजी विश्वस्त डॉ. वैभव शेटे, काँग्रेसचे संभाजी माळवदे, साई प्रतिष्ठानचे विशाल सुप्रिया आदींनी जिल्हा पोलीसप्रमुख व राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याने प्रकरण तापले आहे.

ते 18 व्यक्ती कोण?
शनिशिंगणापूर बनावट ऑनलाइन घोटाळ्यात 1800 रुपये शुल्क नोंदणी करून हजारो भाविक जोडले असल्याची चर्चा असतानाच, देश-विदेशात या ऑनलाइन लुटीची व्याप्ती पोहोचल्याची चर्चा आहे. श्रीमंत भक्तांकडून ऑनलाइन पूजेच्या नावाखाली कोटय़वधी रुपये उकळल्यामध्ये देवस्थानचे कर्मचारी, सोनईमधील दोन पुरोहित व त्याची तीन मुले, जावई, राजकीय नेत्याचे विश्वासू, अशा एकूण 18 जणांची टोळी अडकल्याची चर्चा मंदिर परिसरात सुरू आहे. त्यामुळे आता पोलीस या 18 जणांचा पर्दाफाश करून कारवाई होणार का, अस सवाल करण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलन
सन 2018 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनेश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था अधिनियम 2018 हा कायदा केला. गेल्या सात-आठ वर्षांपासून कायद्याची अंमलबजावणी केली नाही. देवस्थान शासनाने ताब्यात घ्यावे, यासाठी येथे ग्रामसभा, आंदोलने, तक्रारी केल्या. आता सरकार मात्र झोपेचे सोंग घेत आहे. शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये दिवसेंदिवस घोटाळे उघडकीस येत आहेत. याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने याचा फटका भाविकांना बसत आहे. याबाबत सरकारने दखल न घेतल्यास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर गावकऱ्यांसह आंदोलन करू, असा इशारा शनेश्वर देवस्थानचे माजी विश्वस्त डॉ. वैभव शेटे यांनी दिला आहे.

बनावट ऍप घोटाळ्याविरोधात शनेश्वर देवस्थानने लेखी तक्रारीसह कागदपत्रे सादर केली आहेत. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने तपास सुरू आहे. पूर्ण तपास झाल्यानंतर माहिती देऊ.
– मोरेश्वर पेदम, वरिष्ठ निरीक्षक सायबर सेल

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;