आणखी 13 शिक्षकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; बदलीसाठी बनावट प्रमाणपत्रे, आजाराचे दाखले दिले
सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात सोयीच्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे आणि गंभीर आजाराचे दाखले सादर करणाऱ्या आणखी 13 शिक्षकांना शिक्षण विभागाने निलंबित का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे चुकीची कागदपत्रे देणारे शिक्षक प्राथमिक शिक्षण विभागाच्या रडारवर चांगलेच सापडले आहेत. जिल्हा रुग्णालयामार्फत दररोज 25 शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन सुरू आहे. या प्रक्रियेत काही शिक्षकांनी दिव्यांग किंवा गंभीर आजारी असल्याचे कारण सांगत किशेष सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्रे सादर केली होती. जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार आल्याने प्रशासनाने कागदपत्रे पडताळणीसाठी समिती गठीत करण्यात आली होती. शिक्षकांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या सत्यतेबाबत संशय आल्याने शिक्षण विभागाने 581 शिक्षकांची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयाकडे दिली.
दुसऱ्या टप्प्यात सुमारे 83 शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयाने मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्याकडे सादर केला. कागदपत्र पडताळणीसाठी 7 शिक्षक गैरहजर राहिले. त्यामध्ये 62 शिक्षक कागदपत्रांच्या पडताळणीत पात्र ठरले, तर 13 शिक्षकांनी सादर केलेली दिव्यांग प्रमाणपत्रे व गंभीर आजाराचे दाखले अयोग्य आणि नियमानुसार चुकीचे असल्याचे आढळून आले.
आरोग्य विभागाच्या अहवालानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी संबंधित 13 शिक्षकांना थेट नोटीस बजावली आहे. तुम्ही बदली प्रक्रियेत लाभ घेण्यासाठी आयोग्य प्रमाणपत्रे सादर करून जिल्हा परिषद प्रशासनाची दिशाभूल केली आहे. या नोटिसीकर सात दिवसांच्या आत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नोटिसीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे अनिस नायकवडी यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List