खूशखबर! आता पाच लाखांपर्यंत पीएफ काढता येणार!!
गरज असेल तेव्हा पैशांची तरतूद करण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे ईपीएफओ. परंतु, कोरोनाच्या काळात सुरू करण्यात आलेल्या ऑटो-सेटलमेंट मर्यादेनुसार केवळ 1 लाख रुपयांपर्यंतचा पीएफ काढता येत होता. मात्र, आता ही मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. अवघ्या 72 तासांत ही रक्कम मिळू शकणार आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज दिली. त्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हा तब्बल पाच लाख रुपयांपर्यंतचा पीएफ काढता येणार आहे.
सणांचे महिने सुरू झाले असून गणपती, दिवाळी, दसरा या काळात पीएफधारकांना पाच लाख रुपयांपर्यंतचा पीएफ काढता येणार आहे. तसेच जेव्हा गरज असेल तेव्हा पीएफधारकांसाठी तत्काळ अॅक्सेस मिळू शकणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी याबाबतची माहिती आज दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. ईपीएफओच्या ऑटो-सेटलमेंटची मर्यादा पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आल्यो याचा फायदा लाखो ईपीएफओधारकांना होईल असा विश्वास मांडवीय यांनी व्यक्त केला. ईपीएफओधारकांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी कोविड काळात पहिल्यांदा ऑटो-सेटलमेंट सुविधा देण्यात आली होती. ईपीएफओने सदस्यांना थर्ड पार्टी एजंटची मदत घेण्याप्रकरणी इशारा दिला आहे. पीएफ खात्यांशी निगडीत सेवांसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करावा, असा सल्लाही केंद्रीय मंत्र्यांनी दिला आहे.
तीन दिवसांच्या आता क्लेम सेटल
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 89.52 लाख ऑटो क्लेम सेटल करण्यात आले होते. त्या तुलनेत 2024-25 मध्ये तब्बल एकूण 2.32 कोटींचे ऑटो क्लेम सेटल करण्यात आले. ईपीएफओच्या सदस्यांकडून करण्यात आलेले अॅडव्हान्स क्लेम, फायलिंगच्या तीन दिवसांच्या आत सेटल करण्यात येईल असा दावा केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी केला आहे.
ईपीएफओच्या सदस्यांमध्ये वाढ
ईपीएफओ अर्थात भविष्य निर्वाह निधीच्या खात्यांमध्ये एप्रिलपर्यंत तब्बल 19.14 लाख खात्यांची भर पडली आहे. मनुष्यबळ मंत्रालयाने आज जारी केलेल्या अहवालांतर्गत ही बाब समोर आली आहे. मार्च 2025 पर्यंत ईपीएफओच्या खात्यांमध्ये 31.31 टक्क्यांची वाढ झाली होती. तर याच महिन्यात 2024 मध्ये ईपीएफओच्या खात्यांमध्ये 1.17 टक्क्यांची वाढ झाली होती. एप्रिल 2025 मध्ये ईपीएफओशी जवळपास 9.49 लाख नवीन सदस्य जोडले गेले. मार्च 2025 मध्ये यात 12.49 टक्क्यांची वाढ झाली. ईपीएफओशी जोडले गेलेले सदस्य 18 ते 25 या वयोगटातील आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात एप्रिल महिन्यापर्यंत ईपीओफओधारकांचा आकडा 21.12 टक्क्यांनी वाढल्याचे मनुष्यबळ मंत्रालयाने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List