श्रीक्षेत्र जेजुरीत माउलींच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण
सासवडमधील दोन दिवसांचा मुक्काम आटोपून संतश्रेष्ठ ज्ञानोबा माउलींच्या पालखी सोहळा आज जेजुरीत मुक्कामासाठी दाखल झाला. माउलींचा पालखी सोहळा जेजुरीत पोहोचताच ‘ज्ञानोबा माउली, तुकाराम’, ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जयघोष करण्यात आला. यावेळी माउलींच्या पालखीवर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांनी पहाटेपासून सकाळपासूनच खंडोबाच्या दर्शनासाठी गडावर गर्दी केली होती.
माउलींचा पालखी सोहळा जेजुरीत येणार म्हणून खंडोबाच्या मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. आज खंडेरायाला भंडाऱ्याबरोबर बुक्काही अर्पण करण्यात आला. गडावर शैव आणि वैष्णवांचा मेळा भरला होता.
पंढरीचा विठोबा आणि जेजुरीचा खंडोबा ही साऱ्यांची श्रद्धास्थाने आहेत. पंढरीला निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा मुक्काम खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये आहे. त्यामुळे पहाटेपासूनच खंडोबा गडावर दर्शनासाठी वारकरी बांधवांच्या रांगा लागल्या होत्या. वारी चालून चालून पाय दुखत असले तरी चारशे पायऱ्यांचा गड चढून आलेल्या वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह होता.
सकाळी गडावर पावसाच्या रिमझिम सरी पडत होत्या; पण त्याची पर्वा न करता वारकरी मार्गक्रमण करीत होते. गडावर वारकऱ्यांना त्वरित दर्शन व्हावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. वारकऱ्यांसाठी दिवसभर भोजन प्रसादाचे आयोजन केल्याची माहिती श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त मंगेश घोणे व अनिल सौंदडे, डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी दिली.
या बाई जेजुरी नगरात, कोऱ्या चांदणी महालात,
पंढरीत आहे रखुमाबाई, येथे म्हाळसा-बाणाई
तिथे विटेवरी उभा, येथे घोडय़ावरी शोभा
तेथे बुक्क्याचे रे लेणे, येथे भंडार भूषणे
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List