Air India Plane Crash- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाने याची जबाबादारी घ्यावी; संजय राऊत यांची मागणी

Air India Plane Crash- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाने याची जबाबादारी घ्यावी; संजय राऊत यांची मागणी

ड्रीम लाईनर जेव्हा विकत घेतली तेव्हा भाजप नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच या अपघाताची जबाबादारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डाण मंत्रायलाने घ्यावी अशी मागणाही संजय राऊत यांनी केली आहे.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, संपूर्ण देश शोकमग्न आहे. टाटांनी प्रत्येकी एक कोटी रुपये दिले म्हणून प्रश्न संपत नाहीत. इतका मोठा तांत्रिक बिघाड झाला. लंडनला निघालेले विमान त्यातली दोन्ही इंजिनं बंद पडतात. मी त्यातला तज्ज्ञ नाही. कुणी म्हणतंय पक्ष्याची धडक बसली, ब्लॅक बॉक्स सापडल्यावर त्याची चौकशी होईल. पण इतका मोठा अपघात होतो, आणि अपघात टाळता येतात असे अमित शहा म्हणतात, तेव्हा या देशात कोणत्या प्रकारचं राज्य लादलेलं आहे हे कळेल. रेल्वेचे अपघात टाळता येत नाहीत, पहलगामचा हल्ला टाळता येत नाही, अहमदाबाद विमान अपघात टाळता येत नाहीत. मग यांना टाळता काय येतं. मी परत परत सांगतो यात आम्हाला राजकारण करायचे नाही. ड्रीम लाईनर जेव्हा विकत घेतली तेव्हा त्याच्या खरेदीबाबत त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे लोक भाजपचेच होते. आपण संसदेतला रेकॉर्ड तपासू शकता. प्रफुल पटेल नागरी उड्डाण मंत्री होते आणि त्यांना प्रश्न विचारणारे भाजपचे लोक होते एवढंच आज माझ्या स्मरणामध्ये आहे असे संजय राऊत म्हणाले.

तसेच जे विमान पडलं त्याबद्दल जगात अनेक तक्रारी आहे. त्यामुळे हे विकत घेताना काही दबाव होता का? या खरेदीमध्ये गैरव्यवहार झाला आहे का? या अपघातात 300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे म्हणून आम्हाला चिंता वाटते आणि म्हणून आम्ही हे प्रश्न उपस्थित करत आहोत. याची जबाबदारी कोण घेणार हा साधा प्रश्न आहे. जेव्हा युपीएच्या काळात अशा प्रकारचे अपघात होत होते, तेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते त्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा मागत होते. आणि त्या त्या वेळेला राजीनामे दिले गेले होते. रेल्वेचा अपघात झाला तेव्हा माधवराव सिंदियांनी राजीनामा दिला होता. आणि तुम्ही खुशाल जागेवर बसला आहात. घटनास्थळी जाऊन त्याचे व्हिडीओ शूट करत आहेत. माणसं मेली त्या राखेवर पाय ठेवून व्हिडीओ शूट करत आहात. या देशाचे दुर्दैवं आहे की अशा उत्सवी राजाचे सरकार देशामध्ये आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली.

30 सेकंदात विमान कोसळतंय. याचा अर्थ ते उड्डाणासाठी तंत्रज्ञानी ओके केले होतं. तरी 30 सेकंदात विमानाची दोन्ही इंजिन बंद पडतात. मग गडबड काय? याची चौकशी व्हावी आणि भविष्यात ते निष्पण्ण होईल. पण आता प्रवासी आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला त्यासाठी जबाबदार कोण? आम्ही तुमच्या देशात सुरक्षित नाहीत. रेल्वे, प्रवासी, हवाई प्रवासी सुरक्षित नाहीत. पर्यटक, मणिपूरची जनता सुरक्षित नाही. मग तुमच्या राज्यात सुरक्षित कोण आहेत? याचे उत्तर अमित शहांनी द्यायला हवे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते विजय रुपाणी त्यांचाही यात मृत्यू झाला आहे. याची कुणीतरी जबाबदारी घ्यावीच लागेल. पंतप्रधान, नागरी उड्डाण मंत्रालयाने याची जबाबादारी घ्यावी. रेल्वेचा अपघात झाल्यावर रेल्वे मंत्री जबाबदारी घेत नाहीत. देशांतर्गत हल्ल्याची जबाबादारी गृहमंत्री अमित शहा घेत नाहीत. ऑपरेशन सिंदूर ट्रम्प यांनी मध्यस्थी करून थांबवलं त्याची जबाबादारी पंतप्रदान मोदी घेत नाही. मग राज्य कसलं करताय तुम्ही? तुमच्यावर कोणतीही जबाबादारी नाही आणि तुम्ही सत्तेची मौज घेत आहात. इथे देंवेंद्र फडणवीस आणि तिकडे मोदी जनता तुम्हाला सरेंडर आहे असे संजय राऊत म्हणाले.

मृतांच्या नातेवाईकांनी सरकारकडे ही मागणी करावी. हे बळी आहेत आणि हा सदोष मनुष्यवध आहे. विमानतळावरच्या टेक्निकल टीमने विमान उड्डाणासाठी योग्य ठरवलं मग विमान कोसळलं कसं? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. तसेच संवेदना व्यक्त करणं आणि जबाबदारी घेणं यात फरक आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम संवेदना व्यक्त केल्या. आदित्य ठाकरेंनी आपल्या वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द केले. संवेदना आम्हालाही आहेत. आमचं हृदय जळतंय. 241 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि देश हळहळतोय असे संजय राऊत म्हणाले.

या अपघातात ब्रिटन आणि पोर्तुगालच्या प्रवाशांचाही मृत्यू झाला त्यामुळे संपूर्ण देशात हाहाःकार झाला आहे. भारतात हवाई प्रवास करण्यात जर जगाने काही निर्णय घेतला तर ती भारताची नाचक्की होते. भारतातला हवाई प्रवास सुरक्षित नाही, ही जर भावना जगभर पसरली तर ही भारताची नाचक्की आहे. एअर इंडिया महाराजा होता. त्याला महाराजाची प्रतिष्ठा होती. भारतीय म्हणून आमचं हृदय जळतं असेही संजय राऊत या वेळी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;