गणेश मूर्तींचे नैसर्गिक जलस्त्रोतातच विसर्जन करू द्यावे, सार्वजनिक समन्वय समिती करणार मागणी
पीओपी मूर्ती तयार करण्यावर आणि त्याच्या विक्रीवरील बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे पीओपी गणेश मूर्तिकाराना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी या मूर्त्यांचे नैसर्गिक जलस्रोताऐवजी कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याचे स्पष्ट करत मोठ्या गणेश मूर्त्यांच्या विसर्जनाबाबत तोडगा काढण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले होते. त्याबाबत आता सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती गणेश मूर्तींचे नैसर्गिक जलस्त्रोतातच विसर्जन करू द्यावे अशी मागणी करणार आहे. समिती तसा मसूदा राज्य सरकारकडे सादर करणार आहे.
”सार्वजनिक गणेश मूर्ती या उंच असतात. अशा उंच मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे अडचणीचे होईल. प्रामुख्याने ज्या मोठ्या मंडळांच्या विसर्जन मिरवणूका निघतात, त्यात लाखो भाविक सहभागी होतात अशा ठिकाणी सर्व गोष्टींचे नियोजन करणे हे अडचणीचे होऊ शकते. कृत्रिम तलावांच्या ठिकाणी मर्यादित जागेमध्ये या प्रचंड गर्दीचे नियोजन कशा प्रकारे करणार. कृत्रिम तलावाशेजारी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असू शकते. अशा ठिकाणी चेंगराचेंगरी अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी प्रशासनाला घ्यावी लागेल. त्यामुळे उंच मूर्ती नैासर्गिक जलस्त्रोतातच विसर्जित होणे आवश्यक आहे”, असे सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने राज्य सरकारला लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.
पत्राचा मसूदा –
आपल्या निदर्शनास आणण्यात येते की, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या समोर दाखल झालेल्या याचिका क्रमांक 665/2025 अंतर्गत न्यायालयाने दिनांक 9 जून 2025 रोजी निर्णय दिला असून सदर निर्णयानुसार प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी) च्या गणेश मूर्तीवरील बंदी उठवली आहे. या निर्णयाचे समितीने गणेश मंडळाच्या वतीने स्वागत केले आहे. परंतु आपल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या उंच मूर्तीचे नैसर्गिक जल स्त्रोतप्त विसर्जन होणे आवश्यक असल्याने आपण शासनाकडे तशी मागणी केली आहे. सार्वजनिक गणेश मंडळाच्या उंच मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करणे अडचणीचे होईल असे आपण शासनास कळवले आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका निघतात, यात लाखोच्या संख्येने गणेशभक्त सहभागी असतात. समुद्रावर प्रचंड जनसमुदायाचे नियोजन करता येते, मात्र कृत्रिम तलावांच्या ठिकाणी मर्यादित जागेमध्ये या प्रचंड गर्दीचे नियोजन कशा प्रकारे करणार. कृत्रिम तलावाशेजारी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असू शकते. अशा ठिकाणी चेंगराचेंगरी अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी प्रशासनाला घ्यावी लागेल. माननिय उच्च न्यायालयाने सार्वजनिक गणेश मंडळाच्या पीओपी च्या उंच मूर्तीचे विसर्जन कसे करावे या बाबत माननीय न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला तोडगा काढण्याचे आदेश दिले होते व पुढील तारीख 30 जून ठेवली आहे. सदर बाब विचारात घेता समन्वय समिती आपल्या गणेश मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलस्त्रोतात करण्याबाबत समिती मानक कार्यप्रणाली (SOP) चा मसुदा शासनाकडे सादर करणार आहे. आपणास विनंती करण्यात येते की, SOP मध्ये आपणाकडून काही सूचना, नियम सुचवायचे असेल तर त्वरित आपण समितीच्या इमेल. [email protected] वर दिनांक 18 जून पूर्वी सादर करावे हि विनंती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List