संत माहात्म्य – काव्यातून जनजागृती करणारा संत

संत माहात्म्य – काव्यातून जनजागृती करणारा संत

>> प्रा. मनीषा र. रावराणे

ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा अर्थातकबीर जयंतीनुकतीच झाली. आपल्या जीवनकार्याने जगाला प्रकाशित करणाऱया संत कबीर यांचा जन्मदिन. ..1399च्या सुमारास वाराणसीत सरोवराकाठी नुकतंच जन्माला आलेलं बाळ नीरूजुलाहे या जोडप्याला सापडलं. त्यांनी बाळाला घरी नेलं, मौलवीला नामकरणासाठी बोलावलं. मौलवींनी कुराण शरीफ ग्रंथातील पान उघडलं तेव्हा नाव आलंकबीर’. याचा अरबी भाषेतील अर्थ आहेमहान परमात्मा’. या बाळाने हे नाव खरोखर सार्थ केलं.

कबीर यांची ही महानता त्यांच्या जीवन प्रवासात आहे, सामाजिक कार्यात आहे. त्यांचा व्यवसाय विणकामाचा होता. हे विणकाम करता करता त्यांनी दोहे रचले. खरं तर त्यांना ते स्फुरले! त्यांच्या शिष्यांनी ते लिहून घेतले, संकलित केले. त्यातूनच पुढे सहा ग्रंथ निर्माण झाले. ‘कबीरसाखी’, ‘कबीर सागर’, ‘कबीर बीजक’, ‘कबीर शब्दावली’, ‘कबीर दोहावली’, ‘कबीर ग्रंथावली’ अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे.

इतकं अफाट लेखन करणारे कबीर शाळेत जाऊन शिकले नव्हते. खऱया साधकाला अशा बाह्य शिक्षणाची सीमा थोडीच असते, स्वत कबीर यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की, “मला कागदाचा स्पर्श झाला नाही आणि मी लेखणी हातात धरली नाही. माझ्या मुखाने जे काही स्फुरलं, ते मी जगाला सांगितलं.’’ हा दोहा असा…

मसि कागद छुऔ नहीं कलम गहौ नहीं हाथ।

चारों जुग कै महातम कबीर मुखहि जनाई बात?’

काय सांगितलं त्यांनी जगाला? खूप महत्त्वाच्या गोष्टी दिल्या. त्यांनी केलेला हा उपदेश आपल्याला आजही मार्ग दाखवतो, दिशा देतो. यासंदर्भातील त्यांचे काही दोहे पाहू या.

माणूस भोवताली सतत पाहत असतो. त्यातून तो अनेक समस्यांना तोंड देत असतो, पण त्याने बाहेरची ही दृष्टी अंतरंगाकडे वळवली तर! तर कोणत्याही प्रकारचे ताप त्याला ‘ताप’ देत नाहीत. हा दोहा…

आपा जांनि उलटिले आप।

तें नहीं ब्यापैं तीन्यूं ताप?’

हे तीन ताप म्हणजे दैव, अज्ञान, बाह्य जग या विषयांतून निर्माण होणाऱया समस्या होत. यातून सुटण्याचा मार्ग बाहेरच्या परिस्थितीत नाही, तर स्वतच्या मनस्थितीत आहे. अशी ही सुखाची गुरुकिल्ली त्यांनी दिली या दोह्यातून. आजच्या ‘कलह’ युगात तारक ठरणारा असा त्यांचा दोहा आहे…

ऐसी वाँणी बोलिए मन का आपा खोई।

अपना तन सीतल करें औरन कैं सुख होई।

अशी वाणी बोलावी की, ज्यामुळे मन मंत्रमुग्ध होऊन जाईल. ती बोलून आपल्याला शांती लाभेल आणि ऐकणाऱयालाही सुख मिळेल. किती थोडक्या शब्दांत त्यांनी शांती, संयम यांची शिकवण दिली आहे.

अशा अंतर्मुख करणाऱया काव्यरचना त्यांनी केल्या. तसेच त्यांची सामाजिक कविताही पुष्कळ आहे. त्या काळात समाजात कर्मकांड, बुवाबाजी, जातिभेद यांनी थैमान घातलं होतं. अशा रूढी, प्रथा, अंधश्रद्धा यावर त्यांनी आपल्या काव्यातून तडाखेबंद प्रहार केले. एके ठिकाणी ते म्हणतात…

पाहनपूजे हरि मिले, तो मैं पुजू पहार।

ताते यह चाकी भली, पीस खाए संसार।

जर दगडाची पूजा करून हरी भेटत असेल तर मी पहाडाचीही पूजा करायला तयार आहे. यापेक्षा तर घरातील चक्की चांगली. कारण त्यातील पिठाने सगळ्यांची भूक भागते.

काही दोह्यांतून त्यांनी सामाजिक ऐक्यासाठीसुद्धा लोकांना प्रवृत्त केलं, डोळ्यांत अंजन घातलं.

हिंदू कहे मोहि राम पियारा, तुर्क कहे रहमाना।

आपस में दोउ लडीलडी मुए, मरम न कोउ जाना।

हिंदूंचा राम लाडका, तर मुस्लिम लोकांना रहीम प्यारा. यावरून दोघेही लढत मरणाच्या मुखात पोहोचले, पण त्यांनी मर्म जाणून घेतले नाही. खरंच आजही हा दोहा महत्त्वाचा वाटतो.

आपल्या काव्यातून समाज जागृती करणारा हा संत कर्मयोगाची शिकवण देणारा होता. त्यांचं आचरणही त्यानुसारच होतं. विणकाम करता करता ते रामनामात दंग होऊन गात. ते म्हणतात…

रामनाम रंग लागे, कुरंग न होई,

हरि रंग सौ रंग और न कोई।

रामनामाचा रंग लागलेला आहे. हा कधीही खराब होत नाही. या प्रभुरंगासारखा दुसरा रंग नाही. म्हणून सगळ्यांना ते सांगतात…

लूट सके तो लूट ले, राम नाम की लूट

पाछे फिर पछताओगे, प्राण जाहि जब छूठ।

तेव्हा मंडळी आताच जागे होऊ या, रामनामाचा आनंद लुटू या.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;